Skip to main content
x

आचरेकर, गंगाराम भिकाजी

गंगाराम भिकाजी आचरेकर यांचा जन्म मालवण तालुक्यातील आचरे या गावी झाला. त्यांचे प्राथमिक शिक्षण जन्मगावीच झाले. नंतर त्यांचे नाभरंग्रे गावचे पं. बळवंतराव बापट यांच्याकडे त्यांचे संगीत शिक्षण झाले. बापटबुवा हे गायनाचार्य बाळकृष्णबुवा इचलकरंजीकर यांचे गुरुबंधू होते. आचरेकरांनी आपल्या गुरुजींकडे ग्वाल्हेर गायकीचा व धृपद, ख्यालाचा अभ्यास केला. याचबरोबर ते एक उत्तम व प्रख्यात तंतकार होते. बीन या वाद्यावर त्यांनी मेहनत घेतली व खास करून सूक्ष्म स्वरश्रुतींत ते पारंगत झाले. बीन बरोबरच सतार, मृदंग व तबला या वाद्यांवरही त्यांनी प्रभुत्त्व मिळवले. शंकरभैयांसारख्या कसलेल्या पखवाजी बरोबर त्यांनी जुगलबंदीही केली.

आचरेकर १९०५ साली पुण्यात आले. नंतर १९०५ ते १९०९ अशी चार वर्षे राजकोट, कठियावाड येथील राजकुमार महाविद्यालयामध्ये संगीत शिक्षक म्हणून त्यांनी काम केले. ‘पुणे ट्रेनिंग कॉलेज फॉर मेन’ येथील गायन अध्यापक बाळकृष्णबुवा नाटेकर यांच्या निधनामुळे गायनाध्यापकाच्या जागेसाठी १९०९ साली घेतलेल्या परीक्षेत आचरेकर पहिले आले व त्यांचीअध्यापकपदी नेमणूक झाली. ते १९३९ साली मृत्यू होईपर्यंत या पदावर कार्यरत होते. एक उत्तम संगीत शिक्षक म्हणून त्यांचा लौकिक होता.

संगीतशास्त्र व कलेमध्येही त्यांनी अविश्रांत श्रमाने नैपुण्य मिळवले. त्यांचा प्राचीन संगीत ग्रंथांचा उत्तम अभ्यास होता व त्यांनी आधुनिक संगीतास प्राचीन कला-तत्त्वांची जोड देण्याचे सैद्धान्तिक कार्य केले. १९३२ साली प्रसिद्ध झालेल्या ‘मत्सरीकृत मूर्च्छना’ या ग्रंथात त्यांनी स्वरशास्त्र विषयक सिद्धान्त मांडला. प्राचीन ग्रंथांच्या विवरणाद्वारे आधुनिक संगीतातील बावीस श्रुतींची उपपत्ती त्यांनी सांगितली. श्रुत्यंतरांची गणिती पद्धतीने व प्रात्यक्षिकासह गुणोत्तरे मांडली. षड्ज-पंचमभावामुळे येणारी २२ श्रुतीस्थाने, श्रुतींची स्वरांत विभागणी, विविध ग्रम व थाटांतील श्रुतीस्थाने, प्राचीन व प्रचलित स्वरस्थानांची श्रुतीनिश्चय असे विषय त्यांनी या ग्रंथात श्लोकरूपाने मांडले आहेत. या ग्रंथामुळे श्रुतीचर्चेस एक निराळी दिशा मिळाली. त्यांनी मांडलेल्या श्रुतीविचारास अब्दुल करीम खां यांचे शिष्य बाळकृष्ण कपिलेश्वरी यांनी विरोध केला. आचरेकर हे एक हरहुन्नरी व्यक्तिमत्त्व होते. यंत्रशास्त्रातही गती असल्याने घड्याळासारख्या यंत्रांची ते सफाईने दुरुस्ती करत. बीन, मृदंग, हार्मोनिअम इ. वाद्ये बनवणे, दुरुस्त करणे याही बाबतीत त्यांनी प्राविण्य मिळवले. या वाद्यनिर्मितीच्या नादातूनच त्यांनी श्रुती-हार्मोनिअमची निर्मिती केली. प्रचलित हार्मोनिअम इक्विटेंपर्ड पद्धतीने स्वरजुळणी केल्याने म्हणजे हिंदुस्थानी संगीताच्या संदर्भात बेसूरी असल्याची टीका होऊन हार्मोनिअमला त्या काळात विरोध होऊ लागला. हिंदुस्थानी संगीतातील २२ श्रुतींचा मेळ हार्मोनिअममध्ये बसवावा म्हणून देवल व क्लेमेंट्स् यांनी त्या प्रकारची पेटी बनवून प्रयत्न करून पहिला. पण ऋषभ, गांधार, मध्यम, धैवत, निषाद यातील फरकासाठी त्यांना स्वररचनेसाठी टाइपरायटरप्रमाणे स्वरश्रेणी बसवाव्या लागल्या व हार्मोनिअम वाजवण्याचे काम सुकर होण्याऐवजी कष्टप्रद अवघड मात्र झाले. आचरेकरांनी सतत २० वर्षे अविश्रांत विचार व परिश्रम करून अखेर वाजविण्यास सोपी परंतु श्रुतीसाध्य अशी हार्मोनिअम १९२७ साली तयार केली.

महाराष्ट्रातील प्रमुख गावोगावी, संगीत परिषदांमध्ये वेळोवेळी प्रात्यक्षिक व व्याख्याने देऊन त्यांनी या श्रुतीमंजूषेचे महत्त्व लोकांच्या निदर्शनास आणले. त्यांच्या श्रमाचा मोबदला त्या काळच्या दैनिक व साप्ताहिकांतील त्यांविषयी गौरवपर लेखमालेतून दिसून येतो. या श्रुतीमंजूषेचे एकस्व एक घेऊन प्रचारकार्य करण्याचा त्यांचा मानस होता. परंतु १९३७ साली ते आजारी पडले व मुंबईत त्यांचा मृत्यू झाला.

आचरेकर हे संगीतकला निपुण, शास्त्रज्ञ, तंतकार, त्याचप्रमाणे उर्दू भाषेचे तज्ज्ञ, जवाहीरपारखी व उत्तम ज्योतिषीही होते. त्यांच्या शिष्यगणांपैकी गायक ना. द. तांबेशास्त्री, बीनकार शिवरामबुवा दिवेकर ही मंडळी पुण्यात होती. त्यांचा संगीतशास्त्राभ्यासाचा व वाद्यनिर्मितीचा वारसा त्यांचे पुत्र बाळकृष्ण गं.आचरेकर यांनी समर्थपणे चालवला.

— चैतन्य कुंटे

आचरेकर, गंगाराम भिकाजी