Skip to main content
x

अजिंक्य, शरच्चंद्र मल्हार

          रच्चंद्र मल्हार अजिंक्य यांनी मुंबई पशुवैद्यकीय महाविद्यालयातून पशुवैद्यकीय पदवी आणि पदव्युत्तर पदवी प्राप्त केली. त्यानंतर त्यांनी  काही वर्षे या महाविद्यालयाच्या विकृतिशास्त्र विभागात अध्यापनाचे काम केले. अमेरिकेतील पेनिसिल्व्हिनिया राज्य विद्यापीठातून त्यांनी पीएच.डी.ची पदवी प्राप्त केली. १९७५मध्ये मुंबई पशुवैद्यकीय महाविद्यालयात विकृतिशास्त्र, सूक्ष्मजिवाणूशास्त्र, परोपजीविशास्त्र आणि अन्न-आरोग्यशास्त्र या एकत्रित विभागात विभागप्रमुख म्हणून त्यांची नेमणूक झाली.

          ‘कत्तलखान्यातून प्राप्त होणारे उपपदार्थ’ (भारतीय कृषी अनुसंधान संस्था साहाय्य) या योजनेचे डॉ. अजिंक्य प्रमुख संशोधक होते. ‘कत्तलखान्यांची उपयोगिता आणि म्हैसवर्गीय प्राण्यांच्या स्वादुपिंड आणि फुप्फुसातून इन्सुलिन व हिपॅरीन या द्रव्यांची प्राप्ती’ या विशेष उल्लेखनीय संशोधनाबद्दल त्यांच्या संशोधक गटाला भारतीय कृषी अनुसंधान संस्थेने १९७९-८० या काळात द्वैवार्षिक पारितोषिक दिले होते. डॉ. अजिंक्य यांनी ओरिसा विद्यापीठात कृषी तंत्रज्ञान विभागाचे अधिष्ठाता म्हणूनही काम केले. १९८३मध्ये मुंबई पशुवैद्यकीय महाविद्यालयात सहयोगी अधिष्ठाता म्हणून त्यांची नेमणूक झाली. त्यांनी किरणोत्सर्गी समस्थानिक (रेडिओ आयसोटोप) ही राज्यातील एकमेव प्रयोगशाळा स्थापन केली. पशुइंद्रिय विज्ञानशास्त्रात, तसेच प्रजननइंद्रिय विज्ञानशास्त्रात विविध अवयवांच्या कार्यक्षमतेबाबत चाचण्या करणे आणि निष्कर्ष काढणे या प्रयोगशाळेमुळे शक्य झाल्याचे निदर्शनास आले.

          डॉ. अजिंक्य यांनी कोंबड्यांमधील ‘गंबोरो’ आणि ‘लेप्टोस्पायरोसिस’ या रोगांबाबतच्या केलेल्या संशोधनाची नोंद देशातील शास्त्रज्ञांनी आणि कुक्कुट व्यावसायिकांनी घेतली. ‘कोंबड्यांमधील अ‍ॅडिनो सूक्ष्म विषाणू आणि प्रतिकारशक्तीतील आनुवंशिक दुर्बलता’ यांविषयीदेखील डॉ. अजिंक्य यांनी मोलाचे संशोधन केले. तसेच, ‘कोंबड्यांमधील इन्फेक्शियस बर्सल’ रोगांसंबंधी (भारतीय कृषी अनुसंधान संस्था साहाय्य) योजनेचे ते प्रमुख होते.

          डॉ. अजिंक्य १९८३मध्ये सेवानिवृत्त झाल्यानंतर भारतीय कृषी अनुसंधान संस्थेने 'प्रतिष्ठित प्राध्यापक' हे सन्माननीय पद देऊन त्यांच्या संशोधन कार्याचा उचित गौरव केला.

- संपादित

अजिंक्य, शरच्चंद्र मल्हार