Skip to main content
x

आजरेकर, एस. एल.

                 स.एल. आजरेकर हे इचलकंरजीचे रहिवासी होते. ते मुंबई राज्याच्या कृषी विभागात पहिले वनस्पति-रोगशास्त्रज्ञ म्हणून कार्यरत होते. त्यांचे प्राथमिक शिक्षण कोल्हापूर जिल्ह्यातील आजरे या गावी पूर्ण झाले. पुढे त्यांनी पुणे येथील डेक्कन महाविद्यालयात प्रवेश घेतला आणि १९०३ मध्ये मुंबई विद्यापीठाची विज्ञान विषयातील बी.ए.ची पदवी संपादन केली. पुढील शिक्षणासाठी आजरेकर यांना शिष्यवृत्ती मिळाली आणि त्यानंतर ते लंडनला रवाना झाले, तेथे त्यांनी केंब्रिज विद्यापीठाची कवकशास्त्र या विषयातील बी.ए.ची पदवी संपादन केली. त्यानंतर भारतात परत आल्यावर पुणे कृषी महाविद्यालयात त्यांच्यावर वनस्पतिशास्त्र विभागात साहाय्यक प्राध्यापक व कवकशास्त्रज्ञ म्हणून जबाबदारी सोपवण्यात आली. या काळात त्यांनी कवकशास्त्र या विषयाचे अध्यापन करून बटाटा रोगावर संशोधन केले.  

               कवकशास्त्र व वनस्पति-रोगशास्त्राचे प्रशिक्षण घेतलेली एकमेव व्यक्ती असल्याने आजरेकर यांची मुंबई कृषी खात्यात विशेष अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली. त्यानंतर त्यांनी ६ वर्षे मध्य प्रदेश सरकारच्या आधिपत्याखाली कार्य केले. नंतर त्यांची मुंबई येथील ‘रॉयल इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स’ या संस्थेत नियुक्ती झाली. त्यानंतर अहमदाबाद येथील गुजरात महाविद्यालयातून ते कवकशास्त्राचे प्राध्यापक म्हणून १९३६ मध्ये सेवानिवृत्त झाले आणि पुणे येथे स्थायिक झाले. त्यानंतरही त्यांनी कवकशास्त्र व वनस्पति-रोगशास्त्रात विशेष रस घेऊन एम.एस्सी. व पीएच.डी.च्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.

- संपादित

आजरेकर, एस. एल.