Skip to main content
x

आपटे, दिगंबर विठ्ठल

            दिगंबर विठ्ठल तथा अप्पासाहेब आपटे यांचा जन्म सातारा येथील सायगावमध्ये एका संपन्न व सुसंस्कृत कुटुंबात झाला. त्यांचे शालेय शिक्षण सातारा येथील न्यू इंग्लिश स्कूलमध्ये, तर महाविद्यालयीन शिक्षण पुण्याच्या फर्ग्युसन महाविद्यालयामध्ये झाले. दिगंबर आपटे लहान असतानाच त्यांच्या वडिलांचे निधन झाले. त्यांचे मामा दामोदर वामन बापट यांनी पुढे त्यांचा सांभाळ केला, पण काही काळाने त्यांचेही निधन झाले. यामुळे कुटुंबाची व पारंपरिक व्यवसायाची जबाबदारी पूर्णपणे दिगंबर आपटे यांच्यावर येऊन पडली. ती त्यांनी समर्थपणे पेलली. आपटे हे सायगावचे इनामदार होते. ‘सायगावचे आपटे’ म्हणून हे कुटुंब पंचक्रोशीत प्रसिद्ध होते. पत्नी आनंदीबाई, मुलगी नर्मदा, मुलगे गोपाळ, नरहरी, श्रीकांत व सुधीर आणि आई काशीबाई असा त्यांचा परिवार होता.

            जिल्हापरिषदा अस्तित्वात येण्यापूर्वी तालुका लोकल बोर्ड अस्तित्वात आले. त्यावर आपटे जावळी तालुक्यातून निवडून आले. स्वातंत्र्यपूर्व काळात ते परिषदेचे उपाध्यक्षही होते. सातारा जिल्हा परिषदेत सायगाव व परिसर या मतदारसंघांतून ते निवडून आले. पंचवार्षिक योजनाही याच काळात सुरू झाल्या. त्यामुळे अनेक विकासकार्यांचे नियोजन व पाठपुरावा करून त्यांनी त्यांच्या मतदारसंघात अनेक विकास योजना राबवल्या. ते काँग्रेस पक्षाचे सक्रिय कार्यकर्ते होते व त्या पक्षामार्फत लढलेल्या सर्व निवडणुका त्यांनी जिंकल्या.

            आपटे कुटुंबाची सायगाव, रायगाव व भुईंज या तीन गावांत शेती होती. त्यांनी १९४५ ते ५० या काळात  शेतीत अनेक प्रयोग केले. आपल्या शेतीत आधुनिक तंत्रज्ञान आणण्याचा व त्याचा परिसरात प्रसार करण्याचा प्रयत्न त्यांनी जिद्दीने केला. शेतीचे व्यावसायिकीकरण करण्याचा व बाजारासाठी सुयोग्य अशी पिके घेण्याचा आपटे यांनी जाणीवपूर्वक प्रयत्न केला. त्यांनी त्या दृष्टीने सदर विभागात पहिल्यांदाच जातिवंत बियाणे निर्माण करण्याचा उपक्रम हाती घेतला. यासाठी त्यांनी प्रथमतः कांद्याची निवड केली. पुणे येथील विष्णू-सदाशिव कंपनीच्या सल्ल्याने त्यांनी रब्बी हंगामात ‘डबलपत्ती गरवा’ या कांद्याची पेरणी केली व मार्च-एप्रिल महिन्यांत त्याला फुलोरा येऊन बी धारणा झाली. कांदा बी अत्यंत नाजूक व हलके असते. त्यामुळे त्याची निगराणी महत्त्वाची ठरते. फुलातून बी काढणे व ते स्वच्छ करणे हे काम हातांनीच करावे लागते. यासाठी कराव्या लागणार्‍या प्रक्रियांचे प्रमाणीकरण त्यांनी केले. पुणे येथील रेल्वे स्टेशनजवळील विष्णू-सदाशिव कंपनी व पुणे कँप भागातील पोचा आणि कंपनी यांच्यामार्फत त्यांनी वितरण व विक्रीची व्यवस्था केली. उत्तम प्रतीचे, ९०-९५ टक्के उगवण असणारे बी निर्माण करण्यासाठी उत्तम पोसलेला कांदा लावणे जरुरीचे असते. तेव्हा शेतकर्‍यांना उत्तम कांदा मिळवून देणेे, लावणी व मशागतीसाठी योग्य सल्ला देणे, हे जिकिरीचे कामही ते आवडीने करत.

            दर्जेदार बियाणेच शेतकर्‍याला मिळावे; म्हणून आपटे यांनी प्रत्यक्ष शेतकर्‍यालाच बियाणे विकण्याचे धोरण अंगीकारले. कांदा बीप्रमाणेच नगदी उत्पन्न देणार्‍या उसाच्या पिकाला बारा महिने पाणी लागते. हे माहीत असूनही आपटे यांनी पुढाकार घेऊन सातारा जिल्ह्यातील पाडेगाव येथून ४१९ नंबराच्या उसाचे बियाणे आणले व ऊस शेतीचा आदर्श शेतकर्‍यांमध्ये निर्माण केला.

            त्या काळात साखर कारखाने नव्हते. तेव्हा शेतकर्‍याला स्वतःचे गुर्‍हाळ घालावे लागत असे. अप्पासाहेबांनी गूळ निर्मितीची प्रक्रिया प्रमाणित केली. गुळव्यांसारखे कुशल कारागीर तयार केले. लहान शेतकर्‍यांना गुर्‍हाळ परवडत नसे. त्यांना अप्पासाहेबांच्या गुर्‍हाळात गूळ करून मिळत असे.

            आपटे यांनी फळबागांचा उपक्रमही राबवला. तसेच, त्यांनी ८० वर्षांपूर्वी पुणे येथील शेतकी महाविद्यालयातून हापूस-पायरी आंब्याची कलमे आणून त्यांची लागवड देशावरही यशस्वी करून दाखवली. त्याचप्रमाणे पुण्याहून मोसंबीची कलमे आणून मोसंबी बागा फुलवल्या. साठ वर्षांपूर्वी त्यांनी सायगाव व रायगावमधील विहीरजोड प्रकल्प यशस्वी करून बारमाही पिके घेण्यास सुरुवात केली. तसेच भुईंज गावातील आपल्या शेतामध्ये पाणी आणण्यासाठी अप्पासाहेबांनी नदीवर दहा अश्‍वशक्तीचे इंजिन बसवले. आपल्या शेतापर्यंत ह्यूम पाइपच्या साहाय्याने त्यांनी पाणी आणले व बागायती फुलवली. त्यांनी पुढाकार घेऊन गावातील चार जणांना एकत्र आणून सायगाव येथे पिठाची गिरणी सुरू केली. पंचवीस अश्‍वशक्तीच्या ऑइल इंजिनवर चालणार्‍या गिरणीत धान्याचे पीठ करणे, रवा करणे, भुईमुगाच्या शेंगा सोलणे व त्यातील दाण्यापासून तेल काढणे, तसेच तीळ, करडई इत्यादी तेलबियांपासून तेल काढणे या प्रक्रिया शेतकर्‍याला आपल्या पंचक्रोशीतच करून मिळू लागल्या. भुईंज येथे सहकारी तत्त्वावर साखर कारखाना सुरू करण्यात त्यांनी पुढाकार घेतला व ते कारखान्याच्या संचालक मंडळाचे काही काळ सभासदही होते. स्थानिक पातळीवर शेतकर्‍यांना वित्तपुरवठा करण्यासाठी सहकारी संस्था स्थापन केली. या संस्थेचे अध्यक्षपद त्यांनी भूषवले. जिल्हा स्तरावरील वित्तपुरवठा करणार्‍या सहकारी संस्थांच्या व्यवस्थापनातही त्यांनी संचालक म्हणून भाग घेतला.

            पिण्याच्या पाण्याकरता पुढाकार घेऊन आपटे यांनी गावाच्या शेजारीच असलेल्या डोंगरातून बारमाही वाहणार्‍या झर्‍यातून खापराच्या नळाद्वारे गावात सायफन पद्धतीने पाणी आणले. गावात मध्यवर्ती ठिकाणी हौदात पाणी साठवून नळाने गावाला पाणीपुरवठा केला. एक प्रयोगशील शेतकरी, सहकारी संस्थांचे प्रवर्तक, सामाजिक व राजकीय कार्यकर्ते अशी आपटे यांची सर्वदूर प्रसिद्धी झाली. वयाच्या चौर्‍याण्णवाव्या वर्षी या कृतिशील जीवनाची अखेर झाली.

- डॉ. नीळकंठ गंगाधर बापट

आपटे, दिगंबर विठ्ठल