Skip to main content
x

बडगेलवार, विठ्ठल

             बी. विठ्ठल हे स्वातंत्र्योत्तर भारतातील आधुनिक पद्धतीचे महत्त्वाचे शिल्पकार होत. महाराष्ट्रात सदानंद बाकरे यांनी ‘प्रोग्रेसिव्ह आर्टिस्ट ग्रुप’च्या निशाणाखाली नवशिल्पाचे जे प्रयोग केले, त्यानंतरच्या दशकात बी. विठ्ठल यांचा मुंबईच्या कलाविश्‍वात प्रवेश झाला.

             म्हात्रे, करमरकर, तालीम यांसारख्या दिग्गज अकॅडमिक शिल्पकारांची परंपरा आहे. परंतु महाराष्ट्रात फारच थोडे शिल्पकार आधुनिक शैलीतील भारतीय शिल्पकलेवर आपला ठसा उमटवू शकले. त्यांत बी. विठ्ठल यांचा समावेश होतो.

             विदर्भातील वर्धा या गावी १९३५ मध्ये जन्मलेल्या  विठ्ठल बडगेलवार यांनी सर जे.जे. स्कूल ऑफ आर्टमधून आपले कलाशिक्षण पूर्ण केले. शिल्पकलेबरोबर चित्रकलेमध्येही त्यांनी आपले कौशल्य अजमावले ते कदाचित बी. प्रभा या प्रथितयश चित्रकर्तीबरोबर केलेल्या विवाहानंतर!

             बी. विठ्ठल यांची शिल्पे शक्तिसौष्ठवाने भारलेली आहेत. त्यांचे शिल्पविषय मुख्यत्वे मानवाकृती आणि वृषभ यांपुरतेच सीमित आहेत; परंतु त्यांच्या समकालीनांपेक्षा त्यांची शिल्पदृष्टी वेगळी आहे हे त्या शिल्पांमधून जाणवत राहते.

             बॉर्लक किंवा मायलोलसारख्या युरोपीय नवशिल्पकारांचा प्रभाव त्यांच्या शिल्पांच्या घनतेच्या किंवा पृष्ठपोताच्या हाताळणीवर दिसून येतो; परंतु त्याचबरोबर सिंधू संस्कृतीतील वृषभशिल्पांमधून किंवा मध्ययुगीन भारतीय शिल्पपरंपरेतील नंदीच्या प्रतिमांमधून प्रतीत होणारा अंगभूत डौल, त्यांच्या गात्रागात्रांतून जाणवणारा शक्तिभार त्यांनी आपल्या वृषभशिल्पांमध्ये आत्मसात केला आहे हेही जाणवत राहते. त्यांच्या स्त्री-प्रतिमांमध्येही स्त्री-सुलभ लालित्यापेक्षा शुंग कुषाणकालीन शिल्पांची ठसठशीत पार्थिवता आहे. त्यांच्या चित्रांमध्ये मात्र हा ठाशीवपणा आढळत नाही. त्यांची चित्रभाषा त्यांच्या शिल्पभाषेपेक्षा वेगळी आहे.

             बी. विठ्ठलांची शिल्पे आकाराने छोटी असली तरी त्यांच्यातील अंगभूत भव्यतेमुळे ती खूप लक्षवेधी ठरतात. बी. विठ्ठल यांच्या शिल्पांचे वैशिष्ट्य म्हणजे त्यांनी केलेला विविध प्रकारच्या पोतांचा जोरकस वापर असून त्यांची ही शिल्पे लाकूड, दगड, अॅल्युमिनिअम व ब्राँझ अशा विविध माध्यमांत आहेत. बी. विठ्ठल यांनी विविध माध्यमांत भित्तिचित्रे तयार केली व त्या काळी लोकप्रिय होत असलेल्या मोठ्या गृहसंकुलांत किंवा पंचतारांकित उपहारगृहांत ती लागली.

             बी. विठ्ठल यांनी १९८०च्या दरम्यान दक्षिण मुंबईच्या उच्चभ्रू वस्तीत स्वत:ची व्यावसायिक आर्ट गॅलरी सुरू केली. किंबहुना स्वत:ची आर्ट गॅलरी असणारे बी. विठ्ठल हे एकमेव मराठी चित्रकार असावेत. विठ्ठलांची कलानिर्मिती १९९२मध्ये त्यांच्या निधनाबरोबरच संपुष्टात आली.

- दीपक कन्नल

बडगेलवार, विठ्ठल