Skip to main content
x

बोकील, विष्णू विनायक

 विष्णू विनायक बोकील यांचा जन्म पुणे येथे झाला. नूतन मराठी विद्यालयातून त्यांचे प्राथमिक शिक्षण आणि स. प. महाविद्यालयातून उच्च शिक्षण झाले. त्यांनी  बी.ए., बी.टी. ही पदवी संपादन केली. त्यांनी नूतन मराठी विद्यालयात शिक्षक म्हणून नोकरी केली. १९४१-४२ च्या सुमारास ‘मंगळागौरीच्या रात्री’ ही बोकीलांची कथा मा. विनायकांच्या वाचनात आली आणि त्यांनी बोकीलांना तत्काळ बोलावून त्या कथेचे संवादलेखन करून घेतले. चित्रपट होता ‘पहिली मंगळागौर’. मुंबईच्या सेंट्रल सिनेमात ६ मार्च १९४३ रोजी हा चित्रपट झळकला. मा. विनायक यांनी निम्म्याहून अधिक चित्रपट दिग्दर्शित केला होता, तरी काही कारणांमुळे त्यांना हा चित्रपट सोडावा लागला आणि पुढे र.शं. जुन्नरकर यांनी तो चित्रपट पूर्ण केला. मराठी चित्रपटामध्ये चुंबनदृश्य पडद्यावर प्रथम दाखवणारा हा चित्रपट यशस्वी ठरला.

    मा. विनायकांनी नवयुगचा त्याग करून ‘प्रफुल्ल चित्र’ ही स्वत:ची संस्था स्थापन केली आणि आपल्या संस्थेसाठी कथालेखन करण्यासाठी बोकील यांना साकडे घातले. मा. विनायक यांना बोकील यांचे लेखन आवडत होते. त्यामुळे मा. विनायक यांनी बोकील यांच्या दोन कथा पडद्यावर आणल्या. पण दुर्दैवाने विनायकरावांचा मृत्यू झाला, नाहीतर त्यांनी बोकील यांचे अधिक लिखाण पडद्यावर आणले असते. ‘मूव्ही मोघल’ म्हणून विख्यात असणाऱ्या बाबूराव पै यांनी बोकील यांच्याकडून ‘गळ्याची शपथ’ हा बोलपट लिहून घेतला. खेळकर वातावरणाची ही कथा होती. या चित्रपटाला रा.वि. राणे यांचे दिग्दर्शन होते.

    महाराष्ट्र क्रिकेट संघटनेचे सर्वेसर्वा असणाऱ्या मकरंद भावे यांनी १९५० सालात ‘जरा जपून’ या धमाल विनोदी चित्रपटाची निर्मिती केली. त्याचे संवादलेखन बोकील यांनी केले होते. ‘गाठीभेटी’ या बोकील यांच्या अत्यंत गाजलेल्या कादंबरीवरून दत्ता धर्माधिकारींनी ‘बाळा जो जो रे’ (१९५१) हा अत्यंत यशस्वी बोलपट बनवला. तसेच ‘बेबी’ ही त्यांची बहुचर्चित कादंबरी. धुळ्याच्या शेठ मगनलाल मोतीलाल यांनी त्यावरून चित्रपट काढला. बोकील यांनीच त्याचे कथा-पटकथा-संवादलेखन केले होते. त्याच सुमारास मराठी चित्रपटसृष्टीत तमाशापटांना बहार आला आणि मध्यमवर्गीय सामाजिक कथेवरचे चित्रपट मागे पडले. अशा परिस्थितीतही त्यांनी ‘यात्रा’, ‘जीवन ऐसे नाव’, ‘सप्तपदी’, ‘वाट चुकलेले नवरे’ हे चित्रपट लिहिले.

     - द.भा. सामंत

बोकील, विष्णू विनायक