Skip to main content
x

भावे, सुबोध सुरेश

     बालगंधर्व’ या चित्रपटातील ‘बालगंधर्वांच्या’ मध्यवर्ती चरित्रभूमिकेने तरुणाईला पुन्हा एकदा बालगंधर्व युगाची ओळख करून देणारा अभिनयकुशल कलाकार म्हणजे सुबोध भावे. कला आणि विद्या यांना वाव देणार्‍या पुण्यासारख्या शहरात सुबोध भावे यांचा जन्म झाला आणि तेथेच बालपण गेले. हुजूरपागा शाळेत शिक्षक असलेल्या स्नेहल भावे या आईच्या संस्कारात आणि सुरेश भावे या वडिलांच्या शिस्तीत, परंतु त्यांच्याच पाठिंब्याने कलाप्रांताकडे सुबोध भावे यांचे एकेक पाऊल पडत होते. त्यांच्याठायी असलेल्या अंगभूत कलेची जोपासना नूतन मराठी विद्यालयातील वातावरणामुळे झाली. त्यांनी ‘सिंबायोसिस कॉलेज ऑफ आर्ट्स अ‍ॅण्ड कॉमर्स’ येथून पदवी घेतल्यानंतर काही काळ एका खाजगी कंपनीत नोकरी केली.

      सुबोध भावे यांनी पुण्याच्या ‘रसिकमोहिनी’ संस्थेचे ‘लेकुरे उदंड झाली’ हे पहिले नाटक केले. त्याच दरम्यान ‘पेशवाई’ या दूरदर्शन मालिकेमध्ये बाजीरावची भूमिका साकारण्याची संधी त्यांना मिळाली. त्याच वेळेस नाटक आणि मालिकांचा दुहेरी प्रवास सुरू झाला. नायकाच्या भूमिकेसाठी आवश्यक असणार्‍या देखण्या आणि उमद्या व्यक्तिमत्त्वाच्या जोडीला स्वच्छ, स्पष्ट शब्दोच्चार, अभिनयातील सहजता त्यांच्या ठायी होती. रवींद्र महाजनी दिग्दर्शित ‘सत्तेसाठी काहीही’ या चित्रपटात त्यांनी नायकाची भूमिका प्रथमच केली. यानंतर मात्र सुबोध भावे यांची नाटक, चित्रपट आणि मालिका या तीनही माध्यमातील वाटचाल वेगाने सुरू झाली. नवनवीन मालिकांचा ओघ दरम्यानच्या काळात वाढला आणि निरनिराळ्या विषयांच्या दर्जेदार मालिकांमधून सुबोध भावे दिसू लागले.

      सुबोध भावे यांनी ‘दामिनी’, ‘पिंपळपान’, ‘आभाळमाया’, ‘वादळवाट’, ‘अवघाची संसार’, ‘या गोजिरवाण्या घरात’, ‘अवंतिका’, ‘कळत नकळत’, ‘कुलवधू’ अशा मालिकांमधून भूमिका केल्या. रोज प्रसारित होणार्‍या मालिकांच्या गर्दीत हरवून न जाता अभिनय सिद्ध करणारी रंगभूमी त्यांनी निसटू दिली नाही. नाट्यक्षेत्रातही त्यांचा वावर कायम राहिला. ‘येळकोट’, ‘कळा या लागल्या जीवा’, ‘आता दे टाळी’ आणि अलीकडे विजय केंकरे दिग्दर्शित ‘लग्नबंबाळ’ या नाटकांतूनही त्यांचे अभिनयकौशल्य पणाला लागले.

      त्यांनी ‘सखी’, ‘माझी आई’, ‘कवडसे’, ‘ध्यासपर्व’, ‘पाऊलवाट’, ‘त्या रात्री पाऊस होता’, ‘आईशप्पथ’, ‘वीर सावरकर’, ‘लाडीगोडी’, ‘सनई चौघडे’, ‘भारतीय’, ‘झाले मोकळे आकाश’, ‘हापूस’, ‘अय्या’, ‘बालकपालक’ या चित्रपटातील त्यांच्या भूमिका विशेष लक्षणीय होत्या. ‘मन पाखरू पाखरू’ या चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेता म्हणून २००८ साली त्यांना ‘झी सिने अ‍ॅवॉर्ड’ मिळाले. ‘रानभूल’ या चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट गायक म्हणून झी सिने पुरस्कार मिळाला. ‘रानभूल’ या चित्रपटात नरेंद्र भिडे यांनी संगीतबद्ध केलेले ‘मन उमगत नाही, खोल पाणी डोहात’ हे एकच गाणे होते जे सुबोध भावे यांनी गायले. संगीताची आवड आणि जाण या दोन्ही गोष्टींचा खराखुरा उपयोग झाला तो नितीन देसाई निर्मित ‘बालगंधर्व’ या चित्रपटासाठी. संगीतयुगाचा सुवर्णकाळ जगलेले आणि स्त्रीपार्ट गाजवलेले ‘बालगंधर्व’ साकारण्याची सुवर्णसंधी सुबोध भावे यांना मिळाली. मिळालेल्या संधीचे सोने करण्याच्या त्यांच्या वैशिष्ट्याचा खराखुरा प्रत्यय या चित्रपटासाठी त्यांनी घेतलेल्या मेहनतीतून आला. या भूमिकेकरता वजन कमी करण्यासाठी त्यांनी अपार कष्ट घेतले. बालगंधर्वांची सोशिक निरागसता, स्त्री भूमिकेमधील लावण्य आणि खानदानीपणा यांचा एक अप्रतिम समतोल प्रगल्भ अभिनयाच्या माध्यमातून त्यांनी साधला.

      त्यांना या चित्रपटाने अफाट लोकप्रियता आणि पुरस्कार प्राप्त करून दिले. बालगंधर्वांच्या भूमिकेत शिरून त्यांची गायकी अभिनयातून दाखण्यासाठी संगीत क्षेत्रातील मंडळींशी चर्चा करुन स्त्री भूमिकेच्या समरसतेचे मर्म त्यांनी जाणून घेतले. त्यांची ही भूमिका उठावदार करण्यासाठी त्यांना ‘आनंद भाटे’ या तयारीच्या आणि गोड गळ्याच्या पार्श्वगायकाची साथ मिळाली. या चित्रपटातील अभिनयासाठी सुबोध भावे यांना मिफ्टा पुरस्कार, झी गौरव, मटा सन्मान, संस्कृती कलादर्पण तसेच अतिशय सन्माननीय असा राज्य शासनाचाही पुरस्कारही मिळाला. मराठी सिनेसृष्टीत ‘बालगंधर्व’ या चित्रपटाला आणि पर्यायाने ‘सुबोध भावे’ यांना एक वेगळे स्थान प्राप्त झाले आहे.

      नाटक, चित्रपट, मालिका, जाहिराती अशा अनेकांगी अभिनय कारकिर्दीसाठी त्यांनी मंजिरी भावे या पत्नीची खंबीर साथ मिळते आहे. ‘अनुमती’ हा विक्रम गोखले दिग्दर्शित चित्रपट आणि लोकमान्य टिळक यांच्या जीवनचरित्रावर आधारित चित्रपटातही त्यांनी उत्तम भूमिका वठवल्या. नंतर ‘कट्यार काळजात घुसली’, ‘आणि...डॉ.काशिनाथ घाणेकर’, आप्पा आणि बाप्पा’, चिंटूचे दोन्ही भाग अशा विविध चित्रपटांतून त्यांनी आगळ्या-वेगळ्या भूमिका केल्या आहेत.

- नेहा वैशंपायन

भावे, सुबोध सुरेश