Skip to main content
x

भवाळकर, दिलीप देविदास

      न १९८७ मध्ये भारताच्या अणुऊर्जा विभागाने स्थापन केलेल्या इंदूरच्या ‘प्रगत तंत्रज्ञान केंद्र’ (सेंटर फॉर अ‍ॅडव्हान्स्ड टेक्नॉलॉजी-कॅट) या प्रतिष्ठित संस्थेचे पहिले संचालक आणि लेझरतज्ज्ञ म्हणून दिलीप देविदास भवाळकर ओळखले जातात. त्यांचा जन्म पुण्यातील एका प्रतिष्ठित आणि सुसंस्कृत कुटुंबात झाला. ते सहा वर्षाचे असताना त्यांचे वडील कुटुंबासह मध्यप्रदेशातील सागर विद्यापीठात आले. त्यांचे शिक्षण शासकीय विद्यालय आणि सागर विद्यापीठात झाले. १९५९ साली पदवीची, तर १९६१ साली भौतिकशास्त्रातील पदव्युत्तर परीक्षा ते प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झाले.

     १९४८ साली ‘ट्रान्झिस्टर’चा शोध लागला आणि इलेक्ट्रॉनिक्सच्या क्षेत्रात क्रांती झाली. काळाचा कल लक्षात घेऊन भवाळकरांनी इंग्लंडमधील साउथहॅम्प्टन विद्यापीठातून १९६२ साली इलेक्ट्रॉनिक्स विषयात दुसऱ्यांदा पदव्युत्तर पदवी विशेष प्रावीण्यासह संपादन केली. एकोणिसाव्या शतकातील प्रकाशावरील संशोधनाने प्रकाशाचे सामर्थ्य लक्षात आले होते. त्याची अनेक रूपेही पुढे आली. त्यातील ‘लेझर’ (लाइट अ‍ॅम्प्लिफिकेशन बाय स्टिम्युलेटेड इमिशन ऑफ रेडिएशन) हे प्रकाशाचे अत्यंत प्रभावी, उपयुक्त व सरळ रेषेत जाणारे रूप १९६० साली अमेरिकन शास्त्रज्ञांनी शोधून काढले. नेमक्या याच दशकात भवाळकरांनी या क्षेत्रात साउथहॅम्प्टन विद्यापीठातील प्रा. डब्ल्यू.ए. गॅम्बलिंग व आर.सी. स्मिथ यांच्या मार्गदर्शनाखाली संशोधनाला सुरुवात केली. त्यांनी ‘लेझर अ‍ॅण्ड नॉनलिनीयर ऑप्टिक्स’ या विषयात १९६६ साली पीएच.डी. मिळविली आणि लेझरवर अशी पदवी मिळवणारे ते त्या देशात पहिले ठरले. त्यांच्या प्राध्यापकांच्या आग्रहावरून त्यांनी त्या विद्यापीठात लेझर विषय शिकविण्यासाठी १ जानेवारी १९६६ रोजी व्याख्यातापद स्वीकारले.

     साउथहॅम्प्टन विद्यापीठातील कायमची नोकरी आणि अमेरिकेतील प्रयोगशाळांतून येणारी निमंत्रणे बाजूला सारून त्यांनी मायदेशी यायचे ठरविले. मुंबईच्या भाभा अणुसंशोधन केंद्रातील भौतिकशास्त्र विभागाचे संचालक डॉ. राजा रामण्णा यांनी डॉ. भवाळकरांची मुलाखत लंडनमध्ये घेतली आणि या केंद्रातील इलेक्ट्रॉनिक्स विभागातील लेझर चमूचे नेतृत्व करण्यास सांगितले. १ डिसेंबर १९६७ रोजी ते भाभा अणुसंशोधन केंद्रा’त रुजू झाले. या केंद्रात त्यांनी लेझर संशोधनाला मोठी चालना दिली. परिणामी या केंद्रातील प्रयोगशाळा देशात अग्रेसर ठरली. त्यांनी रूबी लेझर, हिलियम, निऑन, ताम्रबाष्प, कार्बन-डाय-ऑक्साइड, याग, डाय इत्यादी लेझर विकसित केले. पुढे लेझर विभाग स्वतंत्र झाला आणि ते त्या विभागाचे प्रमुख झाले.

     भारताच्या अणुऊर्जा विभागाने विज्ञान व तंत्रज्ञान क्षेत्रातील बदलाचे महत्त्व ओळखून त्वरणयंत्रे, लेझर्स, क्रायोजेनिक्स इत्यादींसाठी स्वतंत्र संशोधन व विकास केंद्र उभारायचे ठरवले. या प्रकल्पात भवाळकरांचा प्रथमपासूनच मोठा वाटा होता. या केंद्राच्या जागेच्या निवड समितीत ते नसताना, त्यांनी निवडलेली जागा समितीने एकमुखाने पसंत केली. या जागेच्या निवडीत त्यांचे निसर्गप्रेम लपून राहिले नाही. इंदूरच्या सीमेवरचा सुखसागर तलाव, त्याच्या काठावरचा इंदूरच्या महाराजांच्या मालकीचा असलेला पण नंतर नगरपालिकेच्या अधिकारात गेलेला महाल, आजूबाजूला असलेली गर्द झाडी, असा रम्य परिसर कॅटसाठी निवडला गेला. अद्ययावत प्रयोगशाळा, प्रशस्त कार्यशाळा, कर्मचाऱ्यांसाठी निवासस्थाने, शाळा, दवाखाना, दुकाने, खेळाची मैदाने, सांस्कृतिक मंडळ, वाचनालय, इत्यादी आवश्यक त्या गोष्टी कॅटमध्ये उभ्या करणे भवाळकरांच्या नेतृत्वामुळेच शक्य झाले. मोजक्याच साधनांपासून सुरुवात करून थोड्याच अवधीत त्यांनी कॅटला देशातील एक उत्कृष्ट तंत्रज्ञान विकासाचे केंद्र बनवले.

     सामाजिक बांधीलकीचे पुरेपूर भान असलेल्या भवाळकरांनी संस्थेतील संशोधनाची फळे सामान्य लोकांपर्यंत नेण्याचा प्रयत्न केला. डोळ्याच्या व इतर अवयवांच्या शस्त्रक्रियेला आवश्यक असलेले लेझर, कर्करोग उपचारासाठी किरणोत्सारी समस्थानिके असलेल्या नळ्या दुरून सांधणारे लेझर, अणुभट्टीतील शीतनळ्यादुरून कापण्यासाठी त्यांनी नायट्रोजन लेझर प्रतिदीप्तिमापी (फ्ल्यूरोमीटर) विकसित केली. हे साधन त्यांनी अणुऊर्जा विभागाच्या अनेक प्रयोगशाळांना पुरविले. पेसमेकर सांधण्यासाठी आवश्यक असलेले ‘संगणकीय लेझर सांधणी केंद्र’ त्यांनी कॅटमध्ये सुरू केले. त्यांनी लेझरच्या साहाय्याने प्राथमिक अवस्थेतील कर्करोग निदानाची पद्धती विकसित केली.

     कॅटमध्ये ‘संकलिक प्रारणा’साठी (सिंक्रोट्रॉन रेडिएशन) इंडस-१ या प्रारणयंत्राच्या उभारणीत भवाळकरांचा मोठा वाटा आहे. या प्रारणयंत्रावर काम करणाऱ्यांना प्रशिक्षित करणे व ते पूर्णपणे भारतीय बनावटीचे करण्याचे आवाहन त्यांनी स्वीकारले. त्यात ते यशस्वी झाले. ‘एप्रिल १९९९ मध्ये कार्यान्वित झालेल्या इंडस-१ ची उभारणी ही स्वत:च एक यशोगाथा आहे,’ असे ते म्हणतात. २००४ साली इंडस-२ कार्यान्वित झाले. विज्ञानाच्या सर्वच शाखांत संकलित प्रारण हे अत्यंत प्रभावी साधन म्हणून उपयुक्त ठरले आहे.

     १६ वर्षांच्या संचालक पदाच्या कारकिर्दीत भवाळकरांनी कॅटला त्वरणयंत्रे आणि लेझर्सच्या क्षेत्रात आंतरराष्ट्रीय स्तरावर नेले. युरोपातील सर्न येथील जगातील सर्वात मोठ्या मूलभूत कण संशोधन प्रयोगशाळेतील प्रचंड कोलायडर निर्मितीच्या प्रकल्पात, त्यांच्या मागणीवरून भारतातर्फे सहकार्य करण्याचे काम भवाळकरांनीच केले. कॅटचा दरवाजा इंदूर शहरातील विद्यार्थ्यांसाठी त्यांनीच खुला केला.

     डॉ. भवाळकरांच्या मार्गदर्शनाखाली १६ विद्यार्थ्यांनी पीएच.डी. केली असून  त्यांचे ८३ शोधनिबंध प्रतिष्ठित अशा आंतरराष्ट्रीय नियतकालिकांत प्रसिद्ध झालेले आहेत. त्यांना प्रतिष्ठेचे अनेक पुरस्कार मिळालेले आहेत, त्यात लंडन येथील आय.ई.आर.ई.चा रूदरफोर्ड पुरस्कार (१९६४), तंत्रज्ञानाविषयीचा एस.एस. भटनागर पुरस्कार (१९८४), कुरुक्षेत्र विद्यापीठाचा भौतिकशास्त्रातील गोयल पुरस्कार (१९९७), विज्ञान व तंत्रज्ञानातील महत्त्वपूर्ण कामगिरीबद्दल भारत सरकारचा पद्मश्री पुरस्कार (२०००), इत्यादींचा समावेश होतो. ते अर्धा डझन राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय विज्ञानसंस्थांत ‘फेलो’ म्हणून निवडले गेले आहेत.

     धुळे येथे आयोजित केलेल्या एकोणतिसाव्या अखिल भारतीय मराठी विज्ञान संमेलनाचे अध्यक्षपद त्यांनी भूषविले होते. ऑक्टोबर २००३ मध्ये कॅटच्या सेवेतून निवृत्त झालेले डॉ. भवाळकर आज विविध आंतरराष्ट्रीय संघटना आणि प्रकल्पांशी निगडित आहेत.

- डॉ. निवास पाटील

भवाळकर, दिलीप देविदास