Skip to main content
x

छाबडा, बाळ

            स्वयंसिद्ध चित्रकार आणि दृश्यकलाविश्वाशी जिव्हाळ्याचे संबंध असलेले जाणकार बाळ छाबडा यांचा जन्म पंजाबमध्ये झाला. चित्रकलेचे त्यांनी रीतसर शिक्षण घेतले नाही, स्वानुभवातूनच ते चित्रकला शिकले. तरुणपणी, १९५०च्या सुमारास एम.एफ. हुसेन यांच्याशी त्यांचा परिचय झाला आणि हुसेन यांच्या सांगण्यावरून त्यांनी स्केचेस करायला सुरुवात केली. वयाच्या पस्तिसाव्या वर्षी त्यांनी तैलचित्रे रंगवण्यास प्रारंभ केला.

१९६०च्या आसपास सांस्कृतिक क्षेत्रात प्रायोगिक कलेचे नवे वारे वाहत होते. भुलाभाई देसाई इन्स्टिट्यूटमध्ये त्या काळात इब्राहिम अल्काझी, पंडित रविशंकर, पिलू पोचखानवाला, तय्यब मेहता, क्रिशन खन्ना, एस.एच.रझा आणि व्ही.एस. गायतोंडे यांच्यासारखे विविध कलाक्षेत्रांतील प्रतिभावंत एकत्र आल्यामुळे नाट्य, संगीत, चित्रकला क्षेत्रांत एक नवे चैतन्य आले होते. छाबडा या मंडळींमध्ये सामील झाले आणि १९५९ मध्ये त्यांनी ‘गॅलरी ५९’ हे कलादालन भुलाभाई इन्स्टिट्यूटमध्ये चालू केले.

प्रोग्रेसिव्ह आर्टिस्ट्स ग्रूप व त्याभोवतालचे, आधुनिक कलेचा पुरस्कार करणारे अनेक चित्रकार व छाबडा यांचे नाते जुळले ते कायमचे. या चित्रकारांच्या सहवासाचा छाबडा यांच्या चित्रनिर्मितीवर प्रभाव पडला. छाबडा यांची चित्रे अमूर्तवादी शैलीतील असली तरी त्यांच्या चित्रांमधील आकारांना वास्तवसृष्टीतील वस्तूंचे स्मृतिरूप संदर्भ असतात. त्यांच्या चित्रांमधील रंगसंगती, चित्रातील घटकांची गतिमानता यांतून एक वेगळा परिणाम साधण्याचा प्रयत्न दिसतो.

आजपर्यंत देश-परदेशांतील अनेक महत्त्वाच्या चित्रप्रदर्शनांमध्ये त्यांची चित्रे प्रदर्शित झाली आहेत. १९६१ मध्ये टोकिओच्या द्वैवार्षिक प्रदर्शनात, तसेच १९६५ मध्ये ललितकला अकादमीतर्फे त्यांच्या चित्रांना पुरस्कार मिळाले.  ते १९८६ ते १९९० या काळात भोपाळच्या ‘भारत भवन’च्या सल्लागार समितीचे सदस्य होते. त्यांना १९९० मध्ये महाराष्ट्र शासनातर्फे गौरव पुरस्कार देण्यात आला. २००३ मध्ये, १९५८ ते २००३ या कालखंडातील त्यांच्या कलानिर्मितीचा आढावा घेणारे चित्रप्रदर्शन जहांगीर आर्ट गॅलरीत भरवण्यात आले होते. असे असले तरी छाबडा यांची खरी ओळख भारतातील आधुनिक चित्रकला प्रवाहाचे सहयोगी साक्षीदार आणि प्रवर्तक म्हणूनच आहे.

- दीपक घारे

संदर्भ
‘मॅनिफेस्टेशन्स २ : ‘इंडियन आर्ट इन द ट्वेन्टिएथ सेन्च्युरी’; दिल्ली आर्ट गॅलरी, नवी दिल्ली; २००४ यातील कमला कपूर, यांच्या नोंदीवरून.
छाबडा, बाळ