Skip to main content
x

छापेकर, लक्ष्मण नीळकंठ

आण्णासाहेब

      क्ष्मण नीळकंठ छापेकर उर्फ आण्णासाहेब यांनी बी. ए. चे शिक्षण पूर्ण करुन १९३३ मध्ये शिक्षकी पेशा स्वीकारला. १९३९ ला बी.टी परीक्षेत मुंबई राज्यात ते सर्वप्रथम आले. त्याच वर्षी ला. ना. सार्वजनिक विद्यालय जळगावचे ते मुख्याध्यापक झाले. १९४२ ते १९५६ चाळीसगाव येथे आ. व्यं. विद्यालयाचे मुख्याध्यापक होते. त्याच वेळी प्राथमिक अध्यापक विद्यालयाचे प्राचार्य म्हणून त्यांनी धुरा सांभाळली. पुन्हा १९५६ ते १९६२ या कालखंडात ला. ना. सार्वजनिक विद्यालय जळगाव येथे मुख्याध्यापक पदी विराजमान झाले.

     अध्ययन, अध्यापनाबरोबर लेखन, संपादन हा छंद आण्णासाहेबांना लहानपणापासूनच होता. या छंदामुळे त्यांनी विविध लेखनकार्य केले. सर परशुरामभाऊ महाविद्यालय, पुणे येथे शिकत असतांनाच सकाळ, ज्ञानप्रकाश यात लेखन केले. शिक्षक म्हणून रुजू झाल्यावर ‘प्रागतिक’ साप्ताहिकात संपादक झाले. तसेच ‘विजय’ साप्ताहिकाचेही संपादन केले. लेखनाचा सतत व्यासंग जोपासला. ‘उसना मेवा’, ‘मुलांचे स्वराज्य’, ‘असे होतात संस्कार’, ‘सहज शिक्षण जीवन सुगंध’, असे ग्रंथलेखन केले. ‘उद्यापन’ हा काव्यसंग्रह प्रसिद्ध केला, क्रमिक पुस्तकांचे संपादन केले. त्यामुळेच पाठ्यपुस्तक मंडळाच्या बालभारती पहिली ते सातवीच्या पाठ्यपुस्तकांच्या संपादनाचे काम त्यांच्याकडे आले. त्यांनी शिक्षकांच्या प्रशिक्षणासाठी प्रशिक्षण महाविद्यालय सुरु केले. अभ्यासक्रम बनविला. शाळेला प्रयोग मंदिर समजून हर्बार्ट, फ्रोबेल, पेस्टॅलॉसी, माँटेसरी, ताराबाई मोडक यांच्याप्रमाणेच स्वतःच्या कल्पनांवर आधारित शैक्षणिक प्रयोग केले. पाठ्यपुस्तक मंडळाच्या पाठ्यपुस्तकांच्या उत्तम अध्यापनासाठी पहिली ते चौथीच्या अध्यापन पुस्तिका बनविल्या. शिक्षकांसाठी हस्तपुस्तिका, पाठ्यपुस्तकांचे संशोधनात्मक समीक्षण करविले. पूर्व प्राथमिक अध्यापन कार्यपुस्तिका बनवून बालशिक्षणाचे महत्त्व पटविले. या सर्व लेखन प्रवासामुळे अनेक शिक्षणप्रेमींशी परिचय वाढला. अनेक शासकीय व अशासकीय समित्यांवर कार्य करता आले. गांधी शिक्षण भवन मुंबई या संस्थेद्वारा शिक्षणावर वाहिलेले ‘विनयन’ या त्रैमासिकांचे संपादन करता आले.

     १९५८ मध्ये माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघाच्या पुणे येथे झालेल्या अधिवेशनाचे अध्यक्ष झाले. शिक्षकांच्या, मुख्याध्यापकांच्या प्रश्‍नांना त्यांनी वाचा फोडली. त्यामुळेच १९५९ मध्ये मुंबई राज्य विधानपरिषदेचे (शिक्षक प्रतिनिधी) म्हणून निवड झाली. शासन दरबारी शिक्षक विषयक अनेक प्रश्‍न सोडविता आले. १९६२ ला ते सेवानिवृत्त झाले. पुढे अण्णासाहेब पुणे विद्यापीठात सिनेट सदस्य, मराठी भाषा संचलनालय, महाराष्ट्र राष्ट्रभाषा सभा, मराठी साहित्य परिषद, राज्य माध्यमिक शिक्षण मंडळ अशा विविध समित्यांवर पदाधिकारी व सदस्य म्हणून कार्यरत झाले.

     अण्णासाहेबांनी शिक्षण, अध्ययन, अध्यापन, अध्यापक, शालेय अनुशासन, माध्यमिक शाळांतील शिक्षक, विद्यार्थी, पालक यांच्या संबंधीची कितीतरी व्याख्याने ठिकठिकाणी महाराष्ट्रात दिली. शिक्षणक्षेत्राविषयी आंतरिक तळमळ असल्याने अण्णासाहेबांचे काम १९६२ साली सेवानिवृत्त झाल्यावरही चालू राहिले.

     प्राचीन ते अर्वाचीन सर्व लेखक, कवी यांच्या लेखन संग्रहातून धडे, कविता निवडाव्या लागत. अण्णासाहेबांच्या व्यासंगाने, दूरदृष्टीने हे काम पूर्ण होऊ शकले. त्यामुळेच महाराष्ट्रातल्या सर्व विद्यार्थ्यांपर्यंत उत्तम दर्जाची पाठ्यपुस्तके जाऊन पोहोचली.

     अण्णासाहेबांचा १९७६ मध्ये चाळीसगाव येथे डॉ. तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांच्या हस्ते गौरव करण्यात आला. तसेच पुण्यास भारतातील थोर शिक्षणतज्ज्ञ डॉ. जे. पी. नाईक यांनी गौरव केला. हा त्यांचा सर्वोच्च गौरव होता. महाराष्ट्रातील शिक्षणमंत्र्यांमध्ये ज्यांचे नाव ‘श्वेतपत्रिकेचे जनक’ म्हणून घेतले जाते, त्या मधुकरराव चौधरींच्या हस्ते अण्णासाहेबांचा गौरवग्रंथ प्रसिद्ध झाला.

     अण्णासाहेबांनी आयुष्यभर स्वदेशीचा पुरस्कार केला. विनोबांची आचार्यकुलाची कल्पना महाराष्ट्रात रुजविण्यात त्यांचा वाटा आहे. आजही महाराष्ट्रातील बी. एड्. महाविद्यालयामध्ये वक्तृत्व स्पर्धा, निबंध स्पर्धा आयोजित केल्या जातात व ल. नी. छापेकरांची स्मृती जागवली जाते. छापेकरांचे देहावसान ६ फेब्रु. १९८६ रोजी झाले.

- प्राचार्य म. ल. नानकर

छापेकर, लक्ष्मण नीळकंठ