Skip to main content
x

दाभोलकर, गोविंद मधुसूदन

      पल्या गुणवत्ता, परिश्रम, कार्यशैली, व्यासंगाबरोबरच बालकांना केंद्र मानून त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी व शिक्षकांसोबतच त्यांच्या उत्कर्षासाठी सदैव जागृत असणाऱ्या उमद्या व देखण्या व्यक्तिमत्त्वाचे गोविंद मधुसूदन दाभोलकर आणि दादर, मुंबई येथील बालमोहन विद्यामंदिर हे दीर्घकाळ एक समीकरणच होऊन बसले होते. १९५८ मध्ये या शाळेत सहाय्यक अध्यापक या नात्याने प्रवेश करून ३० वर्षांनंतर दाभोलकर पर्यवेक्षक, उपमुख्याध्यापक अशा क्रमाने मुख्याध्यापकपदी आरूढ झाले. त्यांची शिकवण्याची हातोटी फार उत्तम होती. वर्गातला प्रत्येक विद्यार्थी विषयाशी समरस होईल अशी त्यांची अध्यापन शैली होती.

     चेहऱ्यावर नेहमी हास्य व प्रसन्न वृत्ती असलेले दाभोलकर अभिजात गुणग्राही होते, त्यामुळे विद्यार्थीवर्ग, शिक्षकगण, संस्थेचे संचालक आणि शिक्षण खात्यात ते अत्यंत प्रिय व विश्‍वसनीय होते.

     दाभोलकरांचे आजोबा व वडील हेही शिक्षकच होते. दाभोलकरांच्या मातोश्री सावित्री या उत्तम कर्तव्यदक्ष गृहिणी होत्या. शाळेत आपले कर्तव्य चोख बजावत असतानाच दाभोलकरांनी महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळात मूल्यमापन अधिकारी आणि अतिरिक्त समन्वयक (पाठ्यपुस्तके) म्हणून स्मरणीय कार्य केले. आराम वा विश्रांती हे शब्द त्यांच्या कोशात नसल्याने त्यांनी महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळाला प्रभारी गुणवत्ता नियंत्रण अधिकारी या नात्याने १९८४ ते १९९५ पर्यंत  सतत आपल्या अनुभवाचा प्रचंड फायदा दिला. मंडळाच्या हिंदी भाषा समितीवर इयत्ता पहिली ते आठवीसाठी निमंत्रित सदस्य या रूपाने ते मार्गदर्शन करीत. शिवाय आठवी ते १२ वीच्या हिंदी अभ्यास मंडळाच्या पाठ्यपुस्तक समितीचे संयोजक या नात्याने १९७५ ते १९९० पर्यंत भरीव योगदान दिले. शालेय कार्यक्रम समिती (आकाशवाणी) चेही ते सदस्य होते. शिक्षकांच्या सेवाअंतर्गत प्रशिक्षणात दाभोलकरांनी उल्लेखनीय कामगिरी केली. शिक्षण खात्याच्या या उपक्रमासाठी त्यांनी तज्ज्ञ मार्गदर्शक व प्रशिक्षण केंद्र संचालक या नात्याने अपार मेहनत घेतली. शिक्षण उपसंचालक यांच्या मार्गदर्शनाने निर्मित बृहन्मुंबई मुख्याध्यापक मंचाचे सचिव पदावर काम करणारे सर्वाधिक सक्रिय कार्यकर्ते म्हणून काम करणारे दाभोलकरच होते.

     अनेक शैक्षणिक उपक्रम, स्पर्धा, प्रशिक्षण कार्यक्रमांचे नियोजक तज्ज्ञ, मार्गदर्शकांचे मार्गदर्शक, राज्यस्तरावर भरविलेल्या ४० पेक्षा अधिक शिबिरांतून त्यांनी यशस्वीपणे कार्यभार सांभाळला. शिक्षकांची गुणवत्ता सुधारणे हा त्या उपक्रमांचा हेतू होता. शाळेतील सहकाऱ्यांच्या सहाय्याने दाभोलकरांनी टिळक महाराष्ट्र विद्यापीठ, महाराष्ट्र राष्ट्रभाषा सभा, संयुक्त राष्ट्रसंघा(युनो) च्या स्पर्धा परीक्षांसोबत चित्रकला, व्यायाम, खेळ वगैरे स्पर्धांसाठी विद्यार्थ्यांना सतत प्रोत्साहित केले.

     स्वत: बी.एड. ची परीक्षा देताना दाभोलकरांनी ५ वी ते ७ वी करिता इंग्रजीतून ‘कंपायलेशन ऑफ इंग्लिश नर्सरी ऱ्हाईम्स विथ प्रॉपर इंट्रोडक्शन’ असे प्रकल्प तयार केले. तसेच त्याच इयत्तांसाठी हिंदीतून भाषिक संरचनात्मक स्वाध्यायमाला हे प्रकल्प तयार करून सादर केले. या दोन्ही प्रकल्पांसाठी त्यांना प्रथम पुरस्कार व बी.एड. साठी सर्वंकष गुणवत्ता पारितोषिक मिळाले. मुलांच्या प्रगत अभ्यासासाठी १९८३ पासून त्यांनी आयोजित केलेल्या ‘लेखन अभिव्यक्ति बोध’ व ‘कौशल’ आणि ‘सुलेखन बोध’ व ‘कौशल’ या परीक्षांचा लाखाहून अधिक विद्यार्थ्यांनी लाभ घेतला व आजही घेत आहेत.

     १९९९ ते २००१ या अवधीत दैनिक लोकसत्ता, दहावी मार्गदर्शन उपक्रमाचे प्रमुख समन्वयक व हिंदी विषयात लेखकांचे मार्गदर्शक म्हणून त्यांनी तीन वर्षे सातत्याने नियोजनबद्ध काम केले. माध्यमिक  हिंदी शिक्षक महामंडळाच्या जडणघडणीत, जिल्हा संघटना उभारण्यात त्यांचा सिंहाचा वाटा आहे. ‘हिंदी अध्यापक मित्र’ या त्रैमासिकाचे कार्यकारी संपादक म्हणून ते आजही काम पाहत आहेत. आकाशवाणी व दूरदर्शनवर तसेच शैक्षणिक पत्रिकांतून शिक्षक आणि विद्यार्थ्यांना त्यांनी मार्गदर्शन केले. दाभोलकर बालमोहन विद्यामंदिरात ३८ वर्षे सेवा करून निवृत्तीनंतर महाराष्ट्र राष्ट्रभाषा सभा, पुणे या संस्थेत ‘प्रचार शिक्षण प्रमुख’ म्हणून कार्यरत आहेत. दाभोलकरांच्या या वाटचालीत व यशस्वी उपक्रमांच्या श्रेयात त्यांच्या पत्नीची मोलाची साथ मिळत राहिली आहे.

     दाभोलकरांच्या शैक्षणिक कामगिरीसाठी त्यांना मिळालेले महत्त्वाचे पुरस्कार खालीलप्रमाणे आहेत-  १९८६ - महाराष्ट्र शासनाकडून शैक्षणिक व सामाजिक विशेष उल्लेखनीय कामगिरीबद्दल आदर्श शिक्षक पुरस्कार.  हिंदी साहित्यिक व प्रचार कार्यासाठी राष्ट्रनेते एस.एम. जोशी यांच्या हस्ते विशेष पुरस्कार.

     सर्वोत्कृष्ट हिंदी शैक्षणिक सेवार्थ पं. दीनदयाळ पुरस्कार (१९९९), समर्पित सेवा, निष्ठावान अध्यापक, प्रचारक, कार्यकर्ता म्हणून महाराष्ट्र राष्ट्रभाषा सभेच्या हीरक महोत्सव प्रसंगी तत्कालीन उपराष्ट्रपतींच्या हस्ते सन्मानपत्र. (१९९८). म. रा. हिंदी साहित्य अकादमीतर्फे पद्मश्री अनंत गोपाल शेवडे हिंदी सेवा पुरस्कार (२००१)

     दाभोलकरांचे लेखन, संपादन व अनुवाद कार्य -

     प्रायोगिक हिंदी व्याकरण, रचना (१९६६), व्यावहारिक हिंदी शब्दलेखन, मानक हिंदी वाक्यरचना, हिंदी बालवाणी (पाठ्यपुस्तक) (२००२), उच्च माध्यमिक शिक्षक प्रशिक्षण मार्गदर्शिका, हिंदी स्वयं अध्ययन माला (भाग १ से ७), हिंदी व्याकरण रचना : संदर्भ ग्रथ (सहसंपादक डॉ. अशोक कामत), स्टेप इन कॉन्व्हरसेशन (स्पोकन इंग्लिश) हिंदी - इंग्रजी, मराठी - इंग्रजी (सहसंपादक लिमये), जनसंख्या विस्फोट (अनुवाद) याशिवाय अनेक विषयांवर वृत्तपत्रीय लेखन व अनुवाद कार्य केले आहे.

- वि. ग. जोशी

दाभोलकर, गोविंद मधुसूदन