Skip to main content
x

दाणी, शांताबाई धनाजी

शांताबाई धनाजी दाणी यांचा जन्म नाशिक येथे झाला. नाशिकमध्ये चौक मंडईच्या ख्रिश्‍चन शाळेत त्यांचे प्राथमिक शिक्षण झाले. नगरपालिकेच्या शाळेतून त्या व्हर्नाक्युलर फायनल परीक्षा उत्तीर्ण झाल्या. गुणवत्तेच्या जोरावर पुण्यातील स्त्रियांच्या सरकारी प्रशिक्षण महाविद्यालयामधून त्यांनी प्रशिक्षण घेतले.

नाशिकला आल्यानंतर निफाड तालुक्यातील विंचूर गावच्या प्राथमिक शाळेत शांताबाईंनी शिक्षक म्हणून नोकरी सुरू केली. त्यानंतर नांदगावच्या शाळेतही त्या होत्या. पण पुढील शिक्षणासाठी त्यांनी नोकरी सोडली. त्यांच्या हिंतचिंतक डॉ. लोंढे ह्यांच्या प्रेरणेने त्या सौराष्ट्रात गेल्या. तेथून त्यांनी मॅट्रिकची परीक्षा दिली. मॅट्रिक झाल्यानंतर त्या नाशिकला परतल्या आणि नाशिकच्या एच. पी. टी. महाविद्यालयामध्ये कला विभागात त्यांनी प्रवेश घेतला.

महाविद्यालयामध्ये शिक्षणासाठी  प्रवेश घेणाऱ्या शांताबाई या नाशिकमधील पहिल्या दलित विद्यार्थिनी. कर्मवीर दादासाहेब गायकवाड हे शांताबाईंचे मेहुणे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे विचार ऐकून व दादासाहेबांचे कार्य पाहून शांताबाईंचे जीवनध्येय निश्‍चित झाले - “आपल्या पीडित, शोषित, अत्याचारित भावंडांसाठी आयुष्याचा क्षण अन् क्षण वेचायचा, कण अन् कण खर्चायचा”. या ध्येयपूर्तीच्या दिशेने त्यांची वाटचाल सुरू झाली.

सन १९४८ मध्ये शांताबाई शेड्यूल कास्ट फेडरेशनच्या महाराष्ट्र राज्याच्या सरचिटणीस झाल्या. या कार्याच्या संदर्भात एका सत्याग्रहात येरवड्याला व नंतर जबलपूरला एक महिन्याचा तुरुंगवास त्यांना सोसावा लागला. १९५७ मध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या उपस्थितीत शांताबाईंनी बौद्ध धर्माची दीक्षा घेतली. १९५७ ते १९७८ या बारा वर्षांच्या काळात रिपब्लिकन पक्षाच्या महाराष्ट्र प्रदेश अध्यक्षा म्हणून त्या काम करीत होत्या.

संयुक्त महाराष्ट्र समितीच्या सदस्या म्हणूनही त्यांनी काम पाहिले. नागपूरच्या अखिल भारतीय महिला परिषदेच्या अध्यक्षा म्हणून त्यांची निवड झाली होती. आर्थिक मागासलेपणाच्या प्रश्‍नासंबंधी दलितांच्या मोर्चाचे, भूमिहीन दलित सत्याग्रहाचे नेतृत्व त्यांनी केले.

१९३२ पासून नाशिक जिल्हा दलित शिक्षण प्रसारक मंडळाच्या वतीने चालविल्या जाणाऱ्या नाशिक व मनमाड येथील वसतिगृहांच्या सरचिटणीस म्हणून शांताबाई काम करीत होत्या. १९४७ मध्ये नाशिकला मुलींसाठी रमाबाई आंबेडकर वसतिगृहाचे उद्घाटन डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या हस्ते झाले. त्यावेळी वसतिगृहाचे काम किस्मतबागेत चालायचे. वसतिगृहात वीस मुली होत्या. ह्या मुली परत गावी गेल्यावर त्या त्या गावात स्त्री नेतृत्व उभे राहावे, मुली बहुश्रुत व्हाव्यात हे स्वप्न शांताबाई पाहात होत्या. १९६५ पर्यंत मुलींची संख्या शंभरच्यावर गेली,  तेव्हा शांताबाईंनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर ज्ञान विकास मंडळ समितीच्या वतीने १९६५ च्या जून महिन्यात त्र्यंबकरोडवर किस्मत बागेच्या जवळ ‘रमाबाई आंबेडकर कन्या विद्यालया’ची स्थापना केली. गेल्या बेचाळीस वर्षांत शाळेची मोठी प्रगती झाली आहे. शांताबाईंनी शाळेसाठी गोल्फ ग्राऊंडवरील दोन एकरांची जागा शासनाकडून मिळविली आणि शाळेसाठी नवी इमारत उभी केली. पूर्वीच्या इमारतीत इंग्रजी व मराठी माध्यमातील ‘कुणाल प्राथमिक शाळा’ भरते.

१४ एप्रिल १९५९ ला नाशिक रोडला ‘तक्षशिला माध्यमिक शाळा’ काढली होती. या शाळेसाठी देवळाली गावातील पाच एकर जागा मिळविली. नाशिक रोडला ‘गौतम छात्रालय’ सुरू केले.

रमाबाई आंबेडकर कन्या विद्यालयात प्रवेश करणाऱ्या प्रत्येकाला बुद्धासारखी अथक परिश्रमांची, प्रयत्नांची, शोध घेणाऱ्या प्रवृत्तींची प्रेरणा मिळावी म्हणून ह्याच शाळेत १९९१ मध्ये एका अत्यंत रेखीव स्तूपाची उभारणी शांताबाईंच्या प्रयत्नातून झाली. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची पुण्याई, दादासाहेब गायकवाडांचे आशीर्वाद व शांताबाई दाणींचे कर्तृत्व या त्रिवेणी संगमातून आकाराला आलेली ही संस्था. ह्या संस्थेला शांताबाईंसारखी जबरदस्त कार्यकर्ती मिळाली आणि यशाची निश्‍चिती झाली.

शांताबाईंनी विपुल प्रासंगिक लेखन केले. त्यांच्या ‘रात्रंदिन आम्हा’ ह्या आत्मचरित्रात्मक ग्रंथाचे शब्दांकन भावना भार्गवे ह्यांनी केले आहे. ‘चंदनाची छाया’ हे शांताबाईंनी लिहिलेले दुसरे पुस्तक.

शांताबाईंनी राजकीय, सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रात केलेल्या कार्यामुळे त्यांचा अनेक पुरस्कारांनी गौरव झाला. या पुरस्कारात मुंबई महिला गौरव पुरस्कार, महाराष्ट्र राज्य सावित्रीबाई फुले पुरस्कार, राष्ट्रपती पुरस्कार अशा पुरस्कारांचा समावेश आहे. १९६८ मध्ये मलेशियातील ‘धम्म परिषदे’त विशेष अतिथी म्हणून त्यांना निमंत्रण होते. १९७० मध्ये जपानला संपन्न झालेल्या ‘शांती परिषदे’स शांताबाई उपस्थित होत्या त्या ‘शांतिसैनिक’ म्हणून. १९७२ मधील श्रीलंकेच्या जागतिक बौद्ध धम्म परिषदेसाठी त्यांना बोलविले होते. यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाने शांताबाईंना सन्मानपूर्वक ‘डी. लिट.’ ही पदवी प्रदान केली.

- प्रा. सुहासिनी पटेल

 

दाणी, शांताबाई धनाजी