Skip to main content
x

देहाडराय, वसंत बापूराव

             वसंत बापूराव देहाडराय हे विदर्भातील नागपूरमध्ये राहून आधुनिक पद्धतीने व जोमदार ब्रशच्या फटकाऱ्यातून निसर्ग-चित्रे, स्थिरचित्रे साकार करणारे चित्रकार होते. त्यांच्या आईचे नाव उमाबाई होते. अजमेरच्या महाराजांच्या निमंत्रणानुसार बापूराव अजमेरच्या शाळेत चित्रकलेचे शिक्षक म्हणून नोकरीला होते. त्यामुळे वसंत देहाडराय यांचे शालेय शिक्षण सरकारी शाळेमध्ये झाले.

             शाळेत लाकडी चरख्याला ट्रेसपेपर गुंडाळून त्यावरून प्रकाशझोतात काही कार्टून चित्र दाखविणाऱ्या या विद्यार्थ्याला शाळेतल्या शिक्षकांनी प्रोत्साहन दिले. १९३५-३६ दरम्यान त्यांनी शाळेच्या कार्यक्रमासाठी पडदा रंगविला. स्वत:च्या हौसेसाठी छायाचित्रणाचे दुकान सुरू करणाऱ्या वडिलांकडून त्यांना  छायाचित्रणाची स्फूर्ती व प्राथमिक शिक्षण मिळाले. छायाचित्रणात पदविका घेण्यासाठी १९३७ मध्ये त्यांनी बडोद्यात कलाभुवन टेक्निकल इन्स्टिट्यूटमध्ये प्रवेश घेतला व १९४० मध्ये त्यांना डिप्लोमा मिळाला. छायाचित्रणातूनच त्यांना चित्रकलेची आवड निर्माण झाली.

             चित्रकार होण्यासाठी देहाडराय यांनी मुंबई गाठली व १९४१ मध्ये जे.जे.त प्रवेश घेतला. याच वेळी कवी म्हणून गाजलेल्या कमल बारोट नावाच्या एका मित्रामुळे वॉर्नर ब्रदर्सच्या स्टूडिओत त्यांना काम मिळाले. शिक्षणासोबतच पैसेही मिळू लागले. त्यांनी १९४५ मध्ये ड्रॉइंग अ‍ॅण्ड पेंटिंगची पदविका घेतली आणि १९४६ च्या बॉम्बे आर्ट सोसायटीच्या प्रदर्शनात त्यांना कांस्य पदक मिळाले. त्यानंतर १९४८ मध्ये ते मुंबईऐवजी मूळ गावी म्हणजेच नागपूर येथे कौटुंबिक कारणामुळे परतले. देहाडराय नागपूरातल्या गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये नोकरी करू लागले व पुढील आयुष्य ते शैक्षणिक क्षेत्रातच वावरले.

             रचनाचित्र, स्थिरचित्र, रेखाटने व व्यक्तिचित्रे करणारे देहाडराय दर्जेदार निसर्गचित्रेही रंगवीत. त्यांनी रंगविलेली अजमेर, उदयपूर, माउण्ट अबू, छत्रपती शिवाजी टर्मिनस (व्हीटी स्टेशन), मुंबई अशी अनेक निसर्गचित्रे उल्लेखनीय आहेत. देहाडराय यांच्या चित्रांचे वैशिष्ट्य म्हणजे सूक्ष्म तपशील न रंगवता ते निसर्ग, वास्तू व वातावरणाचे सौंदर्य थेट पद्धतीने व आधुनिक दृष्टिकोन ठेवून व्यक्त करीत. तजेलदार रंग व ब्रशच्या जोमदार फटकाऱ्यांतून निर्माण होणाऱ्या त्यांच्या या निसर्गचित्रांचे रझा व गाडे यांच्या चित्रांशी साम्य आढळते. याशिवाय त्यांच्या स्थिरचित्रांवर क्यूबिझम व फॉविझमचाही प्रभाव आढळतो.

             नागपुरात कलाशिक्षणाचा प्रसार आणि कलेचे वातावरण तयार व्हावे तसेच विद्यार्थ्यांना पदवी शिक्षण मिळावे म्हणून नागपूर विद्यापीठात १९५५ मध्ये ‘बोर्ड ऑफ स्टडीज’साठी ते आग्रही राहिले. यानंतरच्या काळात त्यांनी छायाचित्रण व अमूर्त शैलीतील चित्रासंदर्भात प्रयोग केले. हौशी छायाचित्रकारांसाठी त्यांनी ‘फोटोग्रफिक सोसायटी ऑफ द सेंट्रल प्रोव्हिन्सेस अ‍ॅण्ड बेरार’ नावाचा क्लब स्थापन केला.

             देहाडराय यांनी मुंबईत १९७२ मध्ये जहांगीर आर्ट गॅलरी व १९७३ मध्ये आर्टिस्ट सेंटर येथे प्रदर्शन आयोजित केले. छायाचित्रणासाठी १९६१ च्या राज्य कला प्रदर्शनात त्यांना कांस्य पुरस्कार मिळाला, तर मध्यप्रदेश कला परिषदेने १९७४ मध्ये आणि आयफेक्स, दिल्लीने १९८८ मध्ये त्यांचा सन्मान केला. भारतीय चित्रकलेबद्दलचे स्वत:चे मत व्यक्त करण्यासाठी त्यांनी ‘माय व्ह्यूज ऑन प्रेझेंट डे आर्ट ट्रेण्ड इन इंडिया’ हा लेख लिहिला. ते नागपूरच्या चित्रकला महाविद्यालयाचे १९७० ते १९७८ या काळात प्राचार्य होते.

             शिक्षक म्हणून मन:पूर्वक कार्य करणार्‍या वसंत देहाडराय यांनी एका विद्यार्थ्याला पाश्‍चात्त्य देशात शिक्षण मिळावे म्हणून स्वत:चे घर गहाण ठेवून कर्ज मिळवून द्यायला मदतही केली! मात्र शिक्षक व संस्थाप्रमुख या भूमिकेतून काम करीत असताना त्यांच्या कलानिर्मितीवर मर्यादा पडल्या.

- विकास जोशी

देहाडराय, वसंत बापूराव