Skip to main content
x

देसाई, कांतिलाल ठाकोरदास

    मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायाधीश तसेच  गुजरात उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश कांतिलाल ठाकोरदास उर्फ के.टी. देसाई यांचा जन्म सुशिक्षित कुटुंबात झाला. त्यांचे सर्व शिक्षण मुंबई येथे झाले. १९२४मध्ये त्यांनी मुंबई विद्यापाठाची पदवी संपादन केली. नंतर १९२६मध्ये त्यांनी एलएल.बी पदवी संपादन केली. त्यानंतर १९२८मध्ये त्यांनी मुंबई उच्च न्यायालयाची अ‍ॅटर्नीची परीक्षा आणि १९३०मध्ये मुंबई उच्च न्यायालयाच्या मूळ शाखेच्या अ‍ॅडव्होकेटची परीक्षा दिली. पुढे १९३०मध्येच त्यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या मूळ शाखेत अ‍ॅडव्होकेट म्हणून वकिली सुरू केली. त्यांची मुद्देसूद दावा मांडण्याची पद्धत आणि कायद्याच्या बारकाव्यांवरील त्यांचे प्रभुत्व यांमुळे एक उत्तम वकील म्हणून त्यांचा अल्पावधीत नावलौकिक झाला. व्यापारविषयक कायद्यावर त्यांचे विशेष प्रभुत्व होते. तथापि आपल्या वकिलीच्या काळात त्यांनी विविध क्षेत्रांतले आणि विविध कायद्यांखालील खटले यशस्वीरीत्या लढवले.

      १९५७मध्ये मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायाधीश म्हणून देसाई यांची नियुक्ती झाली. आपल्या ऋजु स्वभावाने, कायद्यावरील प्रभुत्वाने आणि निष्पक्ष न्यायदानामुळे त्यांनी लवकरच वकीलवर्गाचा विश्वास संपादन केला.

      नानावटी प्रकरणातील फौजदारी खटल्याचा निकाल लागल्यानंतर निर्माण झालेला गुंतागुंतीचा घटनात्मक प्रश्न उच्च न्यायालयाच्या ज्या पाच न्यायाधीशांच्या विशेष पूर्णपीठासमोर आला, त्याचे न्या.देसाई एक सदस्य होते. या पीठाचा एकमताचा निकाल हा मुंबई उच्च न्यायालयाच्या इतिहासातील एक महत्त्वाचा निकाल मानला जातो.

     मे १९६०मध्ये मुंबई राज्याचे विभाजन होऊन गुजरात राज्य अस्तित्वात आले, तेव्हा न्या.के.टी.देसाई यांची गुजरात उच्च न्यायालयात न्यायाधीश  म्हणून बदली झाली. परंतु त्याचबरोबर केंद्र सरकारने त्यांची एक-सदस्य राष्ट्रीय बँक न्यायाधिकरणाचे (नॅशनल बँक ट्रायब्यूनल) अध्यक्ष म्हणून नेमणूक केली. हे न्यायाधिकरण बँक कर्मचाऱ्यांच्या सेवाशर्तींमध्ये सुधारणा सुचविण्यासाठी स्थापन करण्यात आले होते. या पदावर असताना त्यांनी बँकिंगचा सखोल अभ्यास केला आणि बँक कर्मचारी व बँक व्यवस्थापन या दोघांचीही बाजू ऐकून निष्पक्षपणे आपला निवाडा दिला. बँकिंग क्षेत्रात प्रसिद्ध असलेला ‘देसाई निवाडा’ (देसाई अ‍ॅवॉर्ड) तो हाच होय.

      यानंतर लगेचच म्हणजे जानेवारी १९६१मध्ये न्या.देसाई यांची गुजरात उच्च न्यायालयाच्या सरन्यायाधीशपदी नियुक्ती करण्यात आली. यशस्वी कारकिर्दीनंतर २२ मे १९६३ रोजी ते पदावरून निवृत्त झाले. न्या. देसाई काही काळ प्रेस ट्रस्ट ऑफ इंडियाच्या संचालक मंडळाचे अध्यक्ष होते आणि सात वर्षे बेनेट कोलमन अँड कंपनीचे उच्च न्यायालय-नियुक्त अध्यक्ष होते. मुंबईच्या एशियाटिक सोसायटीचेही ते काही काळ अध्यक्ष होते.

     नंतरच्या काळात मुंबई व केरळ उच्च न्यायालयांच्या मुख्य न्यायाधीश आणि सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीश झालेल्या न्या.सुजाता मनोहर या न्या. देसाई यांच्या कन्या होत.

- डॉ. सु. र. देशपांडे

देसाई, कांतिलाल ठाकोरदास