Skip to main content
x

देऊसकर, गोपाळ दामोदर

            स्वातंत्र्यपूर्व काळात राजे, महाराजे, संस्थानिक व स्वातंत्र्योत्तर काळात अनेक प्रतिष्ठित शासकीय व खाजगी संस्था आणि उद्योजकांची दर्जेदार व्यक्तिचित्रे रंगविणारे श्रेष्ठ दर्जाचे व्यक्तिचित्रकार गोपाळ दामोदर देऊसकर यांचा जन्म अहमदनगर येथे झाला. वडील मिशन हायस्कूलमध्ये चित्रकला शिक्षक होते. त्यांचे आजोबा मूर्ती करत. देऊसकर दोन वर्षांचे असतानाच त्यांचे आई-वडील निवर्तले. काही वर्षांनंतर त्यांना हैद्राबादमध्ये निझामाच्या दरबारी असलेले त्यांचे काका चित्रकार आर.डब्ल्यू. देऊसकर यांच्याकडे राहण्यास जावे लागले. तेथेच त्यांचे मॅट्रिकपर्यंतचे शिक्षण पूर्ण झाले. पुढे त्यांनी मुंबई गाठली आणि १९२७ मध्ये त्यांनी सर जे.जे.स्कूल ऑफ आर्टमध्ये प्रवेश घेतला. शिकत असताना चुलत बहिणीचे यजमान नटवर्य बापूराव पेंढारकर यांच्या ललितकलादर्श नाटकमंडळीत त्यांची राहण्याची सोय झाली.

            त्यांनी १९३१ मध्ये जे.जे.मधील अभ्यासक्रम पूर्ण करून प्रथम क्रमांक आणि सुवर्णपदक पटकावले. विद्यार्थिदशेत असताना गोपाळ देऊसकरांंना अनेक पारितोषिके मिळाली. जे.जे.तील निवडक विद्यार्थ्यांच्या चित्रांचे तत्कालीन संचालक कॅप्टन ग्लॅडस्टन सॉलोमन यांनी लंडन येथे प्रदर्शन भरवले होते. तेथे देऊसकरांच्या चित्रांचे विशेष कौतुक झाले.

            जे.जे.तून पदविका घेऊन बाहेर पडल्यानंतर देऊसकरांनी चित्रकलेच्या क्षेत्रातील अनेक महत्त्वाची पारितोषिके व पदके संपादन केली. बॉम्बे आर्ट सोसायटीचे सुवर्णपदक, सिमला येथील प्रदर्शनात व्हाइसरॉयचे पदक, भारतीय रेल्वेचे प्रथम पारितोषिक ही त्यांपैकी काही महत्त्वाची पारितोषिके होत.

            कॅप्टन सालोमन यांनी १९३९ च्या ‘टाइम्स ऑफ इंडिया’च्या वार्षिकात देऊसकरांच्या पाश्‍चिमात्य व भारतीय शैलीतील प्रावीण्याचे विश्‍लेषण केले होते व पुढे भविष्यात त्यांच्याकडून दर्जेदार स्वतंत्र भारतीय चित्रशैलीची अपेक्षाही व्यक्त केली होती. परंतु देऊसकरांनी ‘व्यावसायिक व्यक्तिचित्रकार’ म्हणून स्वतःची कारकीर्द घडविली.

            युरोपात चित्रकलेचे पदव्युत्तर शिक्षण घेण्यासाठी देऊसकरांना हैद्राबादच्या निझाम सरकारची पाच वर्षांकरिता शिष्यवृत्ती मिळाली होती. लंडनमधील ‘रॉयल अकादमी’त त्यांनी शिक्षण घेतले. त्या संस्थेच्या जागतिक कला प्रदर्शनांत सातत्याने पाच वर्षे कलाकृती प्रदर्शित करण्याचा बहुमान मिळवणारे एकमेव भारतीय कलावंत म्हणून देऊसकर प्रसिद्धीस आले. याच काळात ब्रिटिश वसाहतीतील विविध देशांत प्रदर्शित करण्यासाठी त्यांची चित्रे रॉयल अकॅडमीने निवडली होती. त्यामुळे त्यांच्या शिष्यवृत्तीत वाढ करण्यात आली.

            देऊसकरांची ‘शकुंतला’ व ‘अ बुल्स हॉलिडे’ अशी शीर्षके असलेली चित्रे १९३६ व १९३८ च्या रॉयल अ‍ॅकडमीच्या प्रदर्शनात लंडनमध्ये प्रदर्शित करण्यात आली. सध्या ती वडोदरा येथील संग्रहालयात आहेत. या काळात ही चित्रे मराठी नियतकालिकांच्या मुखपृष्ठांवर छापली गेली व त्याबद्दल श्‍लील-अश्‍लीलतेच्या संदर्भात वादही झाला. युरोपातून भारतात परतल्यावर वयाच्या एकोणतिसाव्या वर्षी गोपाळ देऊसकरांची सर जे.जे. स्कूल ऑफ आर्टचे उपसंचालक म्हणून १९४० मध्ये निवड झाली. याच दरम्यान त्यांचा प्रथम विवाह कमल मराठे यांच्याशी झाला. परंतु दोन वर्षांनंतर त्यांनी नोकरीचा राजीनामा दिला.

            हैदराबादच्या निझामासाठी ‘सर हैदर’ यांचे तैलरंगातील पूर्णाकृती व्यक्तिचित्र देऊसकरांनी १९३८ मध्ये तयार केले. बडोदा संस्थानचे महाराज प्रतापसिंह गायकवाड यांनी देऊसकरांना राज्यारोहणाच्या सोहळ्याचे चित्र काढण्यासाठी आमंत्रित केले. महाराज घोड्यावर बसलेले आहेत व मानवंदना घेत आहेत, मागे सेना उभी आहे असे हे भव्य चित्र आजही लक्ष्मीविलास पॅलेसच्या दरबार सभागृहामध्ये आहे. यानंतर देऊसकरांनी अनेक वर्षे तेथे राहून महाराणी शांतादेवी, सीतादेवी, फत्तेसिंहराव गायकवाड अशा अनेक राजघराण्यातील व्यक्तींची उत्तमोत्तम व्यक्तिचित्रणे केली.

            जगातील मोजक्याच सुंदर स्त्रियांपैकी एक म्हणून ज्यांचा नावलौकिक होता, अशा जयपूर संस्थानच्या महाराणी गायत्रीदेवी व जयपूरचे महाराज यांची अत्यंत दर्जेदार व्यक्तिचित्रे त्यांना प्रत्यक्ष समोर बसवून देऊसकरांनी केली आहेत. त्यामुळे त्यांची प्रसिद्धी होऊन इतर संस्थानांतून त्यांना आमंत्रणे येऊ लागली. अशा तऱ्हेने जयपूर, कूचबिहार, पोरबंदर, जुनागड, हैदराबाद, बडोदा, धार इ. विविध संस्थानांमधून राजघराण्यातील व्यक्तींची व्यक्तिचित्रे देऊसकरांच्या कुंचल्यातून साकार होत गेली.

            देशाला स्वातंत्र्य मिळाले व संस्थाने खालसा झाली. पण देऊसकरांची प्रसिद्धी एक श्रेष्ठ व्यक्तिचित्रकार म्हणून देशभर पसरली होती. त्यामुळे स्वातंत्र्योत्तर काळात व्यक्तिचित्र तयार करण्यासाठी भारतीय संसदेच्या सर्वपक्षीय समितीने अखिल भारतीय पातळीवर १९५५ मध्ये देऊसकरांची निवड केली. संसदभवन, राष्ट्रपतिभवन, दिल्ली महानगरपालिका, कलकत्त्याचे व्हिक्टोरिया मेमोरिअल म्युझियम, मुंबईतील विधानभवन, सर्वोच्च न्यायालय, मुंबईचे उच्च न्यायालय, उद्योगपतींची भवने, सार्वजनिक वास्तू यांच्या भिंती देऊसकरांनी रंगवलेल्या कलात्मक व्यक्तिचित्रांनी सुशोभित होऊ लागल्या.

            लंडनमधील ‘इंडिया हाउस’मध्ये असलेली राजा राममोहन रॉय आणि लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांची व्यक्तिचित्रे देऊसकरांनीच केली. जे.आर.डी. टाटा, अ‍ॅटर्नी जनरल ऑफ इंडिया, सेटलवाड यांचे व्यक्तिचित्र, आचार्य अत्रे, चिपळूणकर अशा साहित्यिकांची व रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे गव्हर्नर व सेना/हवाई दलातील महत्त्वाच्या व्यक्तींची व्यक्तिचित्रे देऊसकरांच्या कुंचल्यातून साकार झालेली आहेत. १९६६ मध्ये देऊसकरांचा द्वितीय विवाह उषा मोने म्हणजेच जुईली देउस्कर यांच्याशी झाला.

            गोपाळ देऊसकर महाराष्ट्रातील सर्वसामान्यांमध्ये ओळखले जातात ते पुण्याच्या बालगंधर्व रंगमंदिरात त्यांनी १९६९ मध्ये रंगविलेल्या बालगंधर्वांच्या दोन अप्रतिम व्यक्तिचित्रांमुळे. बालगंधर्वांचे पुरुषी देखणे रूप व स्वयंवर नाटकातील रुक्मिणीच्या भूमिकेतील बालगंधर्वांचे चित्र म्हणजे उपलब्ध छायाचित्राच्या आधारे रंगविलेले ‘बालगंधर्व’  नाहीत. त्यात देऊसकरांनी बालगंधर्व या जनमानसावर अधिराज्य गाजवणार्‍या नटश्रेष्ठांची प्रतिमा रंगविली आहे. चित्रातील प्रत्येक वस्तूचा पोत दाखविण्याचे कसब देऊसकरांच्या या दोन चित्रांमधून प्रकर्षाने दिसून येते.

            व्यक्तिचित्रणाची देऊसकरांची खास शैली होती. व्यक्तिचित्रणात जिवंतपणा व परिपूर्णता आणण्यासाठी ते अतोनात श्रम घेत. व्यक्ती जिवंत असल्यास ते त्या व्यक्तीला समोर बसवून चित्र करीत. दिवंगत व्यक्तीच्या व्यक्तिचित्रणा-साठी त्या व्यक्तीशी साधर्म्य असणाऱ्या मॉडेलचा ते शोध घेत. त्या व्यक्तीची वेशभूषा व दागदागिने इत्यादी सर्व गोष्टींची जमवाजमव करून अभ्यास करीत व त्यानंतरच त्यांचे व्यक्तिचित्र तयार होत असे.

            रेखाटनावरील प्रभुत्व, रंगछटांची उत्तम जाण, काही भागांत पातळ रंगलेपन तर काही भागांत जाड रंगलेपन, चेहऱ्यावरच्या उंच-सखल भागांचा विचार करून कॅन्व्हसवर लावलेले जोमदार व जोरकस ‘ब्रश स्ट्रोक’, पार्श्‍वभूमीवर ‘पेंटिंग नाइफ’चा वापर करून केलेले रंगलेपन यांतून निर्माण होणारा त्रिमित घनाकार व खोलीचा आभास, मोहक रंगसंगती व रंगांचा तजेलदारपणा ही त्यांची खास वैशिष्ट्ये होत. परंतु त्यांना हे शिकत असताना ऐन भरात असलेल्या भारतीयत्व जपणाऱ्या कला चळवळीचे किंवा आधुनिक प्रकारच्या कलाभिव्यक्तीचे कधीच आकर्षण वाटले नाही.

            ललित कला अकादमीने १९५९ मध्ये नऊ नामवंत भारतीय कलावंतांची सन्मानपूर्वक निवड केली, त्यांत देऊसकरांची निवड होऊन त्यांनी विविध पदांवर सहा वर्षे काम केले. व्हिएन्ना येथे १९६० मध्ये ‘दृश्यकला’ या विषयावरील आंतरराष्ट्रीय परिषदेसाठी त्यांनी भारताचे प्रतिनिधित्व केले.

            जयवंतराव टिळक यांनी १९७१ मध्ये देऊसकरांना पुण्यात आमंत्रित करून टिळक स्मारक मंदिरासाठी त्यांच्याकडून लोकमान्य टिळकांच्या जीवनावरील ‘कर्मयोग’ हे ७ फूट × ५० फूट आकाराचे मोठे भित्तिचित्र तयार करून घेतले.

            आयुष्यभर व्यावसायिक स्वरूपाची अनेक व्यक्तिचित्रे देऊसकरांनी केली. आयुष्याच्या उत्तरार्धात १९७७ पासून पुण्याच्या फर्गसन महाविद्यालयासाठी संस्थापक व शंभर वर्षांतील काही नामवंतांची व्यक्तिचित्रे ‘विनामूल्य देणगी’ या स्वरूपात करून देण्याचा करार देऊसकरांनी केला. त्यासाठी त्यांना आवारात राहण्यासाठी बंगला व पेंटिंगसाठी स्वतंत्र स्टूडिओ उपलब्ध करून दिला होता. तेथे त्यांनी लोकमान्य टिळक, आगरकर, ना.म. जोशी, रँग्लर परांजपे, रँग्लर महाजनी, डॉ. श्रीराम लागू, पु.ल.देशपांडे अशा अनेक नामवंतांची व्यक्तिचित्रे केली व ती आजही फर्ग्युसनच्या संग्रहात आहेत. महाराष्ट्र राज्य कला-प्रदर्शनाच्या रौप्यमहोत्सवानिमित्त १९८६ मध्ये महाराष्ट्र राज्य कलासंचालनालयातर्फे पं.भीमसेन जोशी यांच्या हस्ते व पु.ल.देशपांडे यांच्या अध्यक्षतेखाली गोपाळ देऊसकर यांचा सत्कार करण्यात आला.

            १९९४ मधील त्यांच्या मृत्यूनंतर नेहरू सेंटरतर्फे ‘ग्रेट इंडियन मास्टर’ या मालिकेत त्यांच्या चित्रांचे प्रदर्शन करण्यात आले.

- श्रीकांत जाधव

संदर्भः १. नेहरू सेंटर, मुंबई; गोपाळ देऊसकरांच्या चित्रप्रदर्शनाचा कॅटलॉग (१२ डिसेंबर ते १८ डिसेंबर १९९५) 

२. बाबूराव सडवेलकर, सुहास बहुळकर, माधवी कामत (जोशी), श्रीकांत जाधव यांचे लेख आणि दामू केंकरे यांची मुलाखत.

देऊसकर, गोपाळ दामोदर