Skip to main content
x

देव, नारायण केशव

       पं.नारायण केशव देव यांचा जन्म नाशिकला झाला. देव घराणे हे पूर्वीपासून वैदिक घराणे म्हणून प्रसिद्ध होते. नगरपालिकेच्या प्राथमिक शाळेत नारायणशास्त्रींचे औपचारिक शिक्षण झाले. गुरू शंकरशास्त्री शौचे, श्रीरामकृष्णशास्त्री चंद्रात्रे व बाळंभट गोडसे ह्यांच्याकडे त्यांनी वेदांचे अध्ययन केले. पुढील शिक्षणासाठी ते बडोद्यास गेले. पूर्वाष्टकसंहिता, पदक्रमक्षरा व घनान्त अध्ययन पूर्ण करून नारायणशास्त्री नाशिकला आले आणि नाशिकमध्ये वेदांच्या अध्यापनास त्यांनी सुरुवात केली.

     नाशिकमधील तिवंधा भागात एका मोठ्या हवेलीवजा इमारतीत नारायणशास्त्रींनी वेदपाठशाळेची स्थापना केली. संहिता, पदक्रम, जटा आणि घनांत अनेक उत्तम शिष्य घडण्यास सुरुवात झाली. अध्यापनाच्या बाबतीत शास्त्री अतिशय कडक शिस्तीचे होते. पण त्यांचे मन मात्र आपल्या शिष्यांवरील प्रेमाने भरलेले असे. अनेक प्रकारांनी गुरुजी शिष्यांना मदत करीत असत. अशीच पाच वर्षे गेल्यानंतर पुढील वीस वर्षांचा काळ शास्त्रींनी स्वत:च्या घरात पाठशाळा नेली व सातत्याने अध्यापनाचे कार्य चालू ठेवले. गुजरातमधील लिंबडी संस्थानचे राजे यशवंत सिंह नाशिकला आले असताना त्यांनी पाठशाळेला भेट दिली. गुरुजींच्या विद्याध्यापनाच्या कार्यामुळे त्यांना समाधान वाटले. पुढील चार वर्षे सातत्याने दरमहा दहा रुपयांचे साहाय्य ते करीत होते. याच काळात नाशिकमधील व नंतर भारतीय पातळीवर नाव मिळविणारे श्रीधरशास्त्री वारे, जगन्नाथशास्त्री गर्गे, गोपाळशास्त्री गर्गे नारायणशास्त्रींच्या तालमीतच तयार झाले आणि भारतभरात वैदिक म्हणून ह्या सर्वांचा गौरव झाला.

     १९१३ मध्ये गोदातीरावरील गोदावरी मंदिरात नारायणशास्त्रींनी अनेक वैदिकांच्या उपस्थितीत घनाचे कंठस्थ पारायण केले. त्यावेळी गुरुजींचा व्यासंग, अध्यापन कौशल्य, विद्यार्थ्यांविषयीची तळमळ व सौहार्दपूर्ण वागणूक पाहून त्या काळात एक हजार रुपये प्रदान करून नाशिककरांनी त्यांचा सन्मान केला.

      संकेश्‍वर विद्यापीठाचे स्वामी शंकराचार्य नाशिकक्षेत्री आले असता नारायणशास्त्रींनी शिष्यवर्गासह वेदाचे सार विकृतिघना मंत्रजागर केले. त्यावेळी अत्यंत समाधानाने शंकराचार्यांनी त्यांना ‘वैदिक रत्न’ ही पदवी दिली. पुण्याच्या वेदोत्तेजक संस्थेने त्यांना ‘वेदाचार्य’ पदवी दिली व सन्मानपत्र देऊन त्यांचा मोठा गौरव केला.

     - प्रा. सुहासिनी पटेल

देव, नारायण केशव