Skip to main content
x

धुरंधर, अंबिका महादेव

        अंबिका महादेव धुरंधर या गंगूबाई व चित्रकार रावबहादूर एम.व्ही. धुरंधरांच्या कन्या. त्या त्यांचे वडील रावबहादूर धुरंधर यांच्या चित्रशैलीच्या प्रभावाखाली चित्रनिर्मिती करीत, त्यांचा विपुल चित्रसंग्रह सांभाळत व त्या काळाच्या प्रभावाखाली आयुष्यभर जगल्या. प्रत्यक्ष जीवनात व कलेच्या क्षेत्रात झालेल्या स्थित्यंतराची दखल घ्यावी असे त्यांना वाटले नाही. परिणामी, त्यांच्या तरुणपणातला सर जे.जे. स्कूलच्या अकॅडमिक शैलीच्या सुवर्णकाळाचा प्रभाव त्यांच्यावर कायम राहिला. त्यांचा जन्म मुंबईत झाला आणि धुरंधर सर जे.जे. स्कूल ऑफ आर्टचे संचालक असल्यामुळे जे.जे.च्या अधिष्ठात्यांच्या बंगल्यात त्यांनी काही वर्षे व्यतीत केली.

        जे.जे.चा पदविका अभ्यासक्रम १९३१ मध्ये पूर्ण करून त्यांनी दुसरा क्रमांक मिळवला. त्या वेळी प्रसिद्ध चित्रकार गोपाळ देऊस्कर यांना प्रथम क्रमांक मिळाला होता. चित्रकार ज.द.गोंधळेकर, अँजेला त्रिंदाद हे त्यांचे इतर सहाध्यायी होते. अंबिका धुरंधरांनी लंडनची एफ.आर.सी.ए. पदविकाही घेतली. त्यांना बॉम्बे आर्ट सोसायटीचे रौप्यपदक मिळाले. सिमला, दिल्ली, बंगलोर, म्हैसूर, कोल्हापूर इत्यादी ठिकाणी त्यांच्या चित्रांची प्रदर्शने भरली आणि गाजली. या प्रदर्शनांमध्ये त्यांच्या चित्रांना अनेक पुरस्कारही मिळाले. बडोदा नरेश सयाजीराव गायकवाड यांच्या हीरक महोत्सवानिमित्त १९३५ मध्ये प्रजाजनांतर्फे सुवर्ण-रौप्य मंजूषेतून (पेटीतून) मानपत्र देण्याचे ठरले. या मंजूषेचे डिझाइन करण्याची स्पर्धा जाहीर करण्यात आली. त्यात अंबिका धुरंधरांनी भाग घेतला व त्यांच्या डिझाइनची निवड होऊन ते पारितोषिक त्यांना मिळाले.

        एम.व्ही. धुरंधरांचे १९४४ मध्ये निधन झाल्यानंतर त्यांच्या चित्रांची जोपासना व देखभाल करणे, त्यांच्या चित्रांची प्रदर्शने भरवणे हे कार्य अंबिका धुरंधरांनी सातत्याने केले. १९४९ मध्ये वडिलांच्या नावाने त्यांनी  खार येथे ‘धुरंधर कलामंदिर’ स्थापन करून अनेक विद्यार्थ्यांना कलेचे शिक्षण दिले.

        भारतीय स्वातंत्र्याच्या लढ्यामध्ये, तसेच नंतरच्या काळात संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीतही त्यांचा सहभाग होता. त्या अनुषंगाने त्यांनी काही चित्रेही काढली.

        अंबिका धुरंधरांनी त्यांच्या वडिलांप्रमाणे प्रामुख्याने पौराणिक व ऐतिहासिक विषयांवरची चित्रे काढली. त्यांच्या चित्रांवर धुरंधरांच्या शैलीचा मोठा प्रभाव होता. विविध आविर्भावातील अनेक मानवाकृतींचा वापर करीत ‘फिगर काँपोझिशन’ तयार करण्यावर चित्रकार धुरंधर यांच्याप्रमाणेच त्यांचे प्रभुत्व होते. बॉम्बे आर्ट सोसायटीच्या प्रदर्शनातील पारितोषिक विजेते चित्र ‘देवी अंबिका तिच्या योगिनीसह’ व ‘शिवराज्याभिषेक’ ही त्यांची चित्रे याची साक्ष देतात.

        रायगडावर १९८० मध्ये शिवछत्रपतींच्या तीनशेव्या जयंतीला भरलेल्या चित्रप्रदर्शनातील सर्व चित्रे अंबिका धुरंधरांची होती. तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधींच्या हस्ते या प्रदर्शनाचे उद्घाटन झाले होते. महाराष्ट्र राज्य रौप्यमहोत्सवी कलाप्रदर्शनात १९८४-८५ मध्ये विद्यार्थी विभागाच्या प्रमुख पाहुण्या म्हणून त्यांना आमंत्रित केले होते.

        मुंबईच्या महापौर बंगल्यात भरलेल्या चित्रप्रदर्शनात (२००५-०६) त्यांचे ‘शिवराज्याभिषेक’ हे तैलचित्र मोठ्या किंमतीस विकले गेले. त्यांनी युरोपियन यथार्थवादी शैलीत काही न्यूड पेंटिग्जही केली होती. त्यांचे ‘चांदबीबी’ हे जलरंगातील चित्र कोल्हापूरच्या दळवीज आर्ट इन्स्टिट्यूटमध्ये आहे. त्यांनी ‘स्त्री’ मासिकासाठीही काही चित्रे केली होती.

        अंबिका धुरंधरांनी वडिलांसोबत, तसेच नंतर स्वतंत्रपणे देश-विदेशांत भरपूर प्रवास केला. त्यांनी संपूर्ण युरोप पाहिला. संस्थानिकांची आमंत्रणे स्वीकारून रावबहादुरांसमवेत त्या बडोदा, ग्वाल्हेर, इंदूर, कोल्हापूर आदी अनेक संस्थानांमध्ये राहिल्या होत्या. औंधच्या राजेसाहेबांना चित्रकला शिकवायला रावबहादूर धुरंधर औंध संस्थानामध्ये काही वर्षे वास्तव्य करून होते. त्या काळात अंबिका धुरंधरही तिथे होत्या आणि त्यांनी तिथे अनेक चित्रे काढली.

        त्यांनी १९३०-५० या कालखंडात केलेल्या या प्रवासाच्या आठवणी वेळोवेळी लिहून ठेवल्या होत्या. त्या लेखांवर आधारित ‘माझी स्मरणचित्रे’ हे पुस्तक त्यांच्या मृत्यूनंतर २०१० मध्ये प्रकाशित झाले. हा लेखसंग्रह कलेचा इतिहास, तसेच त्या काळातली कलानिर्मिती, कलाशिक्षण, कलेचा व्यवसाय आणि व्यवहार जाणून घेण्याच्या दृष्टीने महत्त्वाचा आहे.

        आता अस्तंगत झालेल्या ब्रिटिशांच्या आणि संस्थानिकांच्या अभिरुचीने संस्कारित झालेल्या कलायुगाच्या अंबिका धुरंधर या साक्षीदार होत्या.

        त्या अविवाहित होत्या आणि खारच्या अंबासदनात एकट्याच राहत असत. वृध्दापकाळात आजारपणामुळे त्यांचे निधन झाले.

शर्मिला फडके

धुरंधर, अंबिका महादेव