Skip to main content
x

एकबोटे, गोपाळ अनंत

     गोपाळ अनंत एकबोटे यांचा जन्म औरंगाबाद जिल्ह्याच्या कन्नड तालुक्यातील एका छोट्या गावात झाला. त्यांचे प्राथमिक व माध्यमिक शिक्षण सरस्वती भुवन विद्यालय औरंगाबाद व शासकीय कनिष्ठ महाविद्यालय औरंगाबाद येथे झाले. हैदराबाद राज्यात वकिली करण्यासाठी आवश्यक असणारी परीक्षा देण्यासाठी त्यांनी लॉ-क्लासमधील अभ्यासक्रम पूर्ण केला व परीक्षा उत्तीर्ण होऊन ते वकिली करू लागले. प्रारंभीच्या काळात एकबोटे यांनी पुढे हैदराबाद उच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश झालेल्या न्या. श्रीपतराव पळनिटकरांचे साहाय्यक (ज्युनियर) म्हणून काम केले. नंतर वकिली करित असतानाच त्यांनी बी.ए. आणि एलएल.बी. या महाविद्यालयीन पदव्या संपादन केल्या.

     स्वातंत्र्यानंतरच्या काळात गोपाळराव एकबोट्यांनी राजकारणात सक्रिय भाग घ्यावयास सुरुवात केली. १९५२ साली ते सुलतान बाजार मतदारसंघातून हैदराबाद राज्याच्या विधानसभेवर काँग्रेस पक्षातर्फे निवडून आले. राज्यपुनर्रचनेत हैदराबाद संस्थानचे (राज्याचे) त्रिभाजन करून त्याचे तीन विभाग भाषिक आधारावर शेजारच्या तीन राज्यांत समाविष्ट करण्यास त्यांचा विरोध होता. परंतु त्रिभाजन झालेच. हैदराबाद राज्यातील  तेलुगुभाषी तेलंगणाचा विभाग आंध्र प्रदेश राज्यात समाविष्ट करण्यात आला, तर मराठीभाषी मराठवाड्याचा विभाग तेव्हाच्या द्वैभाषिक मुंबई राज्यात आणि उरलेला कन्नडभाषी विभाग तेव्हाच्या म्हैसूर (आताच्या कर्नाटक) राज्यात समाविष्ट करण्यात आला. त्याअगोदर २६ जानेवारी १९५४ पासून २१ ऑक्टोबर १९५६ पर्यंत एकबोट्यांनी हैदराबाद राज्याचे शिक्षण, स्थानिक स्वराज्य आणि संसदीय कार्यमंत्री म्हणून काम पाहिले. १ नोव्हेंबर १९५६ रोजी आंध्र अस्तित्वात आल्यानंतर एकबोटे पुन्हा विधानसभेवर निवडून आले. परंतु आता त्यांनी वकिलीवर लक्ष केंद्रित केले होते. त्यांना मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायाधीश होण्याची संधी होती, पण त्याचवेळी आंध्र प्रदेश उच्च न्यायालयाचे न्यायाधीश म्हणून ७ जून १९६२ रोजी त्यांच नियुक्ती करण्यात आली. १ एप्रिल १९७२ रोजी ते आंध्र प्रदेश उच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश झाले आणि ३१ मे १९७४ रोजी त्या पदावरून निवृत्त झाले.

     हैदराबाद शहरातील मराठी सांस्कृतिक व वाङ्मयीन संस्थांशी त्यांचा निकटचा संबंध होता. ग्रंथालयांना उदारपणे शासकीय मदत देऊ करणारा ग्रंथालय कायदा प्रथम एकबोट्यांनी हैदराबाद राज्यात अस्तित्वात  आणला. त्याचेच परिष्कृत रूप नंतर मुंबई राज्यात अमलात आले.

     अत्यंत गरिबीत आपले शिक्षण पूर्ण करून न्यायकारण आणि राजकारण या दोन्ही क्षेत्रांत एकबोट्यांनी आपल्या कार्याने लौकिक संपादन केला.

     - न्या. नरेंद्र चपळगावकर

एकबोटे, गोपाळ अनंत