Skip to main content
x

गजानन, महाराज

 

विदर्भातील बुलडाणा जिल्ह्यातील खामगाव तालुक्यात शेगाव येथे श्री गजानन महाराज (माघ वद्य ७, शके १८००) युवावस्थेतच प्रगट झाले. शेगावमधील देवीदास पातुरकर यांच्या घराबाहेर ऋतुशांती भोजन समारंभातील उष्ट्या पत्रावळी चाटताना सर्वप्रथम बंकटलाल अग्रवाल व दामोदरपंत कुलकर्णी यांना महाराजांचे दर्शन झाले. दिगंबर अवस्थेतील तेजस्वी अशा या व्यक्तीला ना कोणी पूर्वी पाहिले होते, ना कोणी ओळखत होते. त्यांनी आपले खरे नाव काय? कोठून आलो? आई- वडिल कोण? यांबद्दल कोणालाच काही सांगितले नाही. लोकांनीच त्यांना गजानन महाराजअसे नाव ठेवले व त्याच नावाने त्यांची प्रसिद्धी झाली.

या गजानन महाराजांचा शेगावमधील अवतार- कार्याचा काळ केवळ ३२ वर्षांचा आहे. १८७८ साली महाराज प्रगट झाले व १९१० साली त्यांनी समाधी घेतली. गजानन महाराजांनी ना प्रवचन केले, ना कीर्तन केले, ना अभंग लिहिले. आपल्या सहज लीलांतूनच त्यांनी लोकांना उपदेश केला. ते अत्यंत मोजके व तुटक- तुटक बोलत. भिंतीकडे वा शून्यात नजर लावूनच ते सर्वांशी बोलत असत. त्यांच्या सहज लीला या त्यांच्या सिद्धावस्थेच्या दृश्यरूप होत्या. विज्ञानाला शक्य न वाटणार्या, अतर्क्य अशा अनेक गोष्टी त्यांनी आपल्या योगसामर्थ्याने लोकांच्या समक्ष करून दाखविल्या. लोक अशा कार्यकारणभाव न समजणार्या गोष्टींना चमत्कार म्हणू लागले; पण स्वत:च्या लौकिक प्रसिद्धीसाठी त्यांनी ना चमत्कार केलेना भाबड्या लोकांना नादी लावून लुबाडले. गजानन महाराजांना अनेक भक्त अक्कलकोटच्या स्वामी समर्थांचे शिष्य मानतात. गजानन महाराज काही वर्षे स्वामींच्या सहवासामध्ये अक्कलकोट  येथे राहिले होते. त्यानंतर काही वर्षे ते बीड जिल्ह्यातील कपिलधार येथेही तपश्चर्येसाठी वास्तव्य करून होते. तपश्चर्येनंतर ते नाशिक येथे  यशवंत देव -मामलेदार यांना भेटले व पूर्वेस पदयात्रा करीत निघाले. पूर्वेला ते जेथे प्रथम थांबले ते गाव म्हणजे शेगाव!

गण गण गणात बोतेअसे ते बोटांचा ताल धरून सारखे म्हणत असत. हाच त्यांचा जन्ममंत्र असावा. वारकरी संप्रदायात जसा रामकृष्णहरीहा उघडा मंत्र जपला जातो, तसा गजानन महाराजांचे भक्त गण गण गणात बोतेहा जपमंत्र म्हणतात. गजानन महाराज कधी कधी चंदन चावल बेल की पतियाअशीही एक ओळ सस्वर म्हणत असत. त्यांचा मंत्र, तुटक-तुटक बोलणे, उच्चार आणि तेलुगू भाषेवरील प्रभुत्व ऐकून अनेक जण त्यांना तेलंगी ब्राह्मण समजतात, पण संतांना ना जात असते ना प्रांत-भाषेच्या सीमा.

त्यांचा राष्ट्रीय कार्यातील मदतीचा सहभाग व लोकमान्य टिळकांच्या सभेचे अध्यक्षस्थान भूषविण्याची घटना त्यांच्या ठायीचे देशप्रेमदर्शवितात. संतकवी दासगणू महाराज यांनी गजानन विजयपोथीमध्ये गजानन महाराजांच्या अवतार कार्याचा परिचय करून दिलेला आहे. त्यामध्ये लोकमान्य टिळक-गजानन महाराज भेटीच्या प्रसंगाचे वर्णन आहे. त्यांच्या सर्व लीलांमधून श्रद्धा, प्रेम, सचोटी, देशप्रेम, धर्मनिष्ठा, पशुप्रेम, अध्यात्म, निसर्ग, योग यांचाच बोध होतो. स्वामी समर्थ (अक्कलकोटकर) यांचे अवतारकार्य समाप्त होण्यापूर्वी केवळ २ महिने ७ दिवस आधी गजानन महाराज शेगावात प्रकट होणे यात एक सूत्र आहे, असे भाविक मानतात. (स्वामींनी समाधी घेतली  ३० एप्रिल १८७८ रोजी व गजानन महाराज प्रकट झाले २३ फेब्रुवारी १८७८ रोजी. शिर्डीचे साईबाबा गजानन महाराजांना भाऊ मानत होते’, असा स्पष्ट उल्लेख साईभक्त अण्णासाहेब दाभोळकर लिखित साईसच्चरितपोथीत आहे.

गजानन महाराजांनी भक्तांना एका ठिकाणी उत्खनन करण्यास सांगितले. तेव्हा उत्खननात राम-लक्ष्मण-सीताअशा सुंदर मूर्ती मिळाल्या. त्या मूर्तीसाठी महाराजांच्या सांगण्यावरून भव्य राममंदिर बांधले गेले. .. १९०७ साली या राममंदिराचे बांधकाम सुरू झाले व सात वर्षांनी (१९१४) म्हणजे गजानन महाराज समाधिस्थ झाल्यानंतर चार वर्षांनी पूर्ण झाले. या मंदिराच्या शेजारी पूर्व दिशेला आपली समाधी बांधावी अशी आज्ञा करूनच गजानन महाराज यांनी भाद्रपद शुद्ध पंचमी, दिनांक ८ सप्टेंबर १९१० रोजी समाधी घेतली.

आज शेगावचे श्री गजानन महाराज संस्थानमहाराष्ट्रातील एक आदर्श असे धार्मिक संस्थान आहे. या संस्थानाने पंढरपूर, आळंदी येथे आपल्या कार्याचा विस्तार केला असून भाविकांमध्ये भक्तिजागरणाचे कार्य निष्ठेने पार पाडले जात आहे.

विद्याधर ताठे