Skip to main content
x

गोखले, चंद्रकांत रघुनाथ

        चंद्रकांत रघुनाथ गोखले यांचा जन्म मिरज येथे झाला. त्यांचे वडील रघुनाथ व आई कमलाबाई हे दोघेही गायक-नट म्हणून रंगभूमीवर काम करीत असत. त्यामुळे चंद्रकांत गोखले यांना अगदी बालपणापासून गाण्याचे व अभिनयाचे बाळकडू मिळाले. वयाच्या आठव्या वर्षी ‘पुन्हा हिंदू’ या नाटकात छोटी भूमिका करून त्यांनी आपल्या कलाजीवनाचा श्रीगणेशा केला. त्यांच्या आई कमलाबाई या मराठी चित्रपटसृष्टीतील पहिल्या स्त्री कलाकार होत्या.

घरची गरिबी असल्याने चंद्रकांत गोखले यांना शालेय शिक्षण घेता आले नाही. पण त्यांनी आपल्या आईकडूनच मराठी व हिंदी भाषा शिकून घेतल्या. संगीताची सुरुवात आईकडूनच केली व नंतरच्या काळात मराठी रंगभूमीवर भूमिका करता करता ते मा. दीनानाथ मंगेशकर यांच्याकडूनही थोडेफार संगीत शिकले. बळवंत संगीत मंडळीमध्ये प्रमुख भूमिका करणारे मा. अविनाश व मा. दीनानाथ मंगेशकर यांचे गाणे ऐकून ते आत्मसात केले व त्यांना मनोमन आपले गुरू मानले.

मराठी नाटकात त्यांनी सुरुवातीला काही काळ स्त्री भूमिका केल्या व नंतर पुरुष भूमिका करायला सुरुवात केली. रंगभूमीवरील तब्बल पाऊण शतकाच्या प्रदीर्घ प्रवासात त्यांनी अण्णासाहेब किर्लोस्कर, राम गणेश गडकरी, वि.दा. सावरकर, मामा वरेरकर, मो.ग. रांगणेकर, विष्णुपंत औंधकर, प्र.के. अत्रे, पु.ल. देशपांडे, बाळ कोल्हटकर वगैरे लेखकांच्या विविध भूमिकांना आकार दिला. ‘कुलवधू’, ‘राणीचा बाग’, ‘राजे मास्तर’, ‘बॅरिस्टर’, ‘पुरुष’ ‘नटसम्राट’, ‘सिंहासन’, ‘झुंझारराव’ वगैरे एकूण ६४ नाटकांत त्यांनी भूमिका केल्या. ‘राजे मास्तर’ या श्री.ना. पेंडसे यांच्या ‘हद्दपार’ या कादंबरीवरून केलेल्या नाटकातील राजे मास्तरांची मुख्य भूमिका चंद्रकांत गोखले यांना मिळाली. एका साध्या शाळा मास्तरांच्या जीवनावर आधारलेले असे हे नाटक होते. या नाटकात त्यांच्यासोबत सुनीता देशपांडे, दत्ता भट, सुमती गुप्ते, श्रीकांत मोघे, मधू कदम आदी मंडळी काम करत होती. पण या नाटकाचे पुरसे प्रयोग होऊ शकले नाहीत. पुढे त्यांना जयवंत दळवी यांच्या ‘बॅरिस्टर’ या नाटकातील तात्याची छोटी पण उठावदार भूमिका करण्याची संधी मिळाली. तात्या हे पात्र खलनायकी होते. अशा खेडवळ, बेडर, आडदांड, दारुडा व लंपट तात्या आपल्या विधवा सुनेकडेही वासनेने पाहतो, याचा प्रत्ययकारी अभिनय गोखले करत असत. तर शिरवाडकरांच्या ‘नटसम्राट’ या नाटकाचे डॉ. श्रीराम लागू यांनी केलेले प्रयोग लक्षात घेऊनही चंद्रकांत गोखले यांनी वृद्ध आप्पासाहेब बेलवलकरांची भूमिका नव्या संचात केली व ती भूमिका यशस्वी करून दाखवली. त्यांनी ‘पुरुष’ या जयवंत दळवी लिखित नाटकातही महत्त्वपूर्ण भूमिका केली. या नाटकाची संहिता स्त्री-सबलीकरणाचे महत्त्व विशद करणारी आहे. आपले राजकारणी नेते आपल्या समाजाप्रती असणाऱ्या कर्तव्यापासून दूर जाऊन आपल्या परंपरा, संस्कृती, आदर्श या नीतिनियमांना धाब्यावर बसवतात व स्त्रीवर अन्याय करत राहतात, पण आधुनिक काळातील स्त्री आपल्यावर होणाऱ्या अन्यायाचा कशा प्रकारे बदला घेते, याचे वर्णन या नाटकात येते. या नाटकात चंद्रकांत गोखले यांनी आदर्शवादी समाजसेवक असणाऱ्या अण्णांची भूमिका पार पाडली. या भूमिकेला अनेक पदर होते. आदर्शवाद, देशभक्ती, चांगल्यासाठी झटणे, राष्ट्रीय पुरस्कार मिळाल्यामुळे आनंदी असणे, आपल्या मुलीवर झालेल्या बलात्कारामुळे दु:खी होणे, सामान्य माणसाला या जगात जगणे असाहय्य होणे व त्याने निराश होणे अशा अनेक गोष्टींमुळे या भूमिकेला न्याय देत चंद्रकांत गोखले यांनी ही भूमिका संस्मरणीय केली.  

नाटकात भूमिका करीत असतानाच १९३८ साली ‘लक्ष्मीचे खेळ’ या चित्रपटात त्यांनी सर्वप्रथम भूमिका केली. त्यानंतर त्यांनी जवळजवळ ७० मराठी व १५ हिंदी चित्रपटात चरित्र नायकाच्या भूमिका रंगवल्या. सहज अभिनय, एखाद्या व्यक्तिरेखेत स्वत:ला झोकून देणे हे त्यांचे विशेष गुण होते. ‘महाराणी येसूबाई’, ‘धाकटी जाऊ’, ‘भैरवी’, ‘मानिनी’, ‘माणसाला पंख असतात’, ‘सुवासिनी’, ‘सुखाची सावली’, ‘स्वप्न तेच लोचनी’, ‘धर्मकन्या’, ‘ईर्षा’, ‘मुक्काम पोस्ट ढेबेवाडी’, ‘जिवाचा सखा’ वगैरे मराठी चित्रपटातील त्यांनी केलेल्या भूमिका गाजल्या. तसेच त्यांनी हिंदी व मराठी दूरदर्शन मालिकांतही भूमिका केल्या.

नाट्यक्षेत्रात केलेल्या भूमिकेबद्दल चंद्रकांत गोखले यांना नटश्रेष्ठ ‘नानासाहेब फाटक’, ‘केशवराव दाते’, ‘मा. दीनानाथ’ यांच्या नावाने दिले जाणारे पुरस्कार लाभले. त्याखेरीज ‘अखिल मराठी नाट्य परिषद’, ‘चतुरंग प्रतिष्ठान’, ‘नाट्यदर्पण’, ‘कलारंजन’ या संस्थांतर्फे वेळोवेळी पुरस्कार लाभले. चित्रपटासाठी त्यांना ‘सुवासिनी’, ‘स्वप्न तेच लोचनी’, ‘धर्मकन्या’ व ‘ईर्षा’ या चित्रपटासाठी महाराष्ट्र राज्य पारितोषिके मिळाली. नाट्य-चित्रक्षेत्रातील कामगिरीबद्दल त्यांचा विविध संस्था व महाराष्ट्र राज्य यांनी वेळोवेळी बहुमान केला. अखेरच्या काळात मात्र त्यांना समारंभस्थळी प्रत्यक्ष जाऊन पारितोषिके घेणे प्रकृतिअस्वास्थ्यामुळे शक्य होईना. त्यामुळे ते पारितोषिकांचा सविनय अस्वीकार करू लागले.

त्यांनी १९९९ साली कारगिल जवानांसाठी पन्नास हजार रुपयांचा धनादेश दिला व नजीकच्या काळात आर्मी सेंट्रल वेलफेअर फंड व सदर्न कमांड पुणे यांच्याकडे तेवढेच पैसे देणगीदाखल जमा केले. त्यानंतर त्यांनी काही पैसे बँकेमध्ये मुदत ठेवीमध्ये गुंतवले. देशाची सेवा करताकरता अपंगत्व आलेल्या सैनिकांच्या मदतीसाठी ‘क्वीन मेरीज् टेक्निकल इन्स्टिट्यूट फॉर डिसेबल्ड सोल्जर्स’ या संस्थेला बँकेतील मुदत ठेवीच्या व्याजापोटी येणाऱ्या एक लाख रुपयांचा धनादेश दर वर्षी देण्याचा मानस केला. चंद्रकांत गोखले यांनी आपली आई कमला व पत्नी हेमा यांच्या स्मरणार्थ दर वर्षी दि.२६ फेब्रुवारी रोजी धनादेश देण्याचा प्रघात सुरू केला.

वयाच्या ८८ वर्षी कर्करोगासारख्या आजाराने गोखले यांचे पुणे येथे निधन झाले. त्यांनी आपल्या हयातीत सुरू केलेला अपंग सैनिकांना धनसाहाय्य करण्याचा उपक्रम त्यांच्या मृत्यूनंतरही सुरूच आहे.

- शशिकांत किणीकर

गोखले, चंद्रकांत रघुनाथ