Skip to main content
x

गोरे, शहाजी संभाजीराव

        हाजी गोरे यांनी १९६७ साली कृषी महाविद्यालय पुणे येथून पदवी घेऊन शेती करावयास सुरुवात केली. त्या वेळेस हरितक्रांतीची सुरुवात झाली होती. संकरित ज्वारीचे बियाणे सी.एस.एच.१ खरीपमध्ये पेरावयास उपलब्ध झाले होते. रब्बीमध्ये मेक्सिकन जातीचे गहू कल्याण सोना व सोनालिका उपलब्ध झाले. या नवीन जातीचे उत्पादन एकरी १५ ते २० क्विंटल मिळाले, हे उत्पादन पूर्वीच्या उत्पादनापेक्षा दुप्पट होते.

        तेरणा शेतकरी सहकारी साखर कारखान्याच्या शेती अधिकारी जोशी यांच्या मार्गदर्शनाखाली सीओ ७४० या जातीचे बेणे पाडेगावहून आणले. पूर्वी सीओ ४१९ ही उसाची जात होती. शहाजी गोरे यांनी उसाचे बेणे लावणे, ३ फुटांची सरी पाडणे, ३ डोळे उसाच्या काड्या लावणे, उसाची कोरडी लावण करणे, उसाची बांधणी करणे, मोट खांदणी बैलावर करणे, खोडव्याची मशागत बैलावर करणे, आडसाली उसाची लागवड करणे, या सर्व सुधारित पद्धतींचा अवलंब केल्यामुळे उसाचे उत्पादन ५० ते ८० टनांपर्यंत मिळू लागले. उसाच्या खोडव्याच्या पिकानंतर खोडकी तशीच ठेवून त्यामध्ये खरीपात मका, भात ही पिके घेतली. खोडकी तशीच जागेवर कुजवली, तर रब्बीमध्ये गव्हाचे उत्पादन चांगले येते, असे गोरे यांनी दाखवून दिले.

        गोरे यांनी १९८० साली १ डोळा ऊस लागवड करण्याच्या पद्धतीचा प्रचार केला. त्याप्रमाणे १ डोळा ऊस लागवड सुरू केली. बेणे कमी लागले, फुटवेही चांगले आले. कोल्हापूरचे कृषी अधिकारी पाटील यांनी पट्टा पद्धतीने ऊस लावण्याची शिफारस केली. यामध्ये पाणी कमी लागते. आंतरपीक भुईमूग घेता येत असल्यामुळे पट्टा पद्धत लागवड त्यांनी सुरू केली. त्यामुळे कमी पाण्यावर उसाचे पीक आले. १९९०नंतर उसाचे पाचट गोरे यांनी जाळले नाही. खोडवा उसात एक आड सरीमध्ये पाचट ठेवले, त्याला एक आड सरीने पाणी दिले. उसात पाचट ठेवल्यामुळे ऊस पिकाला सेंद्रिय खताचा पुरवठा झाल्यामुळे उसाला पाणी कमी लागले, तण कमी झाले, एक आड एक सरी ओलवून पाण्याची बचत केली.

        शहाजी गोरे यांनी २००० साली तामिळनाडूमधील शक्ती शुगर या कारखान्यात, ऑस्ट्रेलियन ऊस लागवड पद्धतीवर जे संशोधन झाले होते, त्यावर आधारित काही प्रयोग केले. त्यानुसार दोन ओळीतील अंतर ५ फूट ठेवून उत्पादन वाढते, हे दाखवून दिले.

- संपादित

गोरे, शहाजी संभाजीराव