Skip to main content
x

गुपचूप, विजय नरहर

विजय नरहर गुपचूप हे संरचना अभियांत्रिकी (स्ट्रक्चरल इंजिनिअरिंग) आणि अभियांत्रिकी शिक्षण (इंजिनिअरिंग एज्युकेशन) या दोन्ही क्षेत्रांतील सुप्रसिद्ध व्यक्तिमत्त्व. मुंबई विद्यापीठाची स्थापत्य अभियांत्रिकीमधील पदवी परीक्षा प्रथम श्रेणीत प्रावीण्यासह उत्तीर्ण झाल्यानंतर त्यांनी अमेरिकेतील मॅसॅच्युसेट्स इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीमधून डॉक्टरेट मिळविली. सॅन फ्रॅन्सिस्को, अमेरिका येथील बेक्टेल कॉर्पोरेशन व नवी दिल्ली येथील इंजिनिअर्स, इंडिया लिमिटेडमध्ये त्यांनी काम केले. कुशाग्र बुद्धिमत्ता, शिकवण्याची आवड आणि कौटुंबिक शैक्षणिक पार्श्वभूमी असल्यामुळे ते व्हिक्टोरिया ज्युबिली टेक्निकल इन्स्टिट्यूट (वीरमाता जिजाबाई टेक्नॉलॉजिकल इन्स्टिट्यूट) या मुंबईतील सुप्रसिद्ध अभियांत्रिकी महाविद्यालयात, १९६७ साली ते प्राध्यापक आणि विभागप्रमुख (संरचना अभियांत्रिकी) या पदावर रुजू झाले.

अल्पावधीतच ते उत्कृष्ट प्राध्यापक म्हणून प्रसिद्ध झाले. चतुरस्र वाचन, व्यासंग, शब्दांची अचूक निवड, आकर्षक सादरीकरण या गुणांमुळे ते विद्यार्थ्यांत लोकप्रिय झाले. १९७३ साली त्यांची संस्थेचे उपप्राचार्य म्हणून नेमणूक झाली. व्यवस्थापन कौशल्य आणि शिस्तप्रियतेमुळे त्यांच्याविषयी कर्मचाऱ्यांत आदरयुक्त दरारा होता. १९८३ साली ते संस्थेचे प्राचार्य व सचिव बनले आणि १९९७ साली ते निवृत्त झाले. त्या वेळी संस्थेचे नाव वीरमाता जिजाबाई टेक्नॉलॉजिकल इन्स्टिट्यूट (आद्याक्षरे मात्र व्ही.जे.टी.आय.) असे होते. मध्यंतरी, १९९२ ते मे १९९५ या कालावधीत मुंबई विद्यापीठाचे प्र-कुलगुरुपदही (प्रो-व्हाइस चान्सलर) त्यांनी भूषविले.

मुंबई, पुणे, नागपूर, इंदूर विद्यापीठ, तसेच बी.ए.आर.सी., एस.इ.आर.सी. आदी संशोधन करणाऱ्या संस्थांशी त्यांचा संबंध आला. विविध शासकीय तसेच खाजगी संस्थांचे सल्लागार म्हणून त्यांनी काम केले. भारतात आणि अमेरिकेत राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय परिषदांमध्ये तांत्रिक विषयांवर त्यांनी शोधनिबंध सादर केले.

संरचना अभियांत्रिकी संशोधन केंद्र, चेन्नई (एस.इ.आर.सी.) च्या संशोधन परिषदेचे ते अध्यक्ष होते. विद्यापीठ अनुदान आयोगाशी त्यांचा संबंध होता.

१९९४-९५ सालचा अभियांत्रिकी महाविद्यालयासाठी असलेला महाराष्ट्र राज्य शिक्षण पुरस्कार, योजनेच्या पहिल्याच वर्षी पटकाविण्याचा मान त्यांना मिळाला. इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअर्सने २००३ - ०४ या वर्षी ‘एमिनंट इंजिनिअर’ म्हणून त्यांचा गौरव  केला. अभियांत्रिकी शिक्षणाचा दर्जा उंचावण्यासाठी केलेल्या प्रयत्नांची नोंद घेऊन आणि गुंतागुंतीच्या संरचना अभिकल्पाचे निर्माते म्हणून अमेरिकन कॉन्क्रीट असोसिएशनच्या भारतातील शाखेने त्यांना पुरस्कार दिला.

मे.आयन एक्स्चेंज इंडिया लिमिटेड, द महिन्द्रा युनायटेड वर्ल्ड कॉलेज ऑफ इंडिया आणि तोलानी मेरिटाइम इन्स्टिट्यूट, महाराष्ट्र या संस्थांच्या संचालक मंडळावर ते संचालक म्हणून कार्यरत आहेत.

अणुऊर्जा नियंत्रण मंडळाच्या स्थापत्य अभियांत्रिकी सुरक्षितता समितीचे ते अध्यक्ष आहेत. अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेच्या पश्चिम विभागाचेही ते अध्यक्ष आहेत. तंत्रशिक्षण संदर्भात राष्ट्रीय स्तरावरील त्यांचे योगदान लक्षणीय आहे.

२००० ते २००३ या काळात ऑल इंडिया कौन्सिल ऑफ टेक्निकल एज्युकेशनने नेमलेल्या नॅशनल बोर्ड ऑफ अ‍ॅक्रिडिटेशनचे ते अध्यक्ष होते. मुंबई आणि मराठवाड्यातील बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठाच्या अनेक समित्यांवर त्यांनी काम केले आहे.

प्रा. भालचंद्र अवधूत नाईक

गुपचूप, विजय नरहर