Skip to main content
x

घळसासी, पराग शशिकांत

        सातारा परिसरात चित्रकार म्हणून काम करीत स्वतःची ओळख निर्माण करून त्या भागातील तरुण कलावंतांना प्रेरणा देणारा व मार्गदर्शन करणारा कलावंत म्हणून पराग शशिकांत घळसासी यांची ओळख आहे. त्यांच्या आईचे नाव माधुरी होते. त्यांचे बालपण कऱ्हाड येथे गेले. नंतरचे प्राथमिक शिक्षण सा.ए.सो.ची प्राथमिक शाळा व अनंत इंग्लिश स्कूल, सातारा येथे झाले पुण्यातील अभिनव महाविद्यालय, येथे पुढील शिक्षण घेत असतानाच वडिलांचे व आईचे निधन झाले. त्यामुळे घरची जबाबदारी सांभाळत असतानाच ड्रॉइंग अ‍ॅण्ड पेंटिंगमध्ये त्यांनी जी.डी. आर्ट ही पदविका १९९२ मध्ये प्राप्त केली.

        सुरुवातीच्या काळात प्रसिद्ध कलादिग्दर्शक नितीन देसाईंकडे त्यांनी साहाय्यक कलादिग्दर्शक म्हणून काम केले. दूरदर्शन मालिका ‘चाणक्य’, ‘१९४२ अ लव्ह स्टोरी’ सारख्या चित्रपटासाठी व ‘पाटण की प्रभुता’ या मालिकेसाठी पराग घळसासी यांनी कलादिग्दर्शनाचे स्वतंत्रपणे काम केले. दिग्दर्शक डॉ. चंद्रप्रकाश द्विवेदी यांच्यासाठी तसेच अनेक चित्रपटांसाठी साहाय्यक कलादिग्दर्शक म्हणून काम केले. परंतु फिल्मी दुनियेतील बेगडीपणा, व्यसनाधीनता व दांभिकता याला कंटाळून त्यांनी हे क्षेत्र सोडले व अविवाहित राहण्याचा निर्णय घेतला.

        प्रसिद्ध चित्रकार सुहास बहुळकर यांच्या समवेत १९९५-१९९६ या काळात नानाजी देशमुख यांच्या मध्यप्रदेशातील चित्रकूट येथील ‘रामदर्शन’ या प्रकल्पासाठी चित्रकार म्हणून सुरुवातीच्या टप्प्यात ते  कार्यरत होते. त्यात चित्रे, उठाव शिल्पे (रिलीफ) व डायोरामा यासारख्या कलाकृतींचे संकल्पन व रेखाटन करण्यात त्यांनी महत्त्वाची जबाबदारी पार पाडली.

        सोलापूर येथील शिवस्मारकासाठी २००२ ते २००५ या काळात संपूर्ण शिवचरित्र उठावशिल्पांच्या माध्यमात साकारताना या शिल्पांची त्यांची रचना, आरेखन व संकल्पन घळसासींनी यशस्विरीत्या केले. शिल्पकार अशोक सोनकुसरे यांच्या शिल्पांतून पराग घळसासींच्या सहकार्याने ते शिवचरित्र साकार झाले. याशिवाय त्यांनी पंढरपूरच्या रुक्मिणी मंदिरासाठी रुक्मिणी स्वयंवरावरील चित्रे रंगविली आहेत. बाबासाहेब पुरंदरेंच्या महाराजा प्रतिष्ठानाच्या संकल्पित शिवसृष्टीकरिता चित्र-संकल्पक म्हणून त्यांचे काम सुरू आहे.

        महाराष्ट्रातील कला महाविद्यालयांत व्याख्याने, चर्चा, तसेच रेखांकनाबद्दल मार्गदर्शन अशा स्वरुपाचे उपक्रम ते करतात.

        कोणत्याही काळातील विषय असला तरी त्या काळाचा व तत्कालीन वास्तुकला, वस्त्रप्रावरणे, दागदागिने अशा गोष्टींचा सखोल अभ्यास हे पराग घळसासी यांचे वैशिष्ट्य आहे. तसेच प्राणिसृष्टी व निसर्गाचे सूक्ष्म अवलोकन आणि मानवी शरीरशास्त्राचा अभ्यास आणि त्याची अभिव्यक्ती यांत त्यांनी प्रावीण्य मिळविले आहे.

        एखादा विषय पुराणकालीन असो की इतिहास- कालीन, पराग घळसासी ते वातावरण निर्माण करण्यात यशस्वी ठरतात. मानवी भावभावनांचे रेषांमधून प्रकटीकरणही त्यांना अवगत आहे; परंतु सातत्याने अशाच प्रकारच्या व्यावसायिक कामांत अडकल्यामुळे या कलावंताची क्षमता असूनही रंगलेपनातील सामर्थ्याकडे व स्वतःच्या निर्मितीकडे त्यांना पुरेसे लक्ष देता आलेले नाही. नुकतेच ‘प्रवास एका रेषेचा’ हे त्यांचे रेखाटनांसंदर्भातील पुस्तक प्रसिद्ध झाले आहे.

- विजयकुमार धुमाळ

घळसासी, पराग शशिकांत