Skip to main content
x

इनामदार, अरविंद सिद्धेश्वर

पोलीस महासंचालक, महाराष्ट्र राज्य

    अरविंद सिद्धेश्वर इनामदार यांचा जन्म सांगलीतील तडसर या गावी झाला. वडील सिद्धेश्वर यशवंत इनामदार हे पट्टीचे पहिलवान होते. ते धाडसी होते. त्यांचे शिक्षण एस.एस.सी. पर्यंत झाले होते. त्यांच्या आईचे नाव अहिल्या. वयाच्या आठव्या वर्षी त्यांचा विवाह झाला होता. त्यामुळे घरात राहूनच त्या वाचायला, लिहायला शिकल्या. त्यांचे संस्कृतचे पाठांतर भरपूर होते. लहानपणापासूनच वाचनाचे वेड लागले. त्यामुळे भरपूर वाचन करण्याची सवय अरविंद इनामदारांनाही लागली.

अरविंद इनामदार यांनी प्राथमिक शिक्षणास तडसर गावातून सुरुवात केली. त्यांनी येथे दुसरीपर्यंत शिक्षण घेतले, नंतर मात्र त्यांना शिक्षणासाठी पुणे गाठावे लागले.  महात्मा गांधींचा खून झाल्यानंतर वादातून ब्राह्मणांविरुद्ध उसळलेल्या रोषातून तडसर गावातील इनामदारांचा भव्य वाडा जाळण्याचा प्रयत्न झाला. त्यात मालमत्तेचे मोठे नुकसानही झाले होते.

तिसरीपासून पुण्यातील मॉडर्न विद्यालयामध्ये शिक्षण घेतलेल्या अरविंद इनामदारांनी पुण्यातीलच सर परशुरामभाऊ महाविद्यालयात उच्च शिक्षण घेतले.

अर्थशास्त्राचे पदव्युत्तर शिक्षण घेत असतानाच १९६४ मध्ये त्यांची भारतीय पोलीस सेवेसाठी निवड झाली. १९७६ मध्ये नागपूर येथे गुन्हे विभागाचे पोलीस उपायुक्त असताना त्यांनी नक्षलवादी चळवळीचा कुप्रसिद्ध म्होरक्या कोडापल्ली सितारामैया याला बेड्या ठोकल्या. दोनशेहून अधिक व्यक्तींची हत्या केल्याचा त्याच्यावर आरोप होता. या कामगिरीमुळे त्यांना, तसेच त्यांच्या सहकाऱ्यांना आंध्रप्रदेश सरकारने ५० हजार रुपयांचे रोख इनाम दिले. कुठच्याही राज्य सरकारने एखाद्या गुन्हेगारासाठी एवढ्या रकमेचे पारितोषिक यापूर्वी ठेवले नव्हते.

मुंबईच्या गुन्हे विभागाच्या सह पोलीस आयुक्त पदाची सूत्रे १९८७ मध्ये हाती येताच त्यांनी येथील माफियाविरुद्ध धडक कारवाई सुरू केली. पाकमोडीया स्ट्रीटवरील कुविख्यात दाऊद इब्राहिमच्या मुख्य अड्ड्यावर त्यांनीच प्रथम छापा टाकला. या कारवाईत त्यांनी अडीच कोटी रुपयांचे सोने जप्त केले. या विभागात सेवा बजावताना अरविंद इनामदार यांनी कुप्रसिद्ध छोटा शकील याला व त्याच्या पाठोपाठ अरुण गवळीला अटक केली. गवळीला तर अकरा वर्षे गजाआड घालवावी लागली.

अरविंद इनामदार यांच्यामुळेच गुन्हेगारी जगतावर दरारा निर्माण करणारा टाडाकायदा महाराष्ट्रात प्रथमच लागू करता आला. या कायद्यामुळे संघटित गुन्हेगारी आणि माफिया यांना वेसण घालता आली.

पोलीस आयुक्त म्हणून १९९१ मध्ये नागपुरात पुन्हा एकदा त्यांचे आगमन झाले. वादग्रस्त बाबरी ढांचा पाडल्यानंतर देशात अनेक ठिकाणी हिंदू-मुस्लीम दंगलीचा वणवा भडकला असताना नागपुरात सुव्यवस्था ठेवण्यात मिळालेल्या यशाबद्दल येथील नागरिकांनी त्यांना दुवा दिला. जळगाव-परभणी सेक्स स्कँडल  त्यांनी उजेडात आणले.

पोलीस महासंचालक पदावर असताना त्यांनी राज्यात वरिष्ठ  पोलीस अधिकाऱ्यांची २२ हजार पदे निर्माण केली. ही पोलीस दलाच्या दृष्टीने महत्त्वाची बाब मानली जाते. अशा रितीने पोलीस पदे निर्माण होणे हा एक देशातील विक्रमच आहे.

महासंचालक गृहनिर्माण, महासंचालक लाचलुचपत विभाग आणि अंतिमत: महाराष्ट्र पोलीस महासंचालक असा प्रवास करताना अरविंद इनामदारांना अनेक बऱ्या-वाईट प्रसंगांनाही सामोरे जावे लागले. पोलीस दलाची जनमानसात प्रतिष्ठा निर्माण करण्यासाठी त्यांनी सर्वस्व पणाला लावले. सहकारी पोलिसांची वेतनश्रेणी वाढविण्यासाठी त्यांनी केलेल्या प्रयत्नांना यश आले.

जिवाची बाजी लावून हौतात्म्य पत्करणाऱ्या पोलिसांची त्यांनी कदर ठेवली. पुणे येथील हुतात्मा पोलीस स्मारक वास्तुनिर्मितीतील त्यांचा पुढाकार हे त्याचेच प्रतीक आहे.

कायदा आणि सुव्यवस्था राखण्याची आपली नेमकी जबाबदारी कोणती हे पोलीस शिपायांना चांगल्या प्रकारे समजावे म्हणून त्यांनी पोलीस माहितीपत्रकांचे मराठीत भाषांतर करून घेण्याच्या कामात पुढाकार घेतला.

तत्त्वनिष्ठेची किंमत तर अरविंद इनामदारांना अनेकदा मोजावी लागली. ३६ वर्षांच्या सेवेत चक्क २९ वेळा त्यांना बदल्यांना सामोरे जावे लागले. पण त्यांनी आपल्या प्रतिमेला तसेच कर्तव्यनिष्ठेला कधीही तडा जाऊ दिला नाही. अशा परिस्थितीतही बजावलेल्या प्रामाणिक, धाडसी सेवेमुळे त्यांना उल्लेखनीय व विशेष सेवेबाबतची दोन्ही राष्ट्रपती पदके सन्मानाने प्रदान करण्यात आली.

बदली आणि नियुक्तीच्या वादातून सत्ताधाऱ्यांशी झालेल्या मतभेदांमुळे अरविंद इनामदारांनी सेवानिवृत्तीच्या निरोपाची प्रतीक्षा न करताच स्वाभिमानाने राजीनामा देण्याचा मार्ग स्वीकारला. अर्थातच यामुळे निवृत्तीनंतर मिळणाऱ्या सुमारे १० ते १२ लाख रुपयांच्या लाभावर त्यांना पाणी सोडावे लागले. स्वेच्छानिवृत्ती स्वीकारणारे भारतीय पोलीस सेवेच्या इतिहासातील ते एकमेव अधिकारी आहेत.

समाजात विविध घटकांशी व महनीय व्यक्तींशी अरविंद इनामदारांचे अतूट नाते आहे. विविध संस्थांनीही अरविंद इनामदारांना सन्मानित केले आहे. विदर्भाचा मैत्री पुरस्कार, पिंपरी-चिंचवडवासीयांनी केलेला गौरव, याज्ञवल्क्य पुरस्कार, मुंबईतील नॉर्थ इंडियन्स संस्थेने केलेला गौरव, युनियन बँक ऑफ इंडियाचा मॅन ऑफ द इयरपुरस्कार असे कितीतरी सोनेरी क्षण या पोलीस अधिकाऱ्याच्या आयुष्यात गुंफले गेले आहेत.

नाशिक येथील पोलीस अकादमीचे संचालक म्हणून करीत असलेल्या त्यांच्या कामगिरीने ज्ञानपीठ पुरस्कारप्राप्त ज्येष्ठ साहित्यिक कुसुमाग्रज यांनाही भारावून टाकले. यातूनच पाथेयची निर्मिती त्यांनी अरविंद इनामदार यांना समर्पित केली.

अरविंद इनामदार यांनी विविध विषयांवर निरनिराळ्या वृत्तपत्रांसाठी लेखन केले आहे. इलेक्ट्रॉनिक प्रसारमाध्यमांना तर अनेकदा त्यांची प्रतिक्रिया जाणून घ्यायची उत्सुकता असते. विविध विषयांवरील सुमारे तीन हजार पुस्तके त्यांनी संग्रहित केली आहेत. पोलीस दलात सेवा बजावत असतानाही त्यांनी सामाजिकच नव्हे, तर पर्यावरणाच्या दृष्टीने वातावरण निकोप राहावे यासाठीही लक्ष दिले. आत्तापर्यंत त्यांनी वृक्षारोपण मोहिमेनुसार आठ लाखांहून अधिक झाडे लावली आहेत. त्यांना देशभरातून विविध संस्था व्याख्यानासाठी निमंत्रित करतात. त्यांनी आजवर ५०० पेक्षा अधिक व्याख्याने दिली आहेत. यापोटी मानधन म्हणून मिळालेली सात लाखांपेक्षा अधिक रक्कम त्यांनी ती विविध धर्मादाय संस्थांना अर्पित केली आहे.

अरविंद इनामदार यांच्या पत्नी अंजली यांनी ग्रंथालय शास्त्र (लायब्ररी सायन्स)ची पदवी संपादित केली आहे. त्यांच्या दोन्ही कन्या उच्च शिक्षित आहेत. मोठी पद्मा हिने पीएच.डी. मिळविली आहे, तर जुई ही एम.ए. झाली आहे.

- विजयकुमार बांदल