Skip to main content
x

आर्डे, नागेश

           ध्यमवर्गीय कौटुंबिक अनुभवांवर आधारित विनोद साकारणारी व्यंगचित्रे काढणारे, चित्रकलेचे शास्त्रोक्त शिक्षण घेऊन त्यामध्ये कौशल्य मिळवलेले आणि मराठी व्यंगचित्रकारांच्या पहिल्या पिढीतले म्हणून नागेश आर्डे यांची ओळख सांगता येईल. नागेश आर्डे यांचा जन्म उत्तर प्रदेशातील झाशी येथे झाला. लहानपणापासूनच त्यांना चित्रे काढायचा छंद होता. वडिलांच्या बदलीमुळे मुंबईला आल्यावर त्यांनी चौदाव्या वर्षीच सर जे.जे. स्कूल ऑफ आर्ट्समध्ये प्रवेश घेतला. तिथे त्यांना प्रिन्सिपल ग्लॅडस्टन सॉलोमन, जिरार्ड, आचरेकर, देऊसकर यांची चित्रे पाहायला मिळाली व त्यांचे मार्गदर्शन लाभले. त्यांनी १९४१ मध्ये जे.जे.ची जी.डी. आर्ट पदविका मिळवली.

           त्याच दरम्यान नागेश आर्डे यांनी ‘सत्यकथा’ मासिकात कथाचित्रे काढली, त्याशिवाय ‘नवयुग’मध्ये रेखाटने केली. नाशिकला सिक्युरिटी प्रेसमधील स्टुडिओत आर्टिस्ट म्हणून नोकरी केली. पुढे नोकरीचा राजीनामा देऊन ते नागपूरला स्थायिक झाले. तिथेच केंद्रीय विद्यालयात चित्रकलेचे प्राध्यापक या पदावर नोकरी करून तेथून ते सेवानिवृत्त झाले.

           त्या दिवसांत अत्यंत लोकप्रिय असलेल्या ‘उद्यम’ या मासिकात आर्डे यांची व्यंगचित्रे प्रसिद्ध झाली. या चित्रांचे वैशिष्ट्य म्हणजे, ज्या विषयावर मासिकाच्या अंकात लेख असायचे, त्याच विषयावर आर्डे यांची व्यंगचित्रे असायची. मध्यमवर्गीय कुटुंबियांच्या त्या काळच्या मर्यादित कार्यक्षेत्रातील अनुभव हे त्यांच्या चित्रांचे विषय असत. परिस्थितीमुळे समोर येणार्‍या अडचणींना आपापल्या शक्ती-बुद्धीने सामोरे जाताना सामान्यांची होणारी धावपळ व यामधून निर्माण होणारा विनोद ते व्यंगचित्रांतून चित्रित  करीत. बहुतेक वेळा चित्रांतील पात्रांच्या संवादांतून तो मांडला जाई. हा विनोद सभ्यतेच्या मर्यादा सांभाळत, फार आक्रमक न होता, सर्वसामान्य वाचकाला समजेल व हसवेल असा असे.

           त्यांनी भरपूर व्यंगचित्रे काढली. दरम्यान, ‘किर्लोस्कर’, ‘स्त्री’, ‘मनोहर’, ‘हंस’, ‘मोहिनी’ या मासिकांतही त्यांची व्यंगचित्रे प्रसिद्ध झाली. तथापि, पुढे त्यांनी व्यंगचित्रे काढणे थांबविले. ‘निवडक व्यंगचित्रे’ या नावाने त्यांचा संग्रह प्रसिद्ध झाला आहे.

- मधुकर धर्मापुरीकर

आर्डे, नागेश