Skip to main content
x

बजाज, सुजाता राधाकृष्ण

             सुजाता राधाकृष्ण बजाज यांचा जन्म जयपूर येथे झाला. त्यांच्या आईचे नाव अनसूया-देवी होते. ते दोघेही महात्मा गांधींचे निकटवर्तीय होते. त्यांना आचार्य विनोबा भावे आध्यात्मिक गुरू म्हणून लाभले होते. सुजाताचे बालपण साधेपणात आणि देशभक्तीच्या वातावरणात गेले. आज फ्रान्स येथे स्थायिक असूनही त्यांच्यातील भारतीयत्व राहणीमानातून व व्यक्तिमत्त्वातून प्रतीत होताना दिसते.

             सुजाता बजाज यांचे शालेय शिक्षण जयपूर येथे झाल्यावर पुढील शिक्षणासाठी त्यांनी पुण्याला श्री.ना.दा.ठाकरसी  महाविद्यालयाच्या चित्रकला विभागात प्रवेश घेतला. या विभागात डॉ. भय्यासाहेब ओंकार, डॉ. मालती आगटे व प्रा.मुकुंद केळकर यांचे त्यांना मार्गदर्शन लाभले. याच दरम्यान श्री.ना.दा.ठाकरसी  विद्यापीठाच्या एका चित्रकला स्पर्धेत त्यांना प्रथम क्रमांक मिळाला. प्रा. केळकरांनी त्यांना १९७८ मध्ये पुणे येथे त्यांच्या चित्रांचे पहिले एकल प्रदर्शन भरवण्यास प्रोत्साहन दिले व त्यानंतर सुजाता यांनी अनेक प्रदर्शने मुंबई, कोलकाता, नवी दिल्ली, चेन्नई येथे भरवली.

             १९७८ मध्ये सुजाता बजाज विद्यापीठात प्रथम क्रमांकाने सुवर्णपदक पटकावून उत्तीर्ण झाल्या, तसेच १९८० मध्ये पदव्युत्तर परीक्षेतही त्या प्रथम आल्यामुळे त्यांना कुलपतींचे विशेष पारितोषिक मिळाले. १९७९ व १९८४ मध्ये राज्यस्तरीय प्रदर्शनांत त्यांनी पारितोषिके मिळविली. १९९१ मध्ये सुजाता बजाज यांना बॉम्बे आर्ट सोसायटीचे पारितोषिक मिळाले. पदव्युत्तर शिक्षणानंतर त्यांनी डॉ. भय्यासाहेब ओंकार यांच्या मार्गदर्शनाखाली पीएच.डी. मिळविली. सुजातांच्या प्रबंधाचा विषय होता, ‘भारतीय आदिवासी कलेची वैशिष्ट्ये आणि समकालीन कलाप्रवाहांवर पडलेला प्रभाव’. भारतातील भिल्ल, वारली, माडिया, मुरिया व साओरा या जमातींच्या कलांचा विशेष अभ्यास करत असताना त्यांचा चित्रकारांवर पडलेल्या प्रभावाचा शोध त्यांनी घेतला. या दरम्यान नामवंत चित्रकार एस.एच.रझा यांच्याशी त्यांचा परिचय झाला. प्रा.केळकरांप्रमाणे रझा यांनी पुढील शिक्षणासाठी फ्रेंच सरकारची शिष्यवृत्ती घेऊन पॅरिस येथे जायला बजाज यांना प्रवृत्त केले व १९८८ मध्ये त्या इकोल नॅशनल द ब्यू आटर्स येथे दाखल झाल्या. येथे सुजाता यांनी चित्रकलेतील नवीन तंत्रे आत्मसात केली.

            सुजाता यांनी मुद्राचित्रण, शिल्पकला, भित्तिचित्रे (म्युरल्स) अशा विविध कलाप्रकारांमध्येे आणि कोल्ड सिरॅमिक, फायबर ग्लास आणि धातू यांसारख्या माध्यमांमध्ये काम केले आहे. त्यांची १९८९ मध्ये अशाच एका प्रदर्शनादरम्यान रूने जुल लार्सन या चित्ररसिकाशी ओळख झाली. तो ‘स्ट्रगल’ या चित्राने  प्रभावित झाला आणि त्याने हे चित्र विकत घेतले. या ओळखीचेच दोन वर्षांनी विवाहात रूपांतर झाले. त्या १९९५ मध्ये रूनेसोबत नॉर्वे येथे राहायला गेल्या व नॉर्वे येथेही त्यांनी आपल्या चित्रांची प्रदर्शने भरवायला सुरुवात केली.

           त्या २००१ मध्ये फ्रान्सला परतल्या. आजमितीस त्यांची पॅरिस, लंडन, हाँगकाँग, टोकियो, दिल्ली, मुंबई येथे चित्रांची प्रदर्शने झालेली आहेत. सुजाता बजाज यांच्या चित्रांचे माध्यम कागदावर अ‍ॅक्रिलक, तसेच मिश्रतंत्र या प्रकारचे आहे. चित्रांतील रंगांच्या जिवंतपणाला त्या सर्वाधिक महत्त्व देतात.

- डॉ. राजेत्री कुलकर्णी

 

बजाज, सुजाता राधाकृष्ण