Skip to main content
x

चव्हाण, बाळ

      रीतसर शिल्पकलेचे शिक्षण घेऊन १९३१ मध्ये पदविका मिळवलेले कोल्हापूरमधील पहिले शिल्पकार बाळ चव्हाण हे चित्रेही काढत असले तरी प्रामुख्याने शिल्पकार म्हणून जगले. वस्तुत:, सुरुवातीला ते कोल्हापूरच्या राजाराम महाराजांकडे चालक (ड्रायव्हर) म्हणून काम करीत असत. कलेची आवड असल्यामुळे वेळ मिळाला म्हणजे ते चित्र काढत बसत. महाराजांच्या हे कधीतरी लक्षात आले त्यामुळे, ‘‘तुला आता मुंबईच्या स्कूल ऑफ आर्टमध्ये पाठवायला पाहिजे,’’ असे महाराज थट्टेने म्हणत. बाळ चव्हाणांना असा काही योग येईल असे स्वप्नातही वाटले नव्हते. पण तो योगायोग अचानक जुळून आला.

      शिल्पकार करमरकर १९२६ च्या दरम्यान महाराजांचा अर्धपुतळा व आईसाहेबांचा पूर्णाकृती पुतळा करण्यासाठी कोल्हापुरात आले होते. दोघांना प्रत्यक्ष समोर बसवून काम सुरू होते. कलेची आवड असल्याने काम सुरू असताना ते बघण्याची परवानगी चव्हाणांंनी मागितली व ती मिळाली. त्यातून शिल्पकार करमरकरांची ओळख झाली. करमरकरांनी ‘‘तुम्ही काय करता?’’, असे विचारले असता, बाळ चव्हाणांनी, ‘‘मी महाराजांकडे चालक आहे,’’ हे सांगून स्वत: काढलेली चित्रे बघण्याची त्यांना विनंती केली. करमरकरांनी चित्रे पाहिली, त्यांना ती आवडली व  ‘‘कलाशिक्षणासाठी मुंबईला या,’’ असे सांगून त्यांनी  त्यासाठी महाराजांची परवानगीही मिळवली.

      सर जे.जे. स्कूल ऑफ आर्टमध्ये पेंटिंगचे शिक्षण सुरू असतानाच चव्हाण उर्वरित वेळ करमरकरांच्या स्टुडीओत घालवू लागले. त्यातून त्यांना शिल्पकलेची गोडी लागली व करमरकरांच्या मार्गदर्शनाने चांगली प्रगती होऊ लागली. चव्हाणांची शिल्पकलेची कामे त्या काळात अभ्यागत व्याख्याता म्हणून गेलेल्या रावबहादूर गणपतराव म्हात्रे यांनी बघितली व शिल्पकलेच्या चौथ्या वर्षाला थेट प्रवेश मिळण्याची व्यवस्था केली. आता चव्हाणांचे पेंटिंग सोडून शिल्पकलेचे शिक्षण सुरू झाले व त्यांनी १९३१ मध्ये पाच वर्षांचा अभ्यासक्रम दोन वर्षांत पूर्ण करून शिल्पकलेची पदविका प्राप्त केली.

      शिक्षण संपवून चव्हाण कोल्हापुरास परतले. रंकाळा तलावाजवळची त्यांची एक जागा भुताटकीची म्हणून प्रसिद्ध होती. साहजिकच त्यात कोणी राहत नसे. त्यात बाळ चव्हाण राहू लागले. याच जागेत त्यांची शिल्पे आकार घेऊ लागली. करमरकरांना व्यावसायिक स्मारकशिल्पासोबतच स्वान्तसुखाय शिल्पनिर्मिती करताना त्यांनी बघितले होतेच. आर्थिक परिस्थिती बिकट असूनही त्यांनी इतर कोणताही व्यवसाय न करता शिल्पकार म्हणून जगण्याचे ठरविले. महाराज व माधवराव बागल यांच्यासारख्यांनी हे बघून या जिद्दी व होतकरू शिल्पकाराला व्यावसायिक कामे देण्यास सुरुवात केली.

      बाळ चव्हाणांची ‘राजमाता जिजाबाई’ व १८५७ च्या स्वातंत्र्यसमरात सहभागी झालेले व कराची येथे जन्मठेपेची शिक्षा भोगत असताना मृत्युमुखी पडलेले ‘चिमासाहेब’ यांची शिल्पे कोल्हापुरात सार्वजनिक ठिकाणी स्थानापन्न झाली. रंकाळा उद्यानात आबालाल रहिमान यांचा व बिंदू चौकात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा स्थानापन्न झाला. पुढे पन्हाळगडावरील शिवाजी महाराजांचा पुतळा लोहिया शेठ यांनी बनवून घेतला. किर्लोस्करवाडी येथील लक्ष्मणराव किर्लोस्करांचा, तसेच इतर पुतळ्यांची कामे ‘शंवाकि’ ऊर्फ  शंकरराव किर्लोस्कर यांनी बाळ चव्हाणांकडून करवून घेतली. याशिवाय त्यांनी प्रत्यक्ष बसवून केलेली राजाराम महाराज, चित्रकार धुरंधर व माधवराव बागल यांची शिल्पे त्यांच्या शिल्पनैपुण्याची साक्ष देतात. शिल्पकार करमरकरांच्या हाताखाली काम केल्यामुळे ब्राँझ कास्टिंगचे तंत्रही त्यांनी आत्मसात केले.

      बाळ चव्हाणांना पिंपळाच्या पानांची जाळी करून त्यावर चित्र काढण्याचा नाद होता. याशिवाय लहर लागली तर ते शिंपल्यावर व हस्तिदंतावर कोरीव काम करत बसत. मोडक्या वस्तू व यंत्रसामग्री विकत घेण्याचा व त्यांचे विविध आकार एकमेकांना जोडून प्रयोगशील शिल्पे तयार करण्याचा छंद त्यांना काही काळ लागला होता. काचेच्या बरणीत रंगीबेरंगी मासे पाळून ते तासन्तास बघत बसत. प्राण्यांचे प्रेम असल्यामुळे इतर प्राण्यांसोबतच त्यांनी मोरही पाळला होता.

      आयुष्यात दारिद्य्र व गरिबीचा अनुभव घेतलेल्या बेहिशोबी व पैशांचा हव्यास नसलेल्या बाळ चव्हाणांच्या कलाकृतींची व स्टुडीओची आज पूर्ण वाताहत झाली असून त्यांच्या आयुष्याबद्दलच नव्हे, तर जन्म-मृत्यूबद्दलचीही नोंद आज उपलब्ध नाही.

- सुहास बहुळकर 

चव्हाण, बाळ