Skip to main content
x

देसाई, अशोक हरिभाई

    भारताचे अ‍ॅटर्नी जनरल अशोक हरिभाई देसाई यांचा जन्म गुजरातमध्ये वडोदरा येथे झाला. त्यांचे उच्च शिक्षण मुंबई आणि लंडनला झाले. मुंबईच्या गव्हर्नमेंट लॉ कॉलेजातून त्यांनी १९५२ साली एलएल.बी. पदवी प्राप्त केली. नंतर १९५६मध्ये त्यांनी अर्थशास्त्रातील बी.एस्सी. पदवी ‘लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स’ मधून संपादन केली. त्याच वर्षी ते लिंकन्स इनमधून बॅरिस्टर झाले. १९६२ ते १९६४ या काळात ते मुंबईला कायद्याचे प्राध्यापक होते, तर १९६७ ते १९७२ दरम्यान त्यांनी मुंबईच्या बॉम्बे कॉलेज ऑफ जरनॅलिझममध्ये कायद्याचे अध्यापन केले. डिसेंबर १९८९ ते डिसेंबर १९९० या काळात न्या.देसाई भारताचे सॉलिसिटर-जनरल होते व जुलै १९९६ ते मार्च-एप्रिल १९९८ या काळात अ‍ॅटर्नी-जनरल होते.

     अगोदर ज्येष्ठ अ‍ॅडव्होकेट आणि नंतर अ‍ॅटर्नी-जनरल या नात्यांनी देसाईंचा अनेक गाजलेल्या खटल्यांशी संबध आला. यांतील काही खटले घटनात्मक आणि प्रशासकीय कायद्याशी निगडित होते. मुंबई उच्च न्यायालयात झालेला विजय तेंडुलकर यांनी लिहिलेल्या ‘सखाराम बाइंडर’ या नाटकासंबंधीचा सेन्सॉरशिपच्या मुद्द्यावरील खटला, बॅकबे रेक्लमेशनसंबंधीचा खटला, अंतुले खटला, हे त्यांपैकी विशेष उल्लेखनीय खटले म्हणता येतील.

     सर्वोच्च न्यायालयातही देसाई यांनी अनेक महत्त्वाच्या खटल्यांमध्ये युक्तिवाद केले. रामण्णा शेट्टी खटला, नरसिंह राव खटला, विनीत नारायण खटला हे त्यांपैकी उल्लेखनीय खटले म्हणता येतील.

      बेलग्रेड येथे १९८०मध्ये झालेल्या आंतरराष्ट्रीय कायदा परिषदेला आणि बर्लिन येथील इंटरनॅशनल बार असोसिएशनच्या बैठकीला देसाई प्रतिनिधी म्हणून गेले होते. मुंबई बार असोसिएशन आणि सुप्रीम कोर्ट बार असोसिएशनशी देसाई यांचा घनिष्ठ संबंध आहे. त्याचप्रमाणे ‘इन्स्टिट्यूट फॉर ह्युमन राईटस्’, ‘इंडस्ट्रियल लॉ इन्स्टिट्यूट’, ‘इंटरनॅशनल लॉ असोसिएशन’ यांच्याशीही त्यांचा संबंध आहे. १९८६ ते १९९० पर्यंत ते ‘इंटरनॅशनल बार असोसिएशन’च्या ‘कमिटी ऑन इंटरनॅशनल लॉ’चे अध्यक्ष होते. झांबियातील लुसाका येथे १९९०मध्ये झालेल्या ‘कॉमनवेल्थ वर्कशॉप ऑन अ‍ॅडमिनिस्ट्रेटिव्ह लॉ’ या कार्यशाळेचे ते सल्लागार होते. १९९७मध्ये जिनिव्हा येथील संयुक्त राष्ट्रांच्या मानवाधिकार समितीला भारताचा याविषयीचा अहवाल त्यांनी सादर केला होता.

      १९९८मध्ये व्हिएन्ना येथे ‘मनी लाँडरिंग’संबंधीच्या संयुक्त राष्ट्र समितीच्या बैठकीसाठी गेलेल्या भारताच्या प्रतिनिधीमंडळाचे अशोक देसाई नेते होते. (बेकायदेशीर रीतीने मिळविलेला पैसा बहुधा परदेशात पाठवून मग तो कायदेशीर वाटेल अशा मार्गांनी परत स्वदेशात आणण्याला ‘मनी लाँडरिंग’ म्हणतात.)

      सुरुवातीच्या काळात अशोक देसाई ‘टाइम्स ऑफ इंडिया’ या दैनिकाचे कायदेविषयक वार्ताहर होते. त्यांनी कायद्याविषयी पुष्कळ लेखन केले. त्यांचे प्रकाशित झालेले लेखन पुढीलप्रमाणे : ‘सेन्सॉरशिप’ व ‘सखाराम बाइंडर’(१९७४) ‘डेमोक्रसी, ह्युमन राईटस् अँड द रूल ऑफ लॉ’ (२०००); २०००मध्ये  सर्वोच्च न्यायालयाच्या सुवर्णमहोत्सवानिमित्त प्रसिद्ध झालेल्या ‘फायनल बट नॉट इन्फॉलिएबल’ या ग्रंथात देसाई यांनी एक प्रकरण लिहिले. त्याचप्रमाणे ‘इव्होकिंग मिस्टर सीरवाई’ (२००५) आणि ‘बॉम्बे हायकोर्ट’ या ग्रथांतही त्यांनी प्रकरणे लिहिली. याशिवाय त्यांनी दोन महत्त्वाची व्याख्याने दिली : ‘प्रेम भाटिया लेक्चर ऑन द डेंजर्स टू आवर डेमोक्रसी’, ‘अ‍ॅनी बेझंट लेक्चर ऑन सेक्युलरिझम.’

      अशोक देसाई यांना ‘पद्मभूषण’ आणि ‘लॉ ल्युमिनरी अ‍ॅवॉर्ड’ हे पुरस्कार मिळाले . शिवाय ते ‘इन्स ऑफ कोर्ट (इंडिया) सोसायटी’चे अध्यक्ष होते .अशोक देसाई त्यांच्या  शेवटच्या काळात दिल्लीत वास्तव्यास होते.

- अ. ना. ठाकूर

देसाई, अशोक हरिभाई