Skip to main content
x

देसाई, भुलाभाई जीवनजी

     प्रसिद्ध वकील तसेच काँग्रेसचे नेते भुलाभाई जीवनजी देसाई यांचा जन्म गुजरातमध्ये बलसाड येथे झाला. त्यांचे वडील जीवनजी तेथे सरकारी वकील होते. भुलाभाईंचे सुरुवातीचे शालेय शिक्षण बलसाडच्या आवाबाई स्कूलमध्ये झाले. मुंबईच्या भर्दा हायस्कूलमधून १८९५मध्ये ते मॅट्रिक उत्तीर्ण झाले. शाळेत असतानाच त्यांचा विवाह झाला.

     मॅट्रिक झाल्यानंतर भुलाभाई मुंबईच्या एलफिन्स्टन महाविद्यालयात दाखल झाले. तेथून इंग्रजी व इतिहास हे विषय घेऊन ते बी.ए.ची परीक्षा उत्तम प्रकारे उत्तीर्ण झाले. त्यांना वर्डस्वर्थ पारितोषिक मिळाले आणि इतिहास आणि राज्यशास्त्रात पहिले आल्याबद्दल त्यांना शिष्यवृत्तीही मिळाली. त्यानंतर लगेच त्यांनी मुंबई विद्यापीठातून इंग्रजी विषयात एम.ए.ची पदवी संपादन केली. नंतर अहमदाबादमधील गुजरात महाविद्यालयात त्यांची इंग्रजी आणि इतिहासाचे प्राध्यापक म्हणून नियुक्ती झाली. तेथे अध्यापन करीत असतानाच त्यांनी कायद्याचा अभ्यास केला आणि एलएल.बी. पदवी संपादन केली. १९०५मध्ये ते मुंबई उच्च न्यायालयात वकील म्हणून रुजू झाले आणि थोडक्या काळातच एक प्रथितयश व निष्णात वकील बनले.

     अ‍ॅनी बेझंट यांनी स्थापन केलेल्या ऑल इंडिया होमरूल लीगचे सदस्यत्व घेऊन भुलाभाईंनी राजकारणात प्रवेश केला. नंतर ते इंडियन लिबरल पार्टीमध्ये गेले, पण त्यांनी १९२८च्या सायमन आयोगाला विरोध केला. १९२८मधल्याच बार्डोली सत्याग्रहाच्या वेळी भुलाभाईंचा सरदार वल्लभभाई पटेल यांच्याशी संबंध आला. बार्डोलीच्या शेतकर्‍यांचे म्हणणे भुलाभाईंनी सरकारसमोर प्रभावीपणे मांडले.

      १९३०मध्ये भुलाभाई औपचारिकपणे काँग्रेसचे सदस्य बनले. १९३२मध्ये त्यांनी ‘स्वदेशी सभा’ स्थापन केली. ऐंशी कापडगिरण्या या सभेच्या परदेशी कापडाच्या बहिष्कारात सामील झाल्या. भुलाभाईंना अटक करण्यात आली, पण प्रकृती-अस्वास्थ्यामुळे त्यांची सुटका करण्यात आली. याच वेळी त्यांचा काँग्रेस कार्यकारिणीत समावेश झाला. नोव्हेंबर १९३४मध्ये भुलाभाई गुजरातमधून केंद्रीय विधानसभेवर निवडून गेले आणि त्यांची त्या सभागृहातील काँग्रेस सदस्यांचे नेते म्हणून निवड झाली. या भूमिकेत त्यांनी अत्यंत प्रभावी कार्य केले. दुसरे महायुद्ध सुरू झाल्यावर व्हाइसरॉयने जेव्हा भारतालाही युद्धात समाविष्ट केले, तेव्हा १९नोव्हेंबर१९४० रोजी भुलाभाईंनी त्याविरुद्ध केंद्रीय विधानसभेत केलेले भाषण गाजले. सत्याग्रहात भाग घेतल्यामुळे १०डिसेंबर१९४० रोजी भुलाभाईंना अटक झाली, पण आजारपणामुळे त्यांची सप्टेंबर १९४१ मध्ये सुटका झाली. ९ऑगस्ट१९४२ रोजीच्या ‘चले जाव’ ठरावानंतर महात्मा गांधी आणि काँग्रेस कार्यकारिणीच्या सर्व सदस्यांना अटक झाली. परंतु भुलाभाईंना अटक झाली नाही.

      त्यांनी मुस्लीम लीगच्या लियाकत अली खान यांच्या बरोबर काँग्रेस-लीग युती करण्याच्या उद्देशाने बोलणी केली आणि एक करार केला. त्याला ‘देसाई-लियाकत करार’ असे म्हटले जाते. यावरून काँग्रेसचे सगळे ज्येष्ठ नेते भुलाभाईंवर नाराज झाले.

      वकील म्हणून भुलाभाईंनी लढविलेला शेवटचा खटला म्हणजे ‘लाल किल्ला खटला’ होय. नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या आजाद हिंद सेनेमधील तीन अधिकारी शाहनवाज खान, प्रेमकुमार सहगल आणि गुरबक्षसिंह धिल्लाँ यांच्यावर ब्रिटिश सरकारने राजद्रोहाच्या आरोपावरून खटला भरला, तेव्हा काँग्रेसने त्यांच्या बचावासाठी १७ वकिलांची एक समिती स्थापना केली. या समितीत स्वत: पंडित नेहरू, सरदार पटेल, तेजबहाद्दूर सप्रू आणि भुलाभाईही होते. परंतु बचावाचे मुख्य भाषण भुलाभाईंनी केले. प्रकृतीची पर्वा न करता, तीन महिने अविश्रांत परिश्रम करून त्यांनी आंतरराष्ट्रीय कायद्याचा  आधार घेऊन असा युक्तिवाद केला की सदरच्या तीन अधिकाऱ्यांना आपल्या मातृभूमीच्या मुक्ततेसाठी नेताजींनी स्थापन केलेल्या हंगामी सरकारच्या आदेशावरून शस्त्र हाती घेण्याचा अधिकार होता आणि त्यामुळे त्यांच्यावर इंडियन पीनल कोडच्या तरतुदींखाली खटला भरताच येत नाही. अर्थात सैनिकी न्यायालयाने हा युक्तिवाद मान्य केला नाही व या तिन्ही अधिकाऱ्यांना जन्मठेप दिली. पण नंतर परिस्थिती झपाट्याने बदलली. नौदलातील खलाश्यांनी बंड केले. ब्रिटिशांनी भारत सोडताना या तिन्ही अधिकार्‍यांची सुटका करण्यात आली. या खटल्यातील बचावाच्या भाषणामुळे भुलाभाईंचे नाव सर्वतोमुखी झाले व भारतातील महान वकिलांच्या प्रभावळीत त्यांना अढळ स्थान प्राप्त झाले. परंतु थोड्याच दिवसांत प्रकृती खालावून भुलाभाईंचे निधन झाले.

       - शरच्चंद्र पानसे

देसाई, भुलाभाई जीवनजी