Skip to main content
x

दीक्षित, शंकर बाळकृष्ण

     शंकर बाळकृष्ण दीक्षित यांचा जन्म मुरूड येथे झाला. मुरूड येथील प्राथमिक शाळेतच ते त्यांच्या हुशारीमुळे प्रसिद्धीस पावले. संस्कृतमध्ये ते विशेष प्रवीण होते. प्राथमिक शिक्षण झाल्यावर त्यांनी दापोली न्यायालयात अर्ज लिहून देणे वगैरे कामे केली. तिथेच ते इंग्रजी शिकले. १८७० साली त्यांनी पुण्यास प्रशिक्षण महाविद्यालयामध्ये प्रवेश घेतला. तिथे तीन वर्षे शिक्षण घेतले आणि त्याच काळात त्यांनी मॅट्रिक्युलेशनचा अभ्यास केला. १८७४ साली ते प्रथम श्रेणीत मॅट्रिक झाले. मग ते शिक्षणखात्यात भरती झाले. रेवदंडा, ठाणे, बार्शी येथे शाळेत हेडमास्तर म्हणून काम केल्यावर धुळे येथील ‘प्रशिक्षण विद्यालया’मध्ये दीक्षित मास्तर म्हणून रुजू झाले. १८९४ साली त्यांची पुणे प्रशिक्षण विद्यालयामध्ये नेमणूक झाली. तिथेच ते अखेरपर्यंत कार्यरत होते. या नोकरीत फुरसतीच्या काळात त्यांनी भारतीय ज्योतिषशास्त्राचा कसून अभ्यास केला. आज ज्याला ‘खगोलविज्ञान’ या नावाने ओळखले जाते, त्यालाच त्या काळात ‘ज्योतिषशास्त्र’ असे म्हणत असत.

    विविध ठिकाणी नोकरीनिमित्त हिंडत असताना, त्यांनी त्यांचा खगोलशास्त्राचा छंद जोपासला. संस्कृतवरील प्रभुत्व आणि गणितातील गती यांमुळे त्यांनी या विषयात लक्ष घातले. वृत्तपत्रामध्ये ‘स्फुटवक्ता अभियोगी’ या नावाने ग्वाल्हेरचे विसाजीपंत लेले सायनवादावर पत्र लिहीत. ती वाचून दीक्षितांचे या विषयाकडे लक्ष गेले. त्या वेळी ते रेवदंड्यास होते. ठाण्याला आल्यावर त्यांनी ज्योतिषाच्या अभ्यासात लक्ष घातले.

     मराठीतील आद्य विज्ञानप्रसारक जनार्दन बाळाजी मोडक हे त्या वेळी ठाण्यास होते. त्यांचा आणि दीक्षितांचा या अभ्यासानिमित्ताने स्नेह जडला. या दोघांचा आणि लेले यांचा सुरुवातीस तात्त्विक वाद झाला. पुढे या तिघांनी मिळून सायन मानाचे पंचांग सुरू केले. दीक्षितांनी पदराला खार लावून अखेरपर्यंत ते चालविले. यातून त्यांचा लोकमान्य टिळकांशी परिचय झाला. टिळकांनी त्यांच्या ‘ओरायन आणि आर्क्टिक होम इन वेदाज’ या ग्रंथलेखनाचे वेळी अनेक वेळा शं.बा. दीक्षितांशी सल्लामसलत केली. दीक्षितांनी अनेक शालोपयोगी आणि शिक्षकांना मार्गदर्शनपर पुस्तके लिहिली. पण त्यांचे ‘ज्योतिर्विलास’ अथवा ‘रात्रीची दोन घटका मौज’ हे मराठीतील आकाशनिरीक्षणाचे स्वतंत्र पुस्तक, हे अशा प्रकारचे पहिले मराठी पुस्तक असावे.

     दीक्षितांचे ‘धर्ममीमांसा’ हे पुस्तक वेगवेगळ्या धार्मिक समजुती कशा निर्माण झाल्या असाव्यात, याची तर्कसंगत म्हणजेच वैज्ञानिक दृष्टिकोनातून चर्चा करणारे आहे. दीक्षितांचे सर्वात महत्त्वाचे पुस्तक म्हणजे ‘भारतीय ज्योति:शास्त्र’ अथवा ‘भारतीय ज्योतिषाचा प्राचीन आणि अर्वाचीन इतिहास’. हा १८९१ साली प्रसिद्ध झालेला त्यांचा ग्रंथ खूपच गाजला. मराठीतील अशा स्वरूपाचा हा एकमेव ग्रंथ आहे. त्यात प्राचीन काळापासून भारतात होऊन गेलेल्या ज्योतिषाचार्यापासून आधुनिक काळातील (म्हणजे एकोणिसाव्या शतकापर्यंतच्या) ज्योतिषाचार्यांची आणि गणितींची माहिती आहे. यात वेगवेगळ्या पंचांगांमधील फरक दिग्दर्शित केलेले असून पंचांग तयार करण्याच्या पद्धतीही येथे नमूद केलेल्या आढळतात. तोपर्यंत भारतात होऊन गेलेल्या ज्योतिषशास्त्रविषयक ग्रंथांचीही माहिती या ग्रंथात वाचायला मिळते.

     ‘भारतवर्षीय भूवर्णन’ हा शं.बा. दीक्षित यांचा असाच एक महत्त्वाचा ग्रंथ. या अभ्यासपूर्ण ग्रंथात भारतवर्षाच्या ऐतिहासिक भूगोलाची जशी माहिती मिळते, तशी माहिती देणारा दुसरा ग्रंथ मराठीत खरे तर आजही नाही. ऐतिहासिक काळातील नगरे, राज्ये आणि नद्या आज कुठे आहेत, आणि त्यांची वर्तमानकालीन नावे कोणती, हे या ग्रंथात दीक्षित यांनी नोंदविले आहे. त्यांचे इतर ग्रंथ हे बरेच शिक्षकांसाठी होते. दीक्षितांचा मृत्यू विषमज्वराने झाला.

निरंजन घाटे

दीक्षित, शंकर बाळकृष्ण