Skip to main content
x

इमारते, माधव प्रभाकर

        चित्रकला, संगीत अशा दोन्ही क्षेत्रांत वावरणारे आणि कलाविषयक लेखन करणारे चित्रकार माधव प्रभाकर इमारते यांचा जन्म नागपूर येथे झाला. नागपूरच्या न्यू इंग्लिश हायस्कूलमध्ये त्यांचे शालेय शिक्षण झाले. अकरावीची शालान्त परीक्षा १९६९ मध्ये उत्तीर्ण झाल्यावर त्यांनी हिस्लॉप महाविद्यालयात विज्ञान शाखेत प्रवेश घेतला पण हे शिक्षण त्यांनी अर्धवट सोडले. वडिलांची बदली झाल्यामुळे १९७२ मध्ये इमारते आईवडिलांबरोबर मुंबईला आले. वडील प्रभाकर व आई प्रभावती दोघांना संगीताची व नाटकाची आवड होती, तर मामाची चित्रकला चांगली होती. संगीत आणि चित्रकलेचा हा वारसा माधव इमारते यांच्याकडे आला.

        मुंबईत आल्यापासून इमारते यांनी संगीत व चित्रकलेचे शिक्षण घेण्यास सुरुवात केली. संगीतात वसंतराव कुलकर्णी, गोविंदबुवा अग्नी अशा गुरुंकडे त्यांनी शिक्षण घेतले. चित्रकलेच्या क्षेत्रात विविध चित्रकारांच्या सहवासात ते सातत्याने राहिले. त्यांनी १९७९ मध्ये सर जे.जे. स्कूल ऑफ आर्टमधून ड्रॉइंग अ‍ॅण्ड पेंटिंगमधील पदविका प्राप्त केली. मुंबई विद्यापीठातून त्यांनी भारतीय शास्रीय संगीत विषयात बी.एफ.ए. आणि एम.एफ.ए. या पदव्या अनुक्रमे १९९४ आणि १९९६ मध्ये मिळवल्या. प्रसिद्ध चित्रकार प्रभाकर बरवे आणि संगीततज्ज्ञ डॉ. अशोक रानडे या दोन व्यक्तींचा प्रभाव इमारतेंच्या कलाजाणिवेवर पडलेला आहे. दृश्यकलेबद्दलच्या जाणिवा आणि संगीताबद्दलची समज त्यातून वाढीस लागली आणि नकळतपणे ती त्यांच्या चित्रांमधूनही येऊ लागली. परंतु आपण शिकत असलेल्या या दोनही कलांकडे इमारते केवळ ज्ञानसंपादन या दृष्टिकोनातून पाहात असत. त्याचा प्रत्यक्ष वापर करण्याचे ते कटाक्षाने टाळत. त्यामुळे त्यांनी ना कधी प्रत्यक्ष संगीतगायन केले, ना चित्रकलेचा व्यावसायिक वापर करून अर्थार्जनाचा प्रयत्न केला. अखेरीस संगीत व चित्रकलाविषयक लेखन सुरू केले तेव्हा या ज्ञानसंपादनाचे प्रत्यक्ष कृतीत रूपांतर झाले. शिक्षण संपल्यानंतर सुमारे वीस वर्षांनी इमारते यांनी चित्रप्रदर्शनात भाग घेण्यास सुरुवात केली. त्यानंतर इमारते यांनी अनेक चित्रप्रदर्शनांमध्ये भाग घेतलेला आहे. १९९९ मध्ये त्यांच्या कोलाज आणि मिश्र माध्यमातील चित्रांचे प्रदर्शन जहांगीर आर्ट गॅलरीत झाले होते. त्यात त्यांनी स्टोचा बर्नर, किटली, टाईपरायटर, शिवणाचं मशीन अशा दैनंदिन वापरातील वस्तूंची चित्रे तसेच पोस्टकार्ड, रेल्वेचा रिझर्व्हेशन फॉर्म अशांचा वापर करून कोलाजेस बनवली होती. ‘इन्स्ट्रूमेंटस ऑफ सेकंड साइट’ (२००५), ‘ग्रिड्स अँड डॅटम्स’ (२००७) ही अन्य चित्रकारांसह केलेली प्रदर्शने आणि ‘(सब) अर्बन टेक्स्ट्स’ (२००७), ‘अंडरस्टँडिंग वननेस’ (२००७) मधील समूह प्रदर्शनांमध्ये (ग्रूप एक्झिबिशन) प्रदर्शित झालेल्या इमारतेंच्या चित्रांमध्ये थोड्याफार फरकाने हेच विषय आलेले दिसतात. २०१२ मध्ये जहांगीर आर्ट गॅलरीत त्यांच्या चित्रांचे प्रदर्शन झाले त्यात त्यांनी मोठ्या आकाराचे कॅनव्हास प्रदर्शित केले होते. शहरातली उपरेपणाची भावना, संवादातला तुटकपणा, चाकोरीबद्ध जीवन या सार्‍याचे पडसाद त्यांच्या चित्रांमधून उमटतात. जड वस्तूंमध्ये दडलेले चैतन्य त्यांच्या रेखाटनांमधून प्रकट होते. विजेचे खांब, रस्त्यांचे जाळे यातून त्यांच्या चित्रांमध्ये रेषांचे अमूर्त जाळे तयार होते. अलीकडे त्यांची चित्रे अमूर्ततेकडे झुकलेली वाटतात. शहरी जीवनातल्या बाह्य गोंगाटामध्ये जीवनाचं अंतर्गत संगीत शोधण्यात त्यांच्यातला चित्रकार रमलेला दिसतो.

        इमारते यांनी कलानिर्मितीबरोबरच कलाविषयक लेखन केलेले आहे. किंबहुना त्यासाठीच ते लोकांना अधिक परिचित आहेत. चित्रकला आणि संगीत विषयक कार्यक्रमांबद्दल त्यांनी मराठी वृत्तपत्रांमध्ये परीक्षणे लिहिली. ‘सकाळ’ वृत्तपत्रात ‘अभिजात’ या सदरात पाश्‍चात्य आणि भारतीय चित्रकारांच्या चित्रकृतींचे इमारते यांनी रसग्रहण केले. संगीताच्या बाबतीतही त्यांनी अनेकदा लिहिले आहे. गायक, संगीतकार, संगीताच्या ध्वनिफिती अशा अनेक विषयांवर इमारते यांनी सातत्याने लेखन केलेले आहे. कलानिर्मिती आणि कलेकडे गंभीरपणे पाहणारा ज्ञानोपासक, कलाआस्वादक व लेखक अशी इमारतेंची प्रतिमा आहे.

- दीपक घारे

इमारते, माधव प्रभाकर