Skip to main content
x

काळे, अरुण पद्मनाभ

           जाहिरात क्षेत्रात आपला वेगळा ठसा उमटवणारे अरुण काळे यांचा जन्म मुंबईत झाला. त्यांनी १९६७ मध्ये सर जे.जे. इन्स्टिट्यूट ऑफ अप्लाइड आर्टमधून उपयोजित कलेतील पदविका प्राप्त केली. केर्सी कात्रक यांनी १९६५ मध्ये ‘एमसीएम’ (मास कम्युनिकेशन्स अ‍ॅण्ड मार्केटिंग) ही जाहिरातसंस्था चालू केली होती. तिथे उपयोजित चित्रकार म्हणून ते दाखल झाले.

           एमसीएमचा त्या वेळेस भारतातील सर्वाधिक वेगाने वाढणारी एजन्सी असा लौकिक होता. या क्षेत्रातील अरुण कोलटकर, किरण नगरकरांसारखी नावाजलेली माणसे तिथे काम करीत होती. स्वतः केर्सी कात्रक साहित्य व इतर कलांची जाण असलेले, कुशल संघटक होते. भारतीय जाहिरातकलेतले सारे नियम त्यांनी बदलले आणि जाहिरातसंकल्पनात मोठे परिवर्तन घडवून आणले. केवळ खपाचा विचार न करता प्रथम कल्पना आणि कल्पकतेवरचा विश्वास याला त्यांनी सर्वाधिक महत्त्व दिले. मोठ्या आकारातल्या जाहिरातींना उत्तेजन दिले. कोणताही धोका न पत्करणे हाच सर्वांत मोठा धोका आहे अशी त्यांची शिकवण होती.

           १९७३ मध्ये अरुण काळे ‘रिडिफ्युजन’ या नव्याने स्थापन झालेल्या जाहिरातसंस्थेत रूजू होण्यासाठी ‘एमसीएम’मधून बाहेर पडले. ‘एमसीएम’मधून बाहेर पडलेल्यांनीच ही संस्था सुरू केली होती. ‘एमसीएम’मधल्या अशा अनेकांनी नव्या जाहिरात संस्था स्थापन करून अथवा स्वंतत्रपणे कामे करून भारतीय जाहिरातकलेत सर्जनशील क्रांती घडवून आणली.  अरुण काळे हे त्यापैकी एक प्रमुख संकल्पनकार होते.

           काळे यांनी ‘रिडिफ्युजन’सारख्या जाहिरातसंस्थांमध्ये १९७३ ते १९८३ या काळात सीनियर आर्ट डायरेक्टर, क्रिएटिव्ह डायरेक्टर अशा महत्त्वाच्या पदांवर कामे केली आणि अनेक महत्त्वाच्या देशी आणि परदेशी कंपन्यांच्या जाहिराती केल्या. राजीव अगरवाल आणि अरुण काळे यांनी १९८५ मध्ये भागीदारीत ‘नेक्सस अ‍ॅडव्हर्टायझिंग’ सुरू केली. ‘एचएमव्ही’ ध्वनिमुद्रिका, ओबेरॉय होटेल्स हे त्यांचे सुरुवातीचे क्लाएंट्स होते. १९९२ मध्ये रेमंड मिल्सचा अकाउण्ट मिळाला. ‘द कम्प्लीट मॅन’ या रेमंडच्या जाहिरातमोहिमेमुळे जीवनशैलीवर भर देणार्‍या ‘लाइफ-स्टाइल अ‍ॅडव्हर्टायझिंग’चे महत्त्व नव्याने प्रस्थापित झाले. दिल्लीला १९९४ मध्ये ‘नेक्सस’ची शाखा सुरू झाली. बंगळुरू येथे  १९९५ ला नवी शाखा उघडण्यात आली. ‘इंडियन एअरलाइन्स’, ‘व्हॅन हुसेन’, ‘आयोडेक्स’ यांच्या जाहिराती या काळात विशेष गाजल्या.

           नव्वदच्या दशकात ‘नेक्सस’ ही संस्था ‘इक्विटी’ या जाहिरातसंस्थेशी संलग्न झाली आणि मोहंमद खान यांच्याबरोबर ‘एंटरप्राइझ नेक्सस’ असे काळे यांच्या ‘नेक्सस’चे नवे नामकरण झाले. ‘लो ग्रूप’ (Low Group) जाहिरातसंस्थेचाही त्यात सहभाग होता. नव्वदच्या दशकातल्या उदारीकरणाच्या आणि जाग-तिकीकरणाच्या आर्थिक धोरणांमुळे ़क्रयवस्तूंच्या उत्पादनांत आणि त्यांच्या वितरणात, मार्केटिंगमध्ये मोठे बदल झाले. जाहिरातसंस्थांच्या स्वरूपामध्ये त्यानुसार बदल होणे अपरिहार्य होते. अरुण काळे २००० पर्यंत ‘नेक्सस’मध्ये होते. नंतरच्या काळात त्यांनी ‘काळे  ग्रफिक्स’ नावाचा स्वतःचा डिझाइन स्टूडिओ सुरू केला. इंटिग्रेटेड ब्रँडिंग, लोगो आणि पॅकेज डिझाइन, मल्टिमीडिया, साइनेज अशा विविध प्रकारांची कामे ते  करतात.

           दरम्यानच्या काळात ‘नेक्सस’चे अस्तित्व फक्त कागदोपत्री होते. २०११ मध्ये राजीव अगरवाल आणि अरुण काळे यांनी ‘नेक्सस’ जाहिरातसंस्था पुनरुज्जीवित केली आणि आज ती नव्या जोमाने चालू आहे. अरुण काळे क्रिएटिव्ह डायरेक्टर म्हणून आजही कार्यरत आहेत. अरुण काळे गेली चाळीस वर्षे जाहिरात क्षेत्रात आहेत आणि काळानुसार बदलत गेलेल्या जाहिरात आणि दृक्संवादकलेच्या क्षेत्रात ते नेहमीच आघाडीवर राहिलेले आहेत. त्यांना जाहिरात क्षेत्रातील दीडशे पारितोषिके आजपर्यंत मिळालेली आहेत. अ‍ॅडव्हर्टायझिंग क्लब, मुंबई आणि ‘कॅग’तर्फे ‘आर्ट डायरेक्टर ऑफ द इयर’ म्हणून त्यांना १९७६ आणि १९७७ मध्ये लागोपाठ दोनदा सन्मान मिळाला.  कॅगतर्फे ‘हॉल ऑफ फेम’ सन्मान त्यांना २००३ मध्ये देण्यात आला. ‘रीडर्स डायजेस्ट’तर्फे देण्यात येणारा ‘पेगॅसस’ पुरस्कारही त्यांना मिळाला आहे.

           काळे यांनी एरिक्सन मोबाइलसाठी जाहिरातमोहीम केली होती. त्यासाठी बनवलेल्या ‘वन ब्लॅक कॉफी’ या जाहिरातपटासाठी त्यांना कान्स महोत्सवात ‘सिल्व्हर लायन’ पुरस्कार मिळाला व त्या जाहिरातपटाची सहा देशांमध्ये पुन्हा निर्मिती करण्यात आली.

- दीपक घारे, रंजन जोशी

काळे, अरुण पद्मनाभ