Skip to main content
x

कस्तुरे, यज्ञेश्वर माधव

यज्ञेश्वरशास्त्री कस्तुरे

        ज्ञेश्वर माधव कस्तुरे यांचा जन्म कळमनुरी (जि. हिंगोली) येथे झाला. मागील सात पिढ्यांपासून अहिताग्नी वैदिक घराणे म्हणून प्रसिद्ध असलेल्या कस्तुरे घराण्यात त्यांचा जन्म झाला. त्यांच्या आईचे नाव मंदाकिनी होते. माधवशास्त्र्यांनी नंतर संन्यासाश्रम स्वीकारला. राजेश्वर, देवीदास, श्रीधर, प्रयाग, भगिनी ही त्यांची भावंडे होती. त्यांचे मातृछत्र लहानपणीच अंतरले, त्यामुळे काकू व मावश्यांनी त्यांचा सांभाळ केला.

     शालेय शिक्षण त्या काळानुरूप सहावीपर्यंत झाले. घरी वैदिक घराण्याचे संस्कार असल्यामुळे संस्कृत विद्येसह प्राथमिक वेदशिक्षण घरीच झाले. मुळातच त्यांची ओढ संस्कृत विद्येतील शास्त्रीय ग्रंथांकडे असल्यामुळे वडिलांनी त्यांना शास्त्र शिकण्यासाठी नाशिक येथे डॉ. कूर्तकोटी शंकराचार्य यांच्याकडे पाठविले. मठात सहाध्यायी चांगले मिळाले; पण भोजनव्यवस्था नीट नव्हती. कधी कधी तर फुटाणे खाऊन राहावे लागे. पण त्यांनी चिकाटी सोडली नाही. त्याच काळात त्यांच्या ‘आधुनिक काळात हिंदू संस्कृतीचे रक्षण कसे करावे’ या विषयावर निबंध स्पर्धेत लिहिलेल्या निबंधाला प्रथम पारितोषिक मिळाले.

      नंतर तेथून गुरुजी पुढील शिक्षणासाठी पुण्याला बापटशास्त्र्यांच्या ‘आचार्य’ कुलात दाखल झाले. तेथे दत्तमहाराज कवीश्वर, आचार्य द.वा. जोग यांसारखे सहाध्यायी त्यांना लाभले. ते आठ वर्षे आचार्य कुलात शिकले. त्याचबरोबर, पुणे येथील पंडित वाडीकरशास्त्री, पंडित निरगुडकरशास्त्री यांच्याकडेही त्यांनी न्याय, मीमांसादी शास्त्रांचे अध्ययन केले. त्या काळात आचार्य कुलाच्या मासिकाचे संपादनही ते करीत. त्या वेळी त्यांनी लिहिलेला ‘चातुर्वर्ण्य व भगवद्गीता’ हा शोधनिबंध फार गाजला. त्यानंतर त्यांनी इंदूरला प्रयाण केले. तेथे वे.शा.सं. श्रीपादशास्त्री हसूरकर यांच्याकडे सर्व शास्त्रांसह विशेषत: वेदान्ताचे शिक्षण घेतले. त्या वेळी ‘वेदान्ततीर्थ’ परीक्षेत मुद्रणदोषामुळे विचारलेला प्रश्नच कसा चूक आहे तो कसा असावयास पाहिजे हे प्रथम सांगून त्याचे सविस्तर उत्तर त्यांनी  लिहिले आणि श्रीपादशास्त्र्यांची शाबासकी मिळवली. अशा थोर विद्यागुरूकडून त्यांनी ज्ञान संपादन केले. त्यातून त्यांचे शिक्षण सकस, मूलग्रही व परिपक्व झाले. पुढे आचार्य ग.धों. देशपांडे यांच्याकडून त्यांनी आवश्यक तेवढे इंग्रजीचे ज्ञानही प्राप्त केले.

     परिपूर्ण शिक्षणानंतर कस्तुरे यांनी नागपूर येथील ‘धर्मवीर’ या साप्ताहिकाचे संपादक म्हणूनही काम केले. तिथे हैद्राबाद मुक्ती संग्रमाचे प्रवर्तक सेनानी स्वामी रामानंद तीर्थ यांची भेट झाली व कस्तुरे यांच्या शिक्षणाचा मराठवाड्यासाठी उपयोग झाला पाहिजे म्हणून त्यांनी  कस्तुरे गुरुजींना हिप्परगा येथील संस्थेत बोलावले. गुरुजींनी तेथे एक वर्ष शिकविले. नंतर काही वर्षे विदर्भातील श्रीक्षेत्र लोणी (सखाराम महाराज) येथील पाठशाळेत अध्यापन केले. पण तेथेही ते अधिक काळ रमले नाहीत. तेथून त्यांना मराठवाड्याचे मुख्य स्थान नांदेड या शहरी येण्याचा योग आला. १९३७ मध्ये संस्कृतप्रेमी जनांच्या साहाय्याने त्यांनी तिथे संस्कृत पाठशाळेची स्थापना केली. तेव्हापासून हीच त्यांची खरी कर्मभूमी ठरली. तेथे त्यांनी वयाच्या ५८ वर्षांपर्यंत अत्यंत अल्प मानधनात अध्यापनाचे कार्य केले. विद्यार्थ्यांच्या अध्यापनाकडे विशेष लक्ष देऊन मोफत गुरुकुल पद्धतीने विद्यार्थ्यांना ज्ञान दिले.

     रझाकारांच्या विरोधाच्या काळात अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतसुद्धा अत्यंत कष्टाने वीस विद्यार्थ्यांना बरोबर घेऊन ते बसार, जिंतूर, कार्ला, पुसद, धुळे इत्यादी ठिकाणी फिरत राहिले; पण पाठशाळा बंद पडू दिली नाही. हैद्राबाद मुक्तिसंग्रमानंतर पुन्हा पाठशाळा नांदेडला आली व पूर्ववत कार्य सुरू झाले. संस्थेचा उत्कर्षकाळ सुरू झाला. पाठशाळेचे महाविद्यालय झाले. मराठवाडा संस्कृत परिषदेची निर्मिती झाली. बालकांसाठी संस्कृत प्रचारासाठी सुलभ परीक्षा वर्ग चालविले. संस्कृत भाषेची रुची निर्माण केली व वाढविली. बहि:शाल व्याख्यानमालेत व्याख्याने दिली. अंशकालीन प्राध्यापक म्हणून पीपल्स महाविद्यालय,नांदेड, आयुर्वेदिक महाविद्यालय, नांदेड येथे काही वर्षे अध्यापक म्हणून कार्य केले.

     चिंतामणी महाराज वसमतकर,शंकर महाराज कंधारकर,हरी महाराज मुखेडकर, एकनाथ महाराज खडकेकर,अनंत महाराज टाकळीकर, डॉ. सीताराम जोशी, प्रभाकर जोशी, वसंत महाराज दीक्षित मिरखेलकर, नागनाथशास्त्री कोटगीरकर इ. संस्कृत शास्त्री-पंडितांच्या परंपरा कस्तुरे यांनी निर्माण केल्या.

     ते अनेक जिज्ञासू व्यक्ती, प्राध्यापक, प्राचार्यांपर्यंत सर्वांना उत्तम मार्गदर्शन करून त्यांच्या शंकांचे निरसन करीत. विशेषत्वाने सांगायचे म्हणजे प्राचार्य डॉ. सुरेंद्र बारलिंगे, प्राचार्य नरहर कुरुंदकर, प्रा. राम शेवाळकर इ. विद्वान मंडळी गुरुजींच्या ज्ञानाचा आदर करीत. ‘भामतीप्रकाश’ या ग्रंथात त्यांनी अवघडातील अवघड विषय उदाहरणांनी अत्यंत सुलभ करून सांगितला आहे. शैक्षणिक विषयात ‘वेदान्त उपाध्याय’, ‘वेदान्त रत्न’, ‘वेदान्ततीर्थ’ या पदवी परीक्षेत ते सर्वप्रथम आले, तर अध्यापनकार्यात सांस्कृतिक व पारमार्थिक कार्यात त्यांना विविध उच्च पदव्यांनी, पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले.

     महामहोपाध्याय, विद्यानिधी, महर्षि वेदव्यास पुरस्कार, आळंदी ब्रह्मवृंद पुरस्कार, श्रीमंत नानासाहेब पेशवे पुरस्कार, श्रीमद् जगद्गुरू आद्य शंकराचार्य पुरस्कार, संस्कृत पंडित पुरस्कार (महाराष्ट्र शासन), राज्य साहित्य गौरववृत्ती पुरस्कार (म.रा.सा.सं.मं.), जिजामाता विद्वत् गौरव पुरस्कार, भगवान बार्शी येथील जीवनव्रती पुरस्कार, अद्वैत वेदान्त पुरस्कार अशा अनेक पुरस्कारांचे ते मानकरी ठरले.

    कस्तुरे यांचे ग्रंथलिखाणही विपुल आहे. त्यात प्रामुख्याने ‘चातुर्वर्ण्य व भगवद्गीता’, ‘जगद्गुरु शंकराचार्याणाम् विद्यां च अविद्यां च’, ‘भरतमुनींचा रसविचार आणि प्राचीन दर्शनकार’, ‘प्रवृत्ती धर्म, निवृत्ती धर्म’, ‘भामती प्रकाश’ खंड १ व २ यांचा उल्लेख करावा लागेल. याशिवाय इतरत्र प्रकाशित झालेले लेख- ‘आचार्यांचे भक्तितत्त्व’, ‘पौर्वात्य तत्त्वज्ञान आणि कुरुंदकर’, संस्कृत - आत्मकल्याण, जनकल्याण करणारी भाषा, चातुर्वर्ण्य आणि जातिसंस्था यांचे स्वरूप, भगवद्गीता की गुरुगीता, भारतीय संस्कृती, कीर्तन - एकपात्री प्रयोगाची जन्मोत्री इ. अनेक विषयांवर त्यांचे  लेख प्रकाशित आहेत. आकाशवाणीवरूनही त्यांची बहुमोल व्याख्याने झाली.

     गुरुवर्यांचा विवाह बुलडाणा येथील वैदिक घराण्यातील वे.शा.सं. केशवगुरू धर्माधिकारी यांच्या सुशील, सुंदर मथुरा नावाच्या कन्येबरोबर इ.स. १९३५ मध्ये झाला. त्यांना तीन मुले व दोन मुली झाल्या.

     ५८ वर्षे पूर्ण होताच सर्व कार्यातून निवृत्त होऊन घरदार, पुत्र, संसार यांचा मोह न धरता उभयतांनी निर्णय घेतला आणि कोणालाही न सांगता ‘आत्मार्थं पृथिवीं त्यजेत्’ या न्यायाने आत्मचिंतनासाठी सावरगाव येथील वा.कि. कुलकर्णी यांच्या शेतात एका पर्णकुटीत त्यांचे ऋषितुल्य जीवन सुरू झाले (१९६६). हे ठिकाण आष्टी, ता. परतूर, जि. जालनापासून १३ कि.मी. व सावरगावापासून २ कि.मी दूर निर्जन प्रदेशात होते. साप, विंचू यांचे वसतिस्थान. पण नियतीच्या मनात त्यांचे राहिलेले वेदोद्धाराचे कार्य पूर्ण करून घ्यायचे होते.

    ‘जीवेत् शरद: शतम्’ या शास्त्रवचनानुसार ते ९८ वर्षे जगले. या दीर्घायुष्याचा सदुपयोग त्यांनी संस्कृत विद्येचे व वेदसेवेचे पर्वतप्राय: विशाल कार्य करण्यात केला. स्वत: नि:स्पृह, त्यागी, ज्ञानसंपदा व सदाचारसंपन्न राहून केवळ परार्थ देह झिजवला. त्यांचे निधन भाद्रपद शुद्ध प्रतिपदेला झाले.

डॉ. धुंडिराज कहाळेकर

कस्तुरे, यज्ञेश्वर माधव