Skip to main content
x

खर्डेनवीस, प्रभाकर नीळकंठ

     प्रभाकर नीळकंठ खर्डेनवीस यांचा जन्म नागपूरपासून जवळ असलेल्या पाटणसांगवी इथे झाला. वडील नीळकंठ व आई सीताबाई नागपूरच्या महाल विभागात राहत. वडील डी.ए.जी.पी.टी. मध्ये नोकरीला होते व त्यांना गायनाची आवड होती. वडिलांनी प्रभाकरला १९२८ सालीच अभिनव संगीत विद्यालयात दाखल केले. प्रभाकरकडे बालवयातच मधुर आवाज,  कुशाग्र बुद्धी,  गुणग्राहक प्रवृत्ती व उत्तम समज असा गुणसमुच्चय होता. त्यांना १९३२ साली ‘बालभास्कर’ ही पदवी मिळाली होती. खर्डेनवीस यांचे गुरू शंकरराव प्रवर्तक यांनी त्यांना बालवयातच चांगले तयार केले व त्यांच्या बालवयीन गाण्याचे सवाई गंधर्व, वि.ना. भातखंडे, राजाभैया पूछवाले या सर्वांनी कौतुक केले, त्यांना प्रशस्तिपत्रे दिली. 
त्यांनी १९३५ मध्ये संगीत मध्यमा परीक्षा उत्तीर्ण केली. त्याच साली त्यांचे वडील निवर्तले, त्या वेळी त्यांचे शालेय शिक्षण कसेबसे चालू होते. ते व्यायामशाळेत जात, गणेशोत्सवातल्या मेळ्यात, नाटिकांमध्ये हौसेने भाग घेत. त्यांनी १९३६ मध्ये लखनौ येथे आयोजित संगीत परिषदेत, तसेच खैरागड येथेही मैफली गाजवल्या. 
प्रभाकर खर्डेनवीस १९४० साली नीलसिटी हायस्कूलमधून मॅट्रिक होऊन हिस्लॉप महाविद्यालयात दाखल झाले; परंतु घरगुती अडचणीमुळे शिक्षणात खंड पडला. मात्र भातखंडे म्युझिक वर्ग घ्यायची सुसंधी त्यांना मिळाली. नागपूरच्या दीक्षान्त समारंभात आलेले जोधपूरचे रसिक प्रभाकर खर्डेनवीस यांच्या गायनावर लुब्ध होऊन त्यांनी जोधपूरला एक महिनाभरासाठी त्यांना नेले. खर्डेनवीस यांनी १९४४ मध्ये जबलपूरच्या मिलिटरी अकाउण्ट्स कार्यालयामध्ये ८-९ महिने नोकरी केली, तसेच नागपूरच्या पी.एम.जी. कार्यालयात काही काळ नोकरी केली. ते १९४५ मध्ये संगीत प्राज्ञ विशारद झाले. त्यांची सीताबाई कला महाविद्यालयात संगीत अध्यापकपदी नियुक्ती झाली. ते स्वतः हार्मोनिअम, दिलरुबा, सारंगी, व्हायोलिन या वाद्यांचे निष्णात वादक होते व पं. विष्णू दि. पलुसकरांच्या गायनाला त्यांनी व्हायोलिनची संगत केली होती. चतुरस्र कलाकार असा त्यांचा लौकिक चारी दिशांना पसरला. त्यांनी ‘संशयकल्लोळ’ या नाटकाच्या प्रयोगांतही काम केले.
हिंदुस्थानी संगीत प्रसारक मंडळाने २४ ऑक्टोबर १९४८ रोजी ‘संगीत शेखर’ पदवी देऊन खर्डेनवीस यांचा
  गौरव केला. सुरेल आवाज, प्रभावी, डौलदार आलापी, अचूक स्वरफेक, सरगमचा आविष्कार,  सफाईदार ताना, शास्त्रशुद्ध उठावदार गायकी ही त्यांची  वैशिष्ट्ये होती. भातखंडे म्युझिक कॉलेजची संपूर्ण जबाबदारी १९५१ पासून त्यांच्यावर सोपविली गेली.

या महाविद्यालयात अनेक विख्यात कलाकारांचे कार्यक्रम होऊ लागले. या संस्थेस १९५२ मध्ये केंद्रीय नभोवाणी मंत्री डॉ. केसकर यांनी व नंतर चीन व सिलोन सरकारच्या प्रतिनिधींनीही या संस्थेस भेट दिली होती. या महाविद्यालयात १९६३ पासून एम.ए.साठी संगीत विषय सुरू केला गेला. अनेक विद्यापीठांचे ते संगीत परीक्षक होते. त्यांनी अनेक विद्यार्थी तयार केले. त्यांच्या कुटुंबातील सर्व बंधु-भगिनींना संगीताची आवड आहे. त्यांची पत्नी उषाताई या सुप्रसिद्ध लेखक-दिग्दर्शक पुरुषोत्तम दारव्हेकरांची चुलतबहीण होती. खर्डेनवीस यांनी बऱ्याच रचना स्वरबद्ध केल्या होत्या. ‘गांधीराग’ ही त्यांची अभिनव कलाकृती होती. 

          वि.ग. जोशी

 

खर्डेनवीस, प्रभाकर नीळकंठ