Skip to main content
x

मुल्लर, आर्चिबाल्ड हर्मन

         राष्ट्रवादी प्रेरणांना प्रतिसाद देणारी चित्रे, भारतीय पौराणिक ग्रंथ, तसेच रामायण-महाभारत या महाकाव्यांतून स्फूर्ती घेऊन त्यांतील प्रसंगांवर, घटनांवर आधारित दर्जेदार चित्रे काढणारे, राजा रविवर्मांचा विशेष प्रभाव असलेले व ‘बॉम्बे स्कूल’च्या कलापरंपरेतील जर्मनवंशीय चित्रकार आर्चिबाल्ड हर्मन मुल्लर यांचा जन्म केरळमधील कोचीन येथे झाला. वडील हर्मन मुल्लर यांचा एका हिंदू रोमन कॅथलिक मुलीशी विवाह झाला. त्यांचे तिसरे अपत्य म्हणजे आर्चिबाल्ड. वडील लहानपणीच निवर्तल्यामुळे त्यांचे शालेय शिक्षण होऊ शकले नाही. त्यांना लहानपणापासूनच चित्रकलेची आवड होती. त्यांची दृश्य-स्मरणशक्ती बालपणापासूनच विलक्षण असावी. लहानपणी इतरांच्या मदतीशिवाय ते चित्रांच्या नकला करीत. एकदा पाहिलेल्या व्यक्तीचे ते स्मरणाने, त्या व्यक्तीची ओळख पटण्याइतपत चित्र काढायचे.

मद्रास स्कूल ऑफ आटर्सच्या मेमरी ड्रॉइंग परीक्षेतही मुल्लर प्रथम क्रमांकाने आले होते. (त्यांच्या तल्लख स्मरणशक्तीची आणि कौशल्याची ही साक्षच होय.) मुल्लरांचे कलाशिक्षण मद्रास स्कूल ऑफ आटर्समध्ये झाले. त्यानंतर अर्थार्जनासाठी, छायाचित्रकार भावाच्या स्टूडिओत सेपिया टोनच्या फोटोंवर तैलरंगांत रंग लावून त्यांनी व्यक्तिचित्रणाची कामे केली. एकदा कोचीनला मुल्लरांच्या घरी वास्तव्यास असलेल्या त्यांच्या मावशीने  त्यांच्याविषयी काही अपमानास्पद उद्गार काढल्यामुळे राग येऊन मुल्लरांनी घर सोडले. त्यानंतर हैदराबाद, पुणे इत्यादी ठिकाणी आपले नशीब अजमावण्याचा त्यांनी प्रयत्न केला व अखेरीस १९१० मध्ये ते मुंबईला आले

त्यांनी १९१० ते १९२२ हा बारा वर्षांचा काळ मुंबईत व्यतीत केला. ते १९२२ नंतर पुन्हा १९२८ मध्ये मुंबईत आले. मुंबईतल्या दीर्घ वास्तव्यात त्यांच्याकडून उत्तम चित्रनिर्मिती झाली.

बॉम्बे आर्ट सोसायटीच्या १९११ च्या प्रदर्शनात त्यांच्या ‘प्रिन्सेस गिव्हिंग गिफ्ट टू ब्राह्मिन बॉय’ या चित्राला सुवर्णपदक लाभले. रविवर्मांच्या चित्रावरून स्फूर्ती घेऊन त्यांनी ही चित्रनिर्मिती केली होती.

मुंबईत त्यांची सर्जनशीलता बहरत होती. मुंबईतील हाटे कंपनीत ते दरमहा ५०० रुपयांवर नोकरी करत होते. पण ही कंपनी काही दिवसांनी बंद पडली. याच काळात, १९१६ च्या सुमारास, त्या वेळचे मुंबईतील समकालीन चित्रकार ए.एम. माळी यांच्याबरोबर सॅण्ड्हर्स्ट रोडवरील पॉवेल कंपनीसमोर असलेल्या रामचंद्र मॅन्शनमध्ये मुल्लर यांनी चित्रकलेचे वर्ग चालविले. पुढे हा वर्गही बंद झाला. अर्थार्जनासाठी ते काही खासगी शिकवण्याही करीत. परंतु त्यांची आर्थिक घडी नीट बसू शकली नाही. हा काळ पहिल्या महायुद्धाचा (१९१४-१९१९) होता. त्या संदर्भात याच काळातील एक प्रसंग मुल्लरांच्या चित्रकौशल्यावर प्रकाश टाकतो.

भारतात सत्तेवर असलेल्या ब्रिटिशांकरिता मुल्लर हे मूळचे जर्मन वंशातले असल्यामुळे शत्रुपक्षाचे होते. त्यामुळे महायुद्धाच्या काळात त्यांच्यापुढे दोन पर्याय ठेवण्यात आले. अहमदनगरच्या तुरुंगात खितपत पडणे, अथवा भारतात बरेच दिवस वास्तव्य केल्यामुळे हिन्दी प्रजाजन म्हणून अंँग्लो इंडियन लोकांबरोबर राखीव सैन्यात भरती होणे. मुल्लरांनी दुसरा मार्ग पत्करला व ते परेडला जाऊ लागले.

या सैन्याला कवायत शिकविण्याचे काम एका गोर्‍या सार्जंटकडे होते. या लोकांतील बेशिस्त पाहून तो गोरा  सार्जंट चिडून जाई. अशाच एका प्रसंगी तो सार्जंट वैतागाने डोके खाजवीत बसल्याचे या चित्रकाराने पाहिले व या प्रसंगाचे अतिशय बोलके चित्र मुल्लर यांनी स्मृतीने काढले. ते पाहून तो गोरा सार्जंट खूष झाला व त्याने मुल्लरांकडे या चित्राची मागणी केली. मुल्लर यांनी ते चित्र त्याला देण्याचे कबूल केले. पुढे बॉम्बे आर्ट सोसायटीच्या प्रदर्शनात ते चित्र लागले असताना त्या वेळच्या गव्हर्नरच्या पत्नी लेडी विलिंग्डन यांना ते चित्र  अतिशय आवडले व त्यांनी ते विकत घेण्याची इच्छा व्यक्त केली. परंतु मुल्लरांनी आधीच ते सार्जंटला देण्याचे कबूल केले असल्यामुळे गव्हर्नरच्या पत्नीलाही ते चित्र देता येणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट सांगितले. या घटनेतून त्यांच्या चित्रकलेतील कौशल्यासोबतच स्वभावातील प्रांजळपणा व स्पष्टवक्तेपणा दिसून येतो.

मुल्लर यांनी आपल्या आयुष्यात कधीही कलानिर्मितीच्या संदर्भात तडजोड केल्याचे दिसत नाही. आर्थिक परिस्थितीच्या नित्य तणावाने मुल्लरांना मुंबईत राहणे अवघड होऊन बसले. त्याच वेळी बिकानेरच्या महाराजांनी त्यांना चित्रकार म्हणून आमंत्रित करून नोकरी देऊ केली म्हणून १९२२-२३ च्या सुमारास ते मुंबई सोडून बिकानेरला गेले.

बिकानेरच्या महाराजांना शिकारीचा शौक होता. त्यामुळे ते शिकारीला आपल्या लवाजम्या-बरोबर मुल्लरांनाही स्केचिंगला घेऊन जात. परत आल्यावर ते महाराजांना त्यांच्या आवडीप्रमाणे चित्रे काढून देत. जवळजवळ चार वर्षे ते बिकानेरला होते. या अवधीत त्यांना आर्थिक स्थैर्यही मिळाले. पण हा कलावंत या  कामाला कंटाळला होता. आपल्या जन्मगावी स्टूडिओ बांधून आपल्या आवडीची चित्रे काढावीत अशी त्यांची इच्छा होती. या उद्देशाने आपली सर्व कमाई त्यांनी आपल्या बहिणीच्या यजमानांकडे विश्‍वासाने पाठवली. काही काळानंतर बिकानेरची नोकरी सोडून ते जेव्हा केरळात आपल्या बहिणीकडे परतले, तेव्हा आपण पाठविलेली सर्व रक्कम नाहीशी झाल्याचे त्यांना कळले. परिणामी, घर व स्टूडिओ उभारण्याची कल्पना त्यांना सोडून द्यावी लागली.

ते १९२८ मध्ये केरळातील आपल्या तरुण भाचीशी लग्न करून मुंबईला परत आले. त्या वेळी ते चौपाटीवर बाबुलाल मॅन्शनमध्ये राहत होते. आता संसार असल्यामुळे खर्च वाढला होता. पैशांची चणचण अधिकच भासत होती. या काळात त्यांची काही चित्रे विकलीही गेली. पण वाढत्या संसाराला ती कमाई पुरत नव्हती. अखेर त्यांना मुंबई सोडावी लागली. ते पुन्हा राजस्थानात गेले व जोधपूर येथील किंचेला या अँग्लो-इंडियन स्नेह्याकडे ते राहू लागले. परंतु किंचेला यांची फिरोजपूरला बदली झाल्यामुळे ते ओ.पी. सांघी या चित्रविक्रेत्याकडे, त्याच्या आग्रहानुसार राहू लागले.

त्यांनी या चित्रविक्रेत्यासाठी अनेक चित्रे काढली. चित्रविक्रेत्याने मुल्लर यांच्या कलाकृती विकून हजारो रुपये कमवले; परंतु मुल्लरांना तो पुरेसे पैसे देत नसे. शिवाय मुल्लरांचे येथील वास्तव्यही अतिशय कष्टप्रद होते. सांघी यांनी नोकराच्या जागेत त्यांना एक खोली दिली होती. या लहानशा खोलीत मुल्लरांना अतिशय त्रास होई. मुल्लर यांच्या एका शिष्याने ही परिस्थिती मुल्लरांच्या कलेचे एक चहाते झालामंदचे ठाकूरसाहेब यांच्या कानावर घातली. ठाकूरसाहेबांनी मुल्लरांना आपल्याकडे राहण्यासही बोलाविले. परंतु सांघीला वाईट वाटेल म्हणून त्यांनी या आमंत्रणास नकार दिला.

ठाकूरसाहेबांनी ही माहिती जोधपूरच्या महाराजांच्या आजीला, राजदादी यांना दिली व मुल्लरांची काहीतरी चांगली व्यवस्था करण्याविषयी विनंती केली. राजदादीसाहेबांनी हिंमतसिंहजी या आपल्या थोरल्या चिरंजीवांच्या मदतीने चित्रविक्रेत्या सांघी यांच्याकडून मुल्लर यांना युक्तीने आपल्याकडे राहायला आणले व त्यांची राहण्या-खाण्याची उत्तम बडदास्त ठेवली.

यानंतरचे मुल्लरांचे आयुष्य सुखात गेले. या राजघराण्यातील मंडळींनी मुल्लर यांना अतिशय प्रेमाने वागविले. राजदादीसाहेबांनी व त्यांच्या परिवारातील इतरांनीही त्यांच्याकडून काही धार्मिक व पौराणिक चित्रे काढून घेतली. राजस्थानचे राज्यपाल, तसेच कोटा उदेपूर व जोधपूरच्या महाराजांनीही मुल्लरांकडून अनेक चित्रे काढून घेतली.

महाराज हिंमतसिंहजींकडे मुल्लरांनी सहा वर्षे काढली. त्यांच्या वयाला आता ८२ वर्षे पूर्ण झाली होती. या दरम्यान काही पोटाचा विकार उत्पन्न झाल्यामुळे त्यांना रुग्णालयामध्ये ठेवण्यात आले. या आजारातून ते बरे झाले होते व त्यांना २४ सप्टेंबर १९६० रोजी परत घरी आणण्याचे ठरले होते. पण त्याच दिवशी पहाटे त्यांचे निधन झाले. अंत्यसमयी कुटुंबीयांपैकी त्यांच्याजवळ कोणीही नव्हते.

आर्चिबाल्ड मुल्लर हे व्यक्तिचित्रण, निसर्गचित्रण, जेनर (ॠशिीश) तसेच अगणित मानवाकृती असलेली रचनाचित्रे करण्यात निष्णात होते. तैलरंग, जलरंग, पेस्टल्स, चारकोल इत्यादी विविध माध्यमांवरही त्यांचे प्रभुत्व होते.

ज्याला सर्जनशील कालखंड म्हणता येईल तो मुल्लरांचा ऐन उमेदीचा काळ मुंबईत गेला. महाराष्ट्रातील संस्कृतीचा, तसेच त्या वेळी असलेल्या राष्ट्रीय चळवळीचा काळ व तत्कालीन विचारसरणीचा प्रभावही त्यांच्यावर झालेला दिसून येतो. ‘बॉम्बे स्कूल’चा हा बहराचा काळ. त्यामुळे बॉम्बे स्कूलच्या वास्तववादी चित्रशैलीचा प्रभाव त्यांच्यावर दिसतो.

राजा रविवर्मा या चित्रकाराचा सर्वांत महत्त्वाचा प्रभाव त्यांच्या बॉम्बे आर्ट सोसायटीच्या सुवर्णपदक विजेत्या चित्रावर दिसून येतो. इतकेच नव्हे, तर अनेक चित्रविषयही रविवर्मांप्रमाणे रामायण, महाभारत, भारतीय पुराणे तसेच भारतीय महाकाव्ये, यांच्यातून प्रेरणा घेऊन मुल्लरांनी निवडले. विसाव्या शतकाच्या सुरुवातीच्या काळातील राष्ट्रवादी प्रेरणेला प्रतिसाद म्हणूनही या दोन रामायण-महाभारत ग्रंथांविषयीची ओढ त्यांना निर्माण झाली असावी. महाराष्ट्राच्या इतिहासातून स्फूर्ती घेऊनही त्यांनी काही चित्रे काढली. ‘औरंगजेबाच्या कैदेत शिवाजी’ हे औंधच्या संग्रहालयात उपलब्ध असलेले त्यांचे चित्र याची साक्ष देते. या चित्रांची शैली पाश्‍चिमात्य यथार्थदर्शी असली तरी त्यामागील प्रेरणा राष्ट्रवादी व स्वातंत्र्यचळवळीतून स्फुरलेली असावी असे वाटते.

अगणित मानवाकृतींची अतिशय सुरेख पद्धतीने केलेली चपखल, पण नैसर्गिक योजना व रचना हे मुल्लरांच्या चित्रांचे वैशिष्ट्य होय. ते त्यांच्या तैलरंगातील मोठ्या आकारांच्या चित्रांतून प्रत्ययास येते. नाट्यपूर्ण रचना, छायाप्रकाशाचा विलक्षण खेळ व आरेखन व माध्यम हाताळण्यातील कौशल्यातून त्यांची चित्रे फुलत जातात. मुल्लर यांचा मानवी शरीररचनेचा सखोल अभ्यास होता. मुल्लरांच्या चित्रांतील स्त्री-पुरुष प्रमाणबद्ध, उंचीने थोडे जास्त, सडपातळ बांध्याचे दिसतात. स्त्रियांची रेखाटने अतिशय नाजूक व रेखीव असून त्यांत स्त्री-सौंदर्याची तरल अभिव्यक्ती आढळते.

पाश्चात्य आणि पौर्वात्य या दोन्ही शैलींच्या मिलाफाने झालेल्या ‘इंडो-युरोपिअन’ शैलीचा प्रभाव त्यांच्या चित्रांतून दिसतो. पाश्‍चात्त्यांची वास्तववादी/निसर्गवादी शैली, पौर्वात्यांची अलंकरणात्मक पद्धत या दोन्हींवर त्यांची हुकमत होती. त्यांनी काही चित्रे जलरंगात,  निव्वळ आलंकारिक शैलीतही केली आहेत. मद्रास आर्ट स्कूलमधील पारंपरिक कलाकौशल्य, कारागिरी व थोडी अलंकरणात्मकताही त्यांच्या बऱ्याच चित्रांमधून दिसून येते.

मुल्लरांच्या चित्रांतील रंगलेपन अतिशय नाजूक व तरल आहे. घटनेच्या अनुषंगाने वातावरणनिर्मितीकडे त्यांनी लक्ष दिल्याचे जाणवते. त्यांच्या काही चित्रांतून वेशभूषेचे रेखांकन व रंगलेपनाचे वैशिष्ट्य लक्ष वेधून घेते. विशेषत: नेसलेल्या वस्त्रावरील चुण्या, त्यांचा पोत, पारदर्शकत्व, तसेच अपारदर्शकता यांचा सुरेल संगम असून हे सर्व फार चांगल्या प्रकारे हाताळलेले दिसते. जलरंग, तैलरंग व पेस्टल्स या माध्यमांविषयी असलेली त्यांची संवेदनक्षमता विविध चित्रांतून प्रत्ययास येते.

‘जनक राजाच्या दरबारी विश्‍वामित्र’, ‘जटायूचा वध व सीतेची कृतज्ञता’, ‘रावण-जटायू’, ‘रामाचे सीतेस वनवास निवेदन’ इत्यादी रामायणातील चित्रे, ‘गंगावतरण’, ‘उषास्वप्न’, ‘द्रौपदीवस्त्रहरण’, ‘गीतोपदेश’ इत्यादी महाभारतातील विषयांवरील चित्रे मुल्लरांनी केलेली आहेत. याशिवाय बुद्धाच्या जीवनावर त्यांनी चित्रे केली असून ग्रमीण भागातील निसर्गचित्रे व प्रांतीय पेहराव केलेल्या निरनिराळ्या वर्गांतील स्त्रियांचे त्यांच्या सभोवतालच्या पार्श्‍वभूमीसकट मुल्लरांनी केलेले चित्रण विलोभनीय आहे.

मुल्लर हे एक स्थितप्रज्ञ वृत्तीचे संवेदनशील चित्रकार होते. कौटुंबिक जीवनात त्यांना फारसे सुख लाभले नाही. अत्यंत प्रतिकूल व हलाखीच्या परिस्थितीतही आपल्या आतील कलावंताची संवेदनक्षमता व कलेविषयीची निष्ठा व धारणा त्यांनी कधीच ढळू दिली नाही. मुल्लर यांचे शिष्य एस.बी. शिरगावकर यांनी ‘परलोकवासी चित्रकार आर्चिबाल्ड हर्मन मुल्लर’ ही छोटेखानी सचित्र पुस्तिका प्रसिद्ध करून आपल्या गुरूला त्यांच्या मृत्यूनंतर श्रद्धांजली वाहिली आहे.

- माधव इमारते

मुल्लर, आर्चिबाल्ड हर्मन