Skip to main content
x

पाटणकर, श्रीपाद गणपत

गगनगिरी महाराज

    गनगिरी महाराज म्हणजेच पूर्वाश्रमीचे श्रीपाद गणपतराव पाटणकर, यांचा जन्म सातारा जिल्ह्यातील पाटण तालुक्यातील मंदुरे या खेड्यात चालुक्य सम्राट पुलकेशी वंशातील क्षत्रिय सरदार पाटणकर यांच्या राजकुळात, श्रीमंत बाजीराव खळोजी यांच्या हुजूरवाड्यात झाला. त्यांचे पाळण्यातले नाव श्रीपती. श्रीपती तीन वर्षांचा असताना आई विठादेवी आणि पाच वर्षांचा असताना वडील गणपतराव यांचे निधन झाले.

मातृ-पितृछत्र हरपल्यानंतर श्रीपती घर सोडून सातव्या वर्षी नाथ संप्रदायाच्या बत्तीस शिराळा, सांगली येथील मठात निघून गेला. श्रीपतीच्या घरात आध्यात्मिक वातावरण होते. एकदा लहान वयातच श्रीपती सवंगड्यांसह खेळताना तलावाच्या खोल पाण्यात तीन तास बसून राहिले होते. त्यानंतर पुढेही त्यांनी बराच काळ पाण्यात बसून तपाचरण केले होते आणि जलयोगी ही उपाधी त्यांना मिळाली. सांगली येथील मठात त्यांनी अध्यात्म आणि संतविचारांचा अभ्यास केला आणि बालवयातच संन्यास घेऊन ते बालयोगी बनले. मठात त्यांचे नाव ‘श्रीपाद’ ठेवण्यात आले. ‘‘मला परमेश्वराला भेटायचे आहे,’’ असे सांगितल्यानंतर मठातील चित्रानंद स्वामींनी श्रीपादांचा निर्णय जाणून कठोर साधनेची जाणीव करून दिली व त्यांना अष्टांगयोग आणि नाथपंथाच्या अनेक साधना व क्रिया शिकविल्या.

नंतर श्रीपाद यांनी भारत परिक्रमा सुरू केली. योग, अध्यात्माच्या उच्च अध्ययनासाठी त्यांनी नेपाळ, भूतान मानसरोवर, बद्री-केदार, पशुपतिनाथ, गौरीशंकर, गंगेचे खोरे, हिमाचल प्रदेश अशा अनेक डोंगराळ प्रदेशांतील एकांतात आपली साधना सुरू केली.

बद्रिकाश्रमातील एका गुहेत ते ध्यानस्थ बसले असताना एक साधू त्यांच्यासमोर आले आणि त्यांनी आपल्या कमंडलूतील जलाचे सिंचन त्यांच्या चेहर्‍यावर केले. नंतर साधूने त्यांना आपल्याकडील वनस्पती सेवन करण्यास दिली आणि ‘‘तुझ्याकडून मानवजातीचे कल्याण होईल, तुझ्या वाचेला दिव्य शक्ती लाभेल, तुला सर्व सिद्धी प्राप्त  होतील, तू दक्षिणेकडे जा,’’ असे सांगितले. त्यानुसार बालयोगी श्रीपादांनी उत्तरेकडून दक्षिणेकडे मार्गक्रमणा सुरू केली.

दक्षिणेकडे वाटचाल करतानाच त्यांना भोपाळ येथे, करवीर संस्थानचे छत्रपती राजाराम महाराज एका तलावाच्या काठावर भेटले. मराठी बोलणारा साधू पाहून महाराजांनी त्यांना कोल्हापुरात येण्यास सांगितले. त्यानुसार, कोल्हापूर येथे श्री महालक्ष्मीच्या दर्शनार्थ गेल्यानंतर देवीने त्यांना ‘गगनबावडा येथील गगनगडावर राहा,’ असा आदेश दिला. या आदेशानंतर बालयोगी श्रीपाद यांनी गगनबावडा परिसरातील निसर्गादी वन्यजीवन संपन्न प्रदेशात आपला तळ ठोकला. तोवर या असामान्य बालयोग्याची कीर्ती परिसरात पसरली आणि बालयोगी श्रीपाद ‘गगनगिरी महाराज’ म्हणून लोकांत परिचित झाले.

अनुयायांच्या मदतीने गगनगिरी महाराजांनी यथावकाश गडावर आश्रम स्थापित केला. आपल्याकडील योग, सिद्धी, विद्येच्या साधनेतून अनुयायांना आध्यात्मिक, तसेच आरोग्यादी समस्यांवरील मार्गदर्शन, उपाययोजना सुचविण्याचे काम सुरू केले. ‘‘समयसूचकता आणि प्रसंगावधान राखा. कष्ट, जिद्द, तपश्चर्या आणि गुणग्रहक बुद्धीच्या जोरावर तुम्ही स्वावलंबी आणि बलशाली व्हा. लाचारीने जगू नका,’’ हा उपदेश ते लोकांना करीत. ‘जंगलातील वनस्पती मला जगवतात. जंगलातील काळाभोर दगड ही माझी माता, पर्वतावरील कुंडातील स्वच्छ पाणी हे माझे दूध, आणि सूर्यप्रकाश हेच माझे जीवनसत्त्व,’ असे ते मानत. गगनगिरी महाराजांच्या साधनेमध्ये नाथप्रक्रियेमधील ‘भस्त्रिका’ ही जीभ बाहेर काढून सूर्याकडे नजर केंद्रित करण्याची, आत्मज्ञानप्राप्तीची क्रिया, लिंगदेहाला शुद्ध करण्याची ‘नौली’ म्हणजे ‘विमलज्ञानप्राप्ती’ क्रिया, जलयोग क्रिया, संपूर्ण अंगाला गाईचे शेण आणि गोमूत्र लावून नंतर शुद्ध पाण्याने शरीर स्वच्छ धुण्याची ‘गोरक्षनाथी विद्या’ ज्यामुळे अंगातील विष नष्ट होते, रक्त शुद्ध होते आणि कायाकल्प होतो; बेंबीतून खाली लहान आतड्याला दाब देऊन पाण्यात आसन लावून मल काढण्याची ‘प्लीवा शक्ती’ ही प्रक्रिया; शिवांबू प्राशन, संपूर्ण अंगाला विविध प्रकारचे लेप लावून करावयाची कायाकल्प ही गोरक्षनाथी विद्या, जालंदरनाथ योग, अष्टांगयोग, त्याचप्रमाणे रेवाती तप, रेवाखंडे, जंबुद्वीपे, भरतखंडे, रेवातीरे, अरण्यके, विशाल तपे, महायोगे, योगेंद्र नवनाथे, नागबाबा या तपांचा आणि आचरणांचा समावेश आहे.

गगनबावडा येथील गडावरील आश्रमातील वास्तव्य आणि लोक संबोधनानंतर गगनगिरी महाराजांनी खंडाळा घाटाजवळील खोपोली येथील जंगलात तपश्चर्येसाठी प्रस्थान ठेवले. तेथील औदुंबराखाली पाताळगंगा नदीच्या डोहात ते तपासाठी उभे राहत. श्रद्धेला धर्माच्या आणि देव-देवतांच्या मर्यादा नसतात.

एकदा एका पाश्चात्त्य भगिनींची महाराजांच्या विचारांशी श्रद्धा जडली. ती महाराजांच्या ठिकाणी ख्रिस्ताला पाहू लागली. त्यावर महाराजांनी फार मोलाचे भाष्य केले. ते म्हणाले की, ‘‘ती स्त्री जरी पाश्चात्त्य असली, तरी तिने अनेक जन्मी श्रद्धायुक्त भक्ती करून ईश्वराशी नाते जोडले आहे. त्यामुळेच ती माझ्या ठिकाणी येशू ख्रिस्ताला पाहू शकते.’’

गगनगिरी महाराजांनी आपल्या सिद्ध साधनेच्या जोरावर शारीरिक, मानसिक व्याधींनी रंजलेल्या, गांजलेल्या लोकांना उपदेशाने, वनौषधींनी आणि योगसिद्धि सामर्थ्याने व्याधिमुक्त केल्याचे लोक सांगतात. तरीही, त्यांचा उपदेश हा नेहमी, सत्कर्म, सत्संग आणि वस्तुनिष्ठ विचारांतून, अनुभवांतून सिद्धी प्राप्त करण्याबद्दलचा होता. गगनगिरी महाराजांचे महाराष्ट्रातील गगनबावडा, खोपोली, मुंबईतील मनोरी आदी ठिकाणांसह भारतातील अनेक प्रदेशांत सत्संग, तसेच आश्रम आज लोकांमध्ये आध्यात्मिक जागरणाचे काम करीत आहेत.

‘‘जगात माझं नावलौकिक झालेलं चांगलं, की प्रत्येक गोरगरिबाच्या पोटाला दोन वेळ अन्न मिळालेलं चांगलं?’’ हा विचार प्रसारित करणारे गगनगिरी महाराज सोळा ते वीस वयोगटातल्या युवकांनी या सेवाकार्यात सहभागी होण्याचे आवाहन करीत. प्रत्येक युवकाने आपल्या आयुष्यातील किमान पाच वर्षे आध्यात्मिक तपाचरणासाठी द्यावीत. त्यामुळे स्वत:सह राष्ट्राची आध्यात्मिक उंची गगनाला भिडेल, असे ते मानीत. माणुसकी ही परमेश्वराची सेवा करण्याची पहिली पायरी आहे, असे ते सांगत.

पौष कृ. १२, शके १९२९ म्हणजेच सोमवार दि. ४ फेब्रुवारी २००८ रोजी पहाटे २.१५ वाजता गगनगिरी महाराजांनी आपल्या सर्व नाड्यांची हालचाल बंद केली. श्‍वसन क्रिया पूर्ण थांबवली आणि स्वेच्छासमाधी प्राप्त करून घेतली.

अनिल पांडुरंग शिंदे    

पाटणकर, श्रीपाद गणपत