Skip to main content
x

पुरंदरे, बळवंत मोरेश्वर

बाबासाहेब पुरंदरे

     शिवशाहीर म्हणून उभ्या महाराष्ट्राला परिचित असलेले आणि आज २१ व्या शतकातही शिवकालातच रमणारे बाबासाहेब पुरंदरे तथा बळवंत मोरेश्वर पुरंदरे यांचा जन्म पुण्यात झाला. त्यांचे वडील मोरेश्वर पुरंदरे हे पुण्यातच भावे शाळेत चित्रकला शिक्षक होते. त्याच शाळेत बाबासाहेबांचे शालेय शिक्षण पूर्ण झाले. त्यानंतर पुण्यातच सर परशुरामभाऊ महाविद्यालयामध्ये त्यांनी ज्युनिअर बी.ए.पर्यंतचे शिक्षण घेतले. बालपणापासूनच इतिहासाचे असलेले प्रेम उत्तरोत्तर वाढतच गेले. वयाच्या १६व्या वर्षापासून शिवाजी महाराजांच्या चरित्राचे, महाराष्ट्राच्या इतिहासाचे, उज्ज्वल परंपरेचे अभ्यासपूर्ण संशोधन करण्यास त्यांनी सुरुवात केली. रम्य गतकाळाचे स्मरणरंजन करण्याच्या ध्यासाने त्यांना पछाडले आणि एका आधुनिक इतिहासकाराचा जन्म झाला.

     त्यांच्याविषयी पु.ल. म्हणतात, ‘देशस्थी रंगाचा, कायस्थी अंगाचा, लेंगा व शर्ट घालणारा, हसतमुख माणूस इतिहासकार आहे यावर माझा प्रथमदर्शनी विश्वासच बसला नाही. बळवंत मोरेश्वर पुरंदरे असे भारदस्त, साक्षात कुठल्याही ऐतिहासिक अष्टप्रधान मंडळात सहजी खपून जाईल ऐसे नाव धारण करणारे हे इतिहासकार प्रथमदर्शनी इतिहासकार वाटतच नाहीत.’

     बाबासाहेबांनी वयाच्या १२व्या वर्षी नारायणराव पेशवे यांच्या जीवनावर एक ऐतिहासिक कादंबरी लिहिली होती. अर्थात ती प्रसिद्ध झाली नाही. शालेय आणि महाविद्यालयीन जीवनात त्यांनी काही कविताही लिहिल्या होत्या. त्या ‘केसरी’मध्ये प्रसिद्ध झाल्या होत्या. १९४६ साली ‘जळत्या ठिणग्या’ हा शिवकालीन कथांचा संग्रह त्यांनी वयाच्या २४ व्या वर्षी प्रसिद्ध केला. इतिहास संशोधक ऋषितुल्य ग. ह. खरे हे त्यांचे गुरू, मित्र, आप्त सर्व काही होते. त्यांच्याच सहवासामुळे ते इतिहास-संशोधनात रमले. जगण्यासाठी सर्वांत महत्त्वाची गोष्ट म्हणजे ‘जगण्याचे प्रयोजन’ ते त्यांना इतिहास-संशोधनाच्या रूपात लवकर सापडले. इतिहास-संशोधन हे एक शास्त्र आहे याची जाणीव त्यांच्या मनात पक्की होती आणि म्हणूनच आधाराशिवाय विधान करायचे नाही, हे व्रत त्यांनी आजवर स्वीकारले आहे.

     बाबासाहेबांची एकूण ३६ पुस्तके प्रकाशित झाली असून ती शिवचरित्राशी व इतिहासाशी संबंधित आहेत. ‘जळत्या ठिणग्या’ (१९४६) हा शिवकालीन कथांचा संग्रह ही त्यांची प्रथम निर्मिती होय. याशिवाय ‘मुजर्‍याचे मानकरी’, ‘दख्खनची दौलत’, ‘शनिवारवाड्यातील शमादान’, ‘पुरंदराच्या बुरुजावरून’, ‘पुरंदराचा नौबत’, ‘पुरंदराचा सरकारवाडा’, ‘महाराज’ असे ऐतिहासिक कथासंग्रह त्यांच्या नावावर आहेत. याशिवाय ‘माझे नाव रायगड’ ‘माझे नाव आग्रा’ ‘माझे नाव पन्हाळगड’ ‘माझे नाव प्रतापगड’ ‘माझे नाव पुरंदर’ ह्या व अन्य गडांचा ओजस्वी भाषेत आत्मकथनात्मक परिचय करून देणारी त्यांची पुस्तकेही लोकप्रिय आहेत. १९७६ साली ‘शेलारखिंड’ व १९६२ साली ‘शिलंगणाचे सोने’ ह्या ऐतिहासिक कादंबर्‍यांचे लेखनही त्यांनी केले आहे.

     त्यांची सर्वांत गाजलेली साहित्यकृती म्हणजे ‘राजा शिवछत्रपती’ हे शिवचरित्र होय. ह्या चरित्रलेखनास त्यांनी १९५२मध्ये वयाच्या ३० व्या वर्षी सुरुवात केली आणि १९५६मध्ये ते प्रकाशित झाले. शिवाजी महाराजांच्या उत्तुंग, द्रष्ट्या व महान व्यक्तिमत्त्वाचे बारीकसारीक पैलूंसह दर्शन घडविणारे हे चरित्र आहे. बाबासाहेबांच्या ठायी असणारा महाराजांविषयीचा भक्तिभाव, मराठ्यांच्या कर्तृत्वाविषयी असणारी आत्मीयता व तो काळ बारकाव्यांसह जिवंत करणारी ओजस्वी, ओघवती व प्रासादिक शैली यांमुळे हे चरित्र आज महाराष्ट्रातील घराघरांत धार्मिक पोथीसारखे पूज्य व संग्राह्य ठरले आहे. ह्या पुस्तकाच्या १५ आवृत्त्या निघूनही प्रत्येक आवृत्तीच्या वेळी भरगच्च प्रकाशनपूर्व नोंदणी होते. ‘सुदिन, सुवेळ मी शिवरायांच्या जन्माचं आख्यान मांडलंय- आई तुळजाभवानी तू ऐकायला ये’ अशी तुळजाभवानीला हाक घालूनच त्यांनी शिवचरित्र लिहायला सुरुवात केली. या ग्रंथाची पारायणे करणारे लोक महाराष्ट्रात कमी नाहीत.

     या लेखनसंपदेबरोबरच आपल्या ओजस्वी वाणीने शिवकालीन भाषेतच शिवचरित्रावर त्यांची १५०००पेक्षा जास्त व्याख्याने महाराष्ट्रात, देशात आणि परदेशांतही झाली आहेत. त्यांच्या व्याख्यानात श्रोते देहभान विसरून त्यांच्यासह शिवकालात शिरतात. व्याख्यानासाठी मंचावर उभे राहिल्यावर बाबासाहेब कोणाचेही कुणीही नसतात. व्याख्यानातला रसरशीतपणा, चढउतार, ओघवती-ओजस्वी वाणी, हावभाव, हृदयस्पर्शीत्व श्रोत्यांना मंत्रमुग्ध करते.

     गेल्या दोन दशकांपासून ते ‘जाणता राजा’ ह्या शिवचरित्र कथेच्या रूपात सादर होणार्‍या दृक-श्राव्य कार्यक्रमाची भव्य निर्मिती करून त्याचे प्रयोग देशभर करीत आहेत. ह्या अतिशय भव्य-दिव्य कार्यक्रमाच्या रूपाने त्यांनी आपल्या मनातील ‘शिवचरित्रा’ला अभिनयाचे रंग, दृश्यांचे रूप आणि आशयाचे रस घेऊन एक सामूहिक नाट्य १००पेक्षा अधिक कलाकारांसह सादर करण्याचे शिवधनुष्य पेलले. ह्या कार्यक्रमातील ‘शिवराज्याभिषेक सोहळा’ केवळ अवर्णनीयच आहे. घोडदळ, पायदळ, तोफा, हत्ती ह्यांसह भव्य दरबार ते प्रत्यक्षात मंचावर उभारतात.  या कार्यक्रमाचे सुमारे ९०० प्रयोग झाले असून यातील संवादांचे इंग्रजी व हिंदी ह्या भाषांत अनुवाद झाले आहेत. याशिवाय गुजराती, तमिळ, बंगाली एवढेच नव्हे तर फ्रेंच भाषेतही अनुवाद करून या कार्यक्रमाचे प्रयोग युरोपातही करण्याचा आपला मानस त्यांनी अकलूज येथील जानेवारी २००९ च्या प्रयोगाच्या वेळी व्यक्त केला.

     छत्रपतींच्या ३००व्या राज्याभिषेक दिनानिमित्त त्यांनी १९७४ मध्ये दादर येथे दृश्य माध्यमातून ‘शिवसृष्टी’ उभी केली. ती पाहण्यासाठी समाजाच्या सर्व स्तरांतील लक्षावधी लोक येऊन गेले.

     पाश्‍चात्त्य देशात इतिहास, ऐतिहासिक स्मारके, कागदपत्रे, वास्तू यांची जशी आणि जितकी कदर केली जाते; त्यांचे राष्ट्रीय संपत्ती म्हणून जतन केले जाते, तसे आपल्याकडे होत नाही. शिवकालीन कागदपत्रे वाळवीच्या भक्षस्थानी पडत आहेत, ऐतिहासिक वास्तूंची दुरवस्था लाजिरवाणी आहे; हे पु.लं.शी झालेल्या चर्चेतून बाबासाहेबांना प्रकर्षाने जाणवले. त्यामुळे शिवस्मृती म्हणून जे-जे आहे ते-ते जपण्यासाठी त्यांनी ‘शिवप्रतिष्ठान’ची स्थापना केली. त्याच्या माध्यमातून शिवकाल जपण्याचे त्यांचे प्रयत्न अव्याहतपणे चालू आहेत.

     व्याख्यानांतून त्यांना मिळणार्‍या मानधनावर महाराष्ट्र शासनाने कर लावला. असा कर भरणारे बाबासाहेब हे एकमेव उदाहरण आहेत. पण व्याख्यानापोटी मिळालेले सुमारे अडीच कोटी रुपये त्यांनी विविध संस्थांना देणगीच्या रूपात दिले. शिवाय आपल्या खासगी मिळकतीचा ‘पुरंदरे ट्रस्ट’ निर्माण करून, त्यातून व्यक्तिगत लाभांश मुळीच न घेता सर्व पैसे ते जनकल्याणार्थ खर्च करतात. अनेक रुग्णालयांना या ट्रस्टतर्फे मदत मिळाली आहे. ‘वक्ता दशसहस्रेषु, दाता दशलक्षेषु’ असे त्यांचे सार्थ वर्णन होईल.

     १९५४च्या गोवा मुक्ती लढ्यातील संग्रामात एक शिलेदार म्हणून ते हाती शस्त्र घेऊन नगर-हवेलीला झुंजायलाही गेले होते. फेब्रुवारी २००९ मध्ये राजमाचीला होणार्‍या पहिल्या दुर्गसंमेलनाचे अध्यक्ष म्हणून त्यांची निवड झाली होती. त्यांच्या ‘शेलारखिंड’ या कादंबरीवर प्रख्यात अभिनेते व निर्माते रमेश देव यांनी ‘सर्जा’ ह्या चित्रपटाची निर्मिती केली.

     इतिहास संशोधक असूनही त्यांचे वाचन केवळ इतिहासापुरते मर्यादित नाही. ललित वाङ्मयाशी त्यांचा घरोबा कायम आहे. शिवाय उत्कृष्ट देशी-विदेशी चित्रपट पाहणे, शास्त्रीय संगीताच्या मैफलींबरोबर लावणीसारख्या लोकसंगीतातही रस घेणे त्यांना भावते. तेवढीच रुची त्यांना क्रिकेटचा स्कोअर ऐकण्यातही आहे. खर्‍या अर्थाने हा रसिक इतिहासकार आहे.

     ‘निराधार विधानं करायची नाहीत’ अशी प्रतिज्ञा करून डोळसपणे, अभ्यासू वृत्तीने त्यांनी संशोधन व लेखन केले. त्यांच्या अंतःकरणातच एक कवी असल्यामुळे मोहोरबंद, गोंडेदार व काव्यात्म भाषा ते सहजपणे लिहून जातात पण हातातला इतिहासाचा लगाम कधी सुटू देत नाहीत. तपशिलावरची त्यांची पकड भलतीच घट्ट असून स्मरणशक्ती विलक्षण आहे. ३००-३५० वर्षांपूर्वीच्या सर्व घटना तिथी, तारखांसह त्यांना पाठ आहेत. शिवचरित्राचे गायन हा त्यांच्या जीवनाचा श्वास आहे, ध्यास आहे; पण शिवचरित्र सांगत असताना ते कधीच मुसलमानांचा, किंवा परधर्मीयांचा उल्लेख कुचेष्टेने करीत नाहीत. ‘अभ्यासोनी प्रकटावे’ या उक्तीनुसार शिवाजी महाराजांची पावले जिथे-जिथे उमटली तिथे-तिथे ते अनेकदा जातात. गडा-गडांवरील दगडा-दगडाला ते जिवंत करतात. ऐतिहासिक कागदपत्रे मिळवण्यासाठी इराण, फ्रान्स, इंग्लंड येथेही जाण्याची त्यांची तयारी आहे.

     वाटता येईल तेवढे शिवचरित्राचे धन अवघ्या मराठी मनाला त्यांनी वाटून टाकले आहे, आजही वाटीत आहेत. ते करीत असताना त्यांना कोठेही अहंतेचा स्पर्श झाला नाही किंवा स्वतःविषयी बडेजाव, विद्वत्तेचा डामडौलही त्यांनी दाखविला नाही. निःस्पृहतेत ते रामशास्त्री प्रभुण्यांचे अवतारच आहेत. ते कधीही, कोणाकडूनही पैशाची अपेक्षा करीत नाहीत. ते नेहमी म्हणतात, ‘इतिहास ही माझी एकट्याची मिरास नाही. ते सार्‍यांचं धन आहे. त्यात कुठे हीण आलं तर ते पाखडून, फेकून द्यायला हवं. शिवचरित्राबाबत जसजशी नवीन माहिती मिळेल, तसतशी शिवचरित्रात भर घालण्याचे काम मी करीन.’

     आपल्या ८६-८७ वर्षांच्या आयुष्यात शिवशाहीरांना अनेक मानसन्मान प्राप्त झाले आहेत. त्यांपैकी महत्त्वाचे म्हणजे त्यांच्या ‘राजा शिवछत्रपती’ या ग्रंथाला राज्यशासनाचा पुरस्कार मिळाला आहे. पुण्याच्या त्रिदल संस्थेतर्फे दिला जाणारा मानाचा ‘पुण्यभूषण’ हा पुरस्कार त्यांना मिळाला आहे चतुरंग प्रतिष्ठानतर्फे दिल्या जाणार्‍या ‘जीवन गौरव’ पुरस्काराचेही ते मानकरी आहेत. पण ह्या सर्वांपेक्षा त्यांना महत्त्वाचा वाटणारा पुरस्कार म्हणजे १९६३मध्ये सातार्‍याच्या राजमाता सुमित्राराजे भोसले यांनी बहाल केलेली ‘शिवशाहीर’ ही पदवी होय.

     जे-जे सत्य, शिव आणि सुंदर आहे, त्या सर्वांबद्दल बाबासाहेबांना आस्था आहे आणि अभिरुचीही आहे. शिवाय त्यांचे लेखन भोवतालची ओजहीन, जिद्द नसलेली, मरगळलेली समाजस्थिती पाहून ठसठसणार्‍या वेदनेतून झाले आहे; म्हणून त्यांच्या संशोधनाने साहित्यक्षेत्रात मानाचे स्थान मिळवले .

     पुरंदरे यांच्या अव्याहत आणि अथक अशा ‘ऐतिहासिक’ कार्याची दखल भारत सरकारने घेतली असून २०१९ साली त्यांना ‘पद्मविभूषण’ सन्मान प्राप्त झाला . अशा या महान इतिहासकाराचे वयाच्या शंभराव्या वर्षी म्हणजेच शताब्दीच्या वर्षात अल्पशा आजाराने निधन झाले. 

- सविता टांकसाळे

पुरंदरे, बळवंत मोरेश्वर