Skip to main content
x

फुले, जोतीराव गोविंदराव

महात्मा

     कोणिसाव्या शतकातील थोर समाजसुधारक व सत्यशोधक समाजाचे संस्थापक जोतीराव गोविंदराव फुले यांनी ‘तृतीय रत्न’ हे नाटक १८५५ साली लिहिले. मराठी रंगभूमीचा उषःकाल अजून व्हावयाचा असताना, ‘शारदा’सारखे बाला-जरठविवाहदर्शन घडविणारे समस्याप्रधान नाटक अजून दूर असताना, माळ्या कुणब्याच्या स्त्रीला दिवस गेले आहेत, हे पाहून ब्राह्मण जोशाची स्वारी तिला भूलथापा देऊन तिच्या नवर्‍याला कसे लुबाडतो, यासारखा तत्कालीन समाजातील एक ज्वलंत प्रश्न घेऊन जोतीरावांनी नाट्यरचना केली. ही घटनाच क्रांतिकारक आहे.

     १८६९मध्ये जोतीरावांनी ‘छत्रपती शिवाजीराजे भोसले यांचा पवाडा’ ह्याची रचना केली. ती “कुणबी, माळी, महार, मांग वगैरे पाताळी घातलेल्या क्षेत्र्यांच्या उपयोगी पडावा” या हेतूने केली आहे. या पोवाड्यात कमालीच्या भावपूर्ण शब्दांत शिवाजीराजांचा गौरव केला आहे. त्यांनी केलेली ‘अखंडां’ची रचना तुकारामांच्या अभंगवाणीचे स्मरण करून देणारी आहे.  समाजजीवनातील विसंगतींचे दर्शन, मानवी वृत्तिप्रवृत्तींवरील मार्मिक भाष्य, “सत्यावीण जगीं नाहीं अन्य धर्म” या सत्यधर्माचा सातत्यपूर्ण उद्घोष असे अनेक विशेष ‘अखंड’रचनेस ठसठशीत रूप देतात. १८६९ मध्ये त्यांनी ‘ब्राह्मणांचे कसब’ हे पुस्तक प्रसिद्ध केले. या काव्यसंग्रहात अडाणी व देवभोळे शेतकरी यांची भटा-भिक्षुकांच्या सांगण्यामुळे कशी पिळवणूक होते, ते वेगवेगळ्या पद्यांत वर्णन करून सांगितले आहे. १८७३ साली त्यांनी ‘गुलामगिरी’ हा ग्रंथ लिहिला. “ज्या दिवशी मनुष्य दास होतो, त्या दिवशी त्याचा अर्धा सद्गुण जातो” या होमरच्या वाक्याने या ग्रंथाचा प्रारंभ झाला आहे. हा ग्रंथ प्रश्नोत्तररूप असून त्यात सोळा प्रकरणे आहेत. “ब्राह्मण लोक तुम्हांला लुटून खात आहेत हे माझ्या शूद्र बांधवांना सांगण्याच्या हेतूने मी हा प्रस्तुत ग्रंथ लिहीत आहे”, असे ‘गुलामगिरी’ या ग्रंथाचे प्रयोजन फुले यांनी स्पष्ट केले आहे. या ग्रंथात त्यांनी बळिराजाचे मिथक निर्माण करून शूद्र संस्कृतीचा गौरव केला आहे.   

     फुले यांची वैचारिक जडण-घडण एकीकडे थॉमस पेनच्या मराइट्स ऑफ मॅन’सारख्या अमेरिकन विचार-विश्वातून झाली, दुसरीकडे ‘मानवधर्मसभा’, ‘परमहंससभा’ यांसारख्या सभांशी संबद्ध विचारांतून झाली. तर तिसरीकडे संतांच्या सामाजिक विचारधनामधून झाली. शूद्रांना व अतिशूद्रांना नागरी हक्क जाणीव व अधिकारांची शिकवणूक व ब्राह्मणी शास्त्रांच्या धार्मिक व मानसिक गुलामगिरीतून मुक्तता करण्याच्या दृष्टीने त्यांनी १८७३मध्ये ‘सत्यशोधक’ समाजाची स्थापना केली. समाजाचे सभासदत्व सर्व जातींतील लोकांना मुक्त होते. सत्यशोधक समाजाचा जातिव्यवस्थेप्रमाणे चातुर्वण्यावरही विश्वास नव्हता. 

     १८७३ ते १८८३ अशी जवळपास दहा वर्षे अन्य सामाजिक कार्यांत घालवल्यानंतर फुले यांनी १८८३मध्ये ‘शेतकर्‍याचा असूड’ हे पुस्तक लिहिले. कृषिप्रधान भारत देशात शेतकर्‍याचीच दुर्दशा आहे आणि ती दूर झालीच पाहिजे, यासाठी फुले सातत्याने प्रयत्नशील राहिले. शेतकर्‍याला केंद्रस्थानी ठेवून दररोजच्या व्यवहारातले शब्द योजून त्यांनी या पुस्तकाची रचना केली आहे. शेतकर्‍यांसंबंधीचा इतका अभ्यासपूर्ण व समग्र विचार मांडणारा दुसरा ग्रंथ मराठीत त्या काळात झाला नाही. “विद्येविना मती गली; मतीविना नीती गेली; नीतीविना गती गेली । गतीविना वित्त गेले, वित्ताविना शूद्र खचले, इतके अनर्थ एका अविद्येने केले” या लयबद्ध विधानाने सुरू होणारे ‘शेतकर्‍याचा असूड’चे लेखन ही मराठी गद्यसाहित्यात पडलेली मोलाची भर आहे.

     १८८५मध्ये फुले यांनी ‘सत्सार’ नावाचे नियतकालिक काढले. त्याच्या उपलब्ध दोन अंकांतून (‘सत्सार -१’, आणि ‘सत्सार - २’) त्यांनी पंडिता रमाबाई आणि ताराबाई शिंदे या दोघींचा गौरव केला आहे. याच वर्षी न्यायमूर्ती रानडे यांच्या शेतकर्‍यांविषयीच्या मताचा प्रतिवाद करणारे व शेतकर्‍यांच्या भयावह दु:स्थितीचे दर्शन घडविणारे ‘इशारा’ नावाचे पुस्तक त्यांनी लिहिले; त्याचप्रमाणे न्यायमूर्ती रानड्यांनी पुढाकार घेऊन  भरविलेल्या ‘दुसर्‍या मराठी ग्रंथकार सभे’स उपस्थित राहण्यास नकार देणारे अर्थपूर्ण पत्र जोतीराव फुल्यांनी पाठविले. ११ मे १८८८ रोजी जोतीरावांना वयाची साठ वर्षे पूर्ण झाल्यानिमित्ताने त्यांचा जाहीर सत्कार करण्यात आला, आणि या प्रसंगी दलित समाजाची प्रदीर्घ सेवा केल्याबद्दल त्यांना ‘महात्मा’ ही पदवी आदरपूर्वक अर्पण करण्यात आली. जुलै १८८८पासून फुले अर्धांगवायूने आजारी झाले. १८८९मध्ये मृत्यूपूर्वी काही दिवस विकलांग शारीर अवस्थेत त्यांनी ‘सार्वजनिक सत्यधर्म’ हा आपला शेवटचा ग्रंथ लिहून पूरा केला. तो ग्रंथ त्यांचे दत्तकपुत्र  यशवंतराव फुले यांनी १८९१मध्ये प्रसिद्ध केला. या ग्रंथातून फुले यांच्या मानवतावादी भूमिकेचे व्यापकत्व आणि ब्राह्मण विरोधामागची तळमळ यांचे दर्शन घडते.

     - प्रा. डॉ. विलास खोले

फुले, जोतीराव गोविंदराव