Skip to main content
x

सोलेगावकर, गोविंद माधव

        आधुनिकतेचे भान ठेवत, यथार्थदर्शी शैलीत व कलेतील भारतीयत्व जपत विविध प्रकारची चित्रनिर्मिती करणारे चित्रकार आणि अजिंठा व बाघ येथील कलेचे रहस्य जाणून घेण्यासाठी धडपडणारे अभ्यासक म्हणून गोविंद माधव सोलेगावकर तत्कालीन कलाजगतात प्रसिद्ध होते. अजिंठ्याच्या कलाविषयक रंगवैभवाबद्दल व तंत्राबद्दल त्यांना आत्मीयता व अभिमान होता आणि तिचे गूढ उकलून काढण्याचा त्यांनी ध्यास घेतला होता.

            त्यांचे वडील माधव गोविंद सोलेगावकर हे मध्य प्रांतातील इंदूरहून मुंबईच्या जे.जे.स्कूल ऑफ आर्टला कलाशिक्षणासाठी आलेले पहिले विद्यार्थी होते. ते १९०६ मधे आपले कलाशिक्षण संपवून इंदूरला परतले व कलाशिक्षकाची नोकरी करू लागले. त्यामुळे गोविंदवर लहानपणापासूनच चित्रकलेचे संस्कार झाले. त्यांचे लहानपण सिहोर येथे गेले व शालेय शिक्षण इंदूरमध्ये झाले. याच काळात ते देवळालीकरांच्या क्लासमध्ये जात असत. एलिमेंटरी व इंटरमीजिएट या चित्रकलेच्या परीक्षा ते पाच विषयांची पारितोषिके मिळवून उत्तीर्ण झाले.

            त्यांना १९२८ मध्ये वयाच्या सोळाव्या वर्षी इंदूरमध्ये भरलेल्या ऑल इंडिया फाइन आर्ट एक्झिबिशनमध्ये रौप्यपदक मिळाले. सुरुवातीचे कलाशिक्षण इंदूरमध्ये घेऊन १९३० साली त्यांनी मुंबईच्या सर जे.जे.स्कूल ऑफ आर्टमध्येे प्रवेश घेतला व १९३२ मध्ये जी.डी. आर्ट, पेंटिंग ही परीक्षा उत्तीर्ण झाले. या काळात त्यांना दोन वेळा ‘डॉली कर्सेटजी’ पारितोषिक मिळाले. त्या काळात सोलेगावकरांनी जे.जे. स्कूलमध्ये ऐन भरात असलेल्या व कलेतील भारतीयत्व जपणार्‍या ‘बॉम्बे रिव्हायव्हलिस्ट स्कूल’ या कलाशैलीत अहिवासींच्या मार्गदर्शनाखाली दर्जेदार काम करण्यास सुरुवात केली होती. त्यांची चित्रे अपारदर्शक जलरंगात व लघुचित्र (मिनिएचर) परंपरेपासून स्फूर्ती घेतलेली असत. या काळातील त्यांच्या ‘दधिमंथन’ या चित्राने जाणकारांची वाहवा मिळविली व त्यांना वॅडिंग्टन पुरस्कार आणि म्यूरल डेकोरेशन क्लासची शिष्यवृत्तीही देण्यात आली.

            जाहिरातकलेचा व पर्यायाने चित्रकलेचा व्यावसायिक वापर करण्याच्या दृष्टिकोनातून १९३४ च्या दरम्यान प्रदर्शनांमधून पोस्टर्सचा विभाग सुरू करण्यात आला होता. सिमल्याच्या प्रदर्शनात भारतीय रेल्वेतर्फे त्यासाठी विशेष पुरस्कार ठेवण्यात आला होता. त्यात सोलेगावकरांच्या ‘अजिंठा फे्रस्कोज’ या पोस्टरला हा पुरस्कार मिळाला व त्याच्या प्रतिकृती छापून त्या काळात सर्व मोठ्या स्टेशनांमध्ये लावण्यात आल्या. या चित्राची प्रशस्ती १८ सप्टेंबर १९३४ च्या ‘टाइम्स ऑफ इंडिया’तही छापून आली.

            त्यांची १९३५ मध्ये जे.जे. मध्ये ‘फेलो’ म्हणून नेमणूक करण्यात आली. याच वर्षी त्यांचे ‘मटियारी’ हे राजस्थानी गवळणीचे चित्र बॉम्बे आर्ट सोसायटीच्या प्रदर्शनात ‘सुवर्णपदक विजेते’ चित्र ठरले व प्रिन्स ऑफ वेल्स म्यूझियमने स्वतःच्या चित्रसंग्रहासाठी ते विकत घेतले. याच वर्षी त्यांनी रंगविलेले भारतीय शैलीतील ५ फूट ×३ फूट आकाराचे शिव-पार्वतीचे ‘प्रेमयात्रा’ हे चित्र सिमल्याच्या प्रदर्शनात ‘निजाम पुरस्कारा’चे मानकरी ठरले. त्यानंतर हे चित्र १९३७ मध्ये बर्लिंग्टन गॅलरी, लंडन येथे भरलेल्या इंडियन आर्ट एक्झिबिशनमध्ये गाजले. या काळातील त्यांची याच शैलीतील ‘समुद्रमंथन’ , ‘लक्ष्मी’, ‘त्रिमूर्ती’, ‘चंद्राराधना’ ही चित्रेदेखील गाजली. त्यांच्या या चित्रांत पाश्‍चिमात्य पद्धतीच्या शरीरशास्त्राच्या अभ्यासासोबतच लयपूर्ण, लडिवाळ रेषेचा वापर आणि भारतीय लघुचित्रशैलीच्या रंगलेपन तंत्राचा सुरेल संगम आढळतो. त्यातील हस्तमुद्रा भारतीय मूर्तिशास्त्रावर आधारलेल्या होत्या.

            त्यांच्या एका तैलचित्राला १९३७ मध्ये कलकत्ता येथील अकॅडमी ऑफ फाइन आटर्स या संस्थेच्या वार्षिक प्रदर्शनात रौप्यपदक मिळाले. यानंतर सोलेगावकर भारतीय रंगशास्त्र या विषयाचा ध्यास घेऊन व त्याचा निसर्गचित्रांतून आविष्कार करण्यासाठी देशात विविध ठिकाणी फिरले व त्यांनी रंगांचे विविध प्रयोग करीत अनेक निसर्गचित्रे निर्माण केली. त्यांचा १९४६ मध्ये उज्जैनच्या डॉ. खोचे यांची कन्या इंदू हिच्याशी विवाह झाला. एव्हांना सोलेगावकर यांची चित्रकार म्हणून प्रसिद्धी होऊ लागली होती. त्यांची जहांगीर आर्ट गॅलरीत १९५४, १९५७ व १९५८ या वर्षी प्रदर्शने झाली.  सोलेगावकर १९५८ ते १९६० या काळात युरोपला गेले. शक्य होईल तिथे स्वतःची चित्रप्रदर्शने भरवून भारतीय कला तेथे कळावी या दृष्टिकोनातून त्यांनी प्रयत्नही केले. या काळातील त्यांच्या एका टिपणात ते लिहितात, ‘मी युरोपमधील प्रवासात ३६ आर्ट गॅलरीज व म्यूझियम्सना भेटी दिल्या. व त्यातून माझ्या कामाचा मार्ग निर्माण करण्यासाठी माझ्या अंगी बळ आले आहे.’

            मुंबईत १९६२ मध्येे त्यांच्या चित्रांचे प्रदर्शन भरले. याच वर्षी ते आर्ट सोसायटी ऑफ इंडियाचे अध्यक्ष झाले. त्यानंतर त्यांनी १९७० मध्ये मुंबईच्या ताज आर्ट गॅलरीत प्रदर्शन केले. त्यानंतर ते लंडनला गेले. त्यांची चित्रे १९७१ मधे लंडनमधील इंडिया हाउसमध्ये प्रदर्शित करण्यात आली.

            त्यांनी आयुष्यभर भारतीय पद्धतीच्या चित्रांसोबतच पाश्‍चात्त्य शैलीतील व्यक्तिचित्रे, निसर्गचित्रे, समूहचित्रे अशा सर्वच प्रकारांत विविध प्रकारे प्रयोग केले. तैलरंग, पारदर्शक जलरंग व अपारदर्शक जलरंगांत ते आत्मविश्‍वासपूर्वक काम करीत. मात्र चित्रनिर्मिती करताना विकासाचा पुढचा टप्पा गाठल्याखेरीज नवीन प्रदर्शन न करण्याचा त्यांनी स्वतःच केलेला नियम कायम पाळला. या प्रक्रियेत त्यांचे रंगविषयक, रचनाविषयक, तसेच आकृतिबंधाशी संबंधित प्रयोग असत.

            रंगविषयक प्रयोग करताना त्यांना अजिंठ्यातील रंगवैभवाने कमालीचे प्रभावित केले व हे रंग त्याच परिसरातील असणार, असा त्यांचा विश्‍वास होता. त्यासाठी ते शोध घेऊन विविध रंगांची माती, दगड, पाने, फुले आणून त्यांपासून रंग तयार करण्याचे प्रयोग करीत. दगड ठिसूळ असेल तर पावडर करून रंग तयार होत असे; पण काही वेळा दगड कठीण असल्यास तो उगाळून त्याच्या रंगाची ते पेस्ट तयार करीत व ती वापरत. त्यासाठी कितीही कष्ट घेण्याची त्यांची तयारी असे. त्यांची अशी चित्रे वेगळी भासत.

            अजिंठ्यातील अद्भुत चित्ररचना अभ्यासताना त्यांना यामागे काहीतरी शास्त्र असावे असे वाटू लागले व त्या मागची संकल्पना व सूत्र शोधण्याचा त्यांनी ध्यास घेतला. यातून त्यांनी भौमितिक रचनेवर आधारलेली एक पद्धत विकसित केली. पुढील काळात कोणतेही पेन्टिंग करण्यापूर्वी ते अशा प्रकारच्या भौमितिक रचना करून त्यावर विशिष्ट प्रकारे, विशिष्ट रंग भरून घेऊ लागले व या पूर्वतयारीनंतरच त्यांचे चित्र सुरू होत असे. मग ते व्यक्तिचित्र असो की निसर्गचित्र, रचनाचित्र असो की अमूर्त शैलीकडे झुकणारे चित्र, ही पद्धत ते कायमच वापरू लागले. त्यांचा हा ध्यास काही वेळा कलाजगतात चेष्टेचा विषय ठरला. पण सोलेगांवकरांनी त्याची कधीच पर्वा केली नाही.

            वास्तववादी शैलीत त्यांनी काही व्यावसायिक व्यक्तिचित्रे रंगविली. ही महात्मा गांधी, सरदार पटेल, कॉम्रेड डांगे, भाषांतरकार तर्खडकर अशा व्यक्तींची असून त्यांतील महात्मा गांधींचे व्यक्तिचित्र पोरबंदर येथील त्यांच्या जन्मस्थानी लागले.

            सोलेगांवकरांना १९७० च्या दरम्यान एका वेगळ्याच कल्पनेने झपाटले. त्यांनी अजिंठ्यातील १७ क्रमांकाच्या लेण्यांची प्रतिकृती तयार करण्याची भव्य योजना आखली. त्या नैसर्गिक लेण्याबरहुकूम कृत्रिम लेणे तयार करून त्यात शिल्पे व चित्रे नव्याने तयार करण्याची त्यांची कल्पना होती. ते लेणे ज्या वेळी तयार झाले तशा प्रकारे अगदी नवीन रूपात सोलेगांवकरांना ते दाखवावयाचे होते. शिल्पांची जबाबदारी खिरोद्याच्या पंधे गुरुजींनी स्वीकारली. यासाठी फार मोठा खर्च होणार होता. सरकार-दरबारी पत्रव्यवहार झाला. तत्कालीन शिक्षणमंत्री मधुकरराव चौधरींनी त्यात रसही घेतला. मुख्यमंत्र्यांनी मान्यता दिली. पण मंत्रिमंडळ बदलले व ही योजना बारगळली आणि सोलेगांवकरांना अपेक्षाभंगाचे दुःख पचवावे लागले.

            सोलेगांवकरांच्या कलानिर्मितीत जरी विविध विषय व शैलींचे प्रयोग असले, तरी त्यामागे हे सर्व भारतीय असण्याचा आग्रह असे. भारतीय भित्तिचित्रांची वैशिष्ट्ये आपल्या चित्रांत आणण्याचा ते प्रयत्न करीत. या सोबतच त्यांच्या परदेशदौर्‍यांत अनुभवलेले कलाजगत व त्यातील वैशिष्ट्येही त्यांच्या चित्रांमधून डोकावत. त्यांनी १९६० नंतरच्या काळात तर आधुनिक व अमूर्ततेकडे झुकलेल्या शैलीतही प्रयोग केले. त्यांची चित्रे कित्येकदा सही नसूनही ओळखता येत असली, तरी वारंवार ते करीत असलेल्या प्रयोगांमुळे त्यात प्रगल्भ आविष्काराच्या अत्युच्च साफल्याचा अनुभव येत नसल्याचे मत त्या काळातील अनेक कलावंत व कलासमीक्षक व्यक्त करीत. काही कलासमीक्षकांनी तर सोलेगावकर स्वतःची शैली सोडून अमूर्त शैलीत करत असलेल्या प्रयोगांवर टीकाही केली होती. परंतु स्वतः सोलेगावकरांना त्यांनी केलेले प्रयोग व शोधून काढलेल्या पद्धती अत्यंत उपयुक्त असल्याची खात्री होती. ‘या पद्धतीने केलेले चित्र उत्तमच झाले पाहिजे’, असा त्यांचा विश्‍वास होता.

            आयुष्यभर ते अशा कोणत्यातरी कल्पनांनी झपाटलेले जीवन जगले. परिणामी, कलावंत म्हणून त्यांची फारशी नोंद घेतली गेली नाही किंवा आर्थिक आघाडीवरही ते फारसे यशस्वी ठरले नाहीत. त्यांचे व त्यांच्या कुटुंबाचे जीवन खडतर होते. सुरुवातीच्या काळात ३/४ महिने नोकरी केल्यानंतर ते आयुष्यात पुन्हा नोकरी करण्याच्या मोहात अडकले नाहीत. परंतु त्यांची सुविद्य पत्नी इंदू यांनी अर्थार्जनाची जबाबदारी घेऊन त्या सोबतच संसाराच्या व अपत्यांच्या संगोपनाची जबाबदारीही पार पाडली.

            सोलेगावकर अनेक वर्षे १ जानेवारीला अजिंंठा येथे जात असत. त्यांच्या सोबत हळूहळू  त्यांचे मित्र, विद्यार्थी व कलाप्रेमीही जाऊ लागले. यातूनच अनेक मंडळी १ जानेवारीला अजिंठ्याला कोणत्याही आमंत्रणाशिवाय एकत्र जमू लागली. जणूकाही ही कलावंतांची कलापंढरीची वारीच असे. सोलेगावकरांनी अनेक तरुण चित्रकारांना मार्गदर्शन केले व माजगावकर, देशमुख, गवळी, प्रकाश तांबटकर यांसारखे चित्रकार निष्ठेने काम करीत राहिले. उपयोजित कलेच्या क्षेत्रातील षांताराम पवार यांच्यासारखे काही जण सोलेगांवकरांचे ऋण मानतात.

            सोलेगावकरांच्या निधनाने  १९८६ नंतर अजिंठ्याच्या या वारीत काही काळ खंड पडला. परंतु १९९० पासून हा प्रयत्न पुन्हा नव्याने सुरू झाला. सोलेगावकरांकडून प्रेरणा मिळालेल्या या कलावंत व कलाप्रेमींनी त्यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ अजिंठ्याजवळ ‘यक्षायतन’ प्रकल्पाचे भूमिपूजन करून यक्षाची भव्य मूर्ती उभारली. कलाकारांसाठी व कलासाधनेसाठी एक स्थान असावे हे सोलेगांवकरांचे स्वप्न होते व तीच या प्रकल्पामागची प्रेरणा होती.

            आज यक्षायतन असलेला भाग नवीन व्यवस्थेनुसार प्रतिबंधित क्षेत्र म्हणून जाहीर झाला आहे. पण आजही अजिंठ्याला जाताना तेथे यक्षाचे १९९० मध्ये प्रतिष्ठापना झालेले शिल्प नजरेस पडते. त्यामागची संकल्पना, प्रेरणा व उद्दिष्ट आज अनेकांना अज्ञात आहे आणि जी.एम. सोलेगावकर नावाचा एक झपाटलेला चित्रकारही आज विस्मरणात गेला आहे.

- सुहास बहुळकर

सोलेगावकर, गोविंद माधव