Skip to main content
x

सोवनी, प्रभाकर विष्णू

      प्रा.प्रभाकर विष्णू सोवनी हे विज्ञानप्रेमींना प्रभाकर सोवनी या नावाने परिचित आहेत. ते लहान असतानाच  त्यांचे वडील वारले. तेव्हा त्यांच्या मोठ्या भावंडांकडे सोवनींचे बालपण व्यतीत झाले. त्यांचे शालेय शिक्षण त्यामुळे वेगवेगळ्या गावी झाले. पुढे पुण्यात फर्गसन महाविद्यालयातून बी.एस्सी.चे शिक्षण घेत असतानाच, त्यांनी वृत्तपत्रे आणि विविध नियतकालिकांमधून लेखनास सुरुवात केली. मध्यंतरी, काही काळ अर्थार्जनासाठी त्यांनी कापडाच्या गिरणीत नोकरीही केली. तेवढा काळ सोडला, तर ते कायम भूशास्त्राशी संबंधित राहिले. बी.एस्सी. झाल्यानंतर त्यांनी प्रा.क.वा. केळकर यांच्याकडे संशोधन करून भूशास्त्रातील एम.एस्सी. ही पदवीही संपादन केली. या काळात त्यांनी गोव्यातही बरेच क्षेत्रपरीक्षण केले. त्यानंतर त्यांनी प्रामुख्याने शिलाशास्त्र (पेटॉलॉजी) या विषयाशी संबंधित संशोधन केले. १९५४ साली ते पुण्यातील फर्गसन महाविद्यालयात व्याख्याता बनले.

     प्रा. क. वा. केळकर यांच्या निवृत्तीनंतर ते फर्गसन महाविद्यालयाच्या भूशास्त्र विभागाचे प्रमुख बनले. १९६२ ते १९८६ एवढा प्रदीर्घ काळ ते या विभागाचे प्रमुख होते. १९६२ ते १९६५ या काळात ते पुणे विद्यापीठाच्या भूशास्त्र विभागाचे प्रभारी प्रमुख होते. १९७४ ते १९८६ या काळात ते फर्गसन महाविद्यालयाचे उपप्राचार्य होते. दरम्यानच्या काळात त्यांनी ‘कोलोरॅडो स्कूल ऑफ माइन्स’ येथे ‘प्रगत पाषाणशास्त्र’ या विषयाचे अध्ययन तीन वर्षे केले. त्या वर्षीच्या ‘जिऑलॉजिकल सोसायटी ऑफ अमेरिका’ या संस्थेच्या अधिवेशनात त्यांनी शोधनिबंधही सादर केला.

     सोवनी हे जसे विद्यार्थिप्रिय शिक्षक होते, तसेच किंवा त्याहीपेक्षा अधिक ते त्यांच्या लेखनामुळे लोकादरास पात्र ठरले. १९४० सालापासून गेली ६८ वर्षे ते सातत्याने विज्ञान लेखन करीत आले आहेत. ‘उद्यम’ या मासिकात त्यांनी वीस वर्षाहून अधिक काळ स्तंभलेखन केले. सोवनींचे  वैशिष्ट्य म्हणजे त्यांचे अत्यंत अचूक, सुस्पष्ट आणि सुबोध लेखन. त्यांची व्याख्यानेही त्यांच्या लेखनाप्रमाणेच अतिशय मुद्देसूद आणि सुस्पष्ट असत. मराठी विज्ञान परिषद, पुणे विभागाचे ते बरीच वर्षे कार्याध्यक्ष होते. मराठी विज्ञान महासंघाचे कार्यवाह आणि नंतर कार्याध्यक्ष म्हणूनही त्यांनी काम केले.

     सोवनींनी ‘सृष्टिज्ञान’ आणि ‘विज्ञान युग’ या विज्ञानाला वाहिलेल्या दोन नियतकालिकांच्या संपादक मंडळाचे सदस्य म्हणून बरीच वर्षे काम केले. ‘या महिन्याचा शास्त्रज्ञ’, ‘टपाल तिकिटातून विज्ञान’, ‘गणिती कोडी’, ‘पन्नास वर्षांपूर्वी सृष्टिज्ञानात’, ‘वैज्ञानिक कोडी’, ‘विज्ञान प्रश्‍नावली’ अशी त्यांची सदरे कितीतरी वर्षे सातत्याने ते चालवीत होते. ‘विज्ञान युग’च्या स्थापनेपासून अखेरपर्यंत ते त्या मासिकाच्या संपादक मंडळाचे अध्वर्यू होते.

     मराठी विश्वकोशाचे अतिथी संपादक म्हणूनही भूवैज्ञानिक नोंदींचे लेखन आणि समीक्षण करताना त्यांनी विश्वकोशासाठी भरीव योगदान दिले. महाराष्ट्र राज्य ग्रंथनिर्मिती महामंडळासाठी त्यांनी पाषाणशास्त्राचे पाठ्यपुस्तक लिहिले. याशिवाय, ‘ओळख भूशास्त्राची’, ‘पृथ्वीची कथा’, ‘विश्वाचा पसारा’, ‘आकाशातून अवकाशात’, ‘ओळख आकाशाची’, ‘ओळख नक्षत्रांची’, ‘नवलाईचे विज्ञान’, ‘सांगा, असे का?’, ‘व्यावहारिक विज्ञान’, ‘ज्ञान विज्ञान मनोरंजन’, ‘रंजनातून बुद्धिविकास’, ‘विज्ञान दर्शन’, ‘कूळकथा’ अशी त्यांची तीसहून अधिक पुस्तके प्रकाशित झाली असून शास्त्रज्ञांच्या चरित्रावरील पुस्तक प्रकाशनाच्या मार्गावर आहे.

    त्यांना मराठी विज्ञान परिषदेचे मानपत्र (१९८५), मो.वा. चिपळोणकर विज्ञान प्रसारक पुरस्कार (१९९५), महाराष्ट्र साहित्य परिषदेचे प्रा.गो.रा. परांजपे सन्मानपत्र, आदी पुरस्कार प्राप्त झाले आहेत. वयोमानापरत्वे, त्यांचे लेखन कमी झाले असले तरी अजूनही ते सातत्याने ‘सृष्टिज्ञान’साठी लेखन करतात, हे विशेष.

प्रा. निरंजन घाटे

सोवनी, प्रभाकर विष्णू