Skip to main content
x

स्वामी, दासतीर्थ

    स्वामी दासतीर्थ यांचा जन्म वर्धा जिल्ह्यातील आष्टी तालुक्यातील साहूर गावी झाला. तेथेच त्यांचे शालेय शिक्षण झाले. या गावी ‘विदेहमूर्ती धूतकार बुवा’ नावाचे एक महात्मा होते. त्यांच्याकडून विधायक कामे करण्याची प्रेरणा दासतीर्थ यांना बालपणीच मिळाली. त्यांनी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या कार्यास वाहून घेतले. युवकांना हाताशी धरून आरती मंडळे स्थापन केली. तीच मंडळे पुढे ‘गुरुदेव सेवा मंडळ’ या नावाने प्रसिद्ध झाली. गांधीजींच्या सेवाग्राममध्ये आणि विनोबाजींच्या पवनार आश्रमात दासतीर्थ राहिले व तेथे काम केले. या महापुरुषांच्या प्रेरणेने दासतीर्थांनी खांद्यावर तिरंगा घेऊन आजूबाजूच्या खेड्यांतून पदे म्हणत स्वराज्य प्राप्तीसाठी पदयात्रा काढल्या व लोकमानस चेतविले.

‘‘हासत जाईन समरी, भीती न मजला काळाची,

तोडीन बेडी पारतंत्र्याची, शपथ गांधींच्या चरणाची ।

बॉम्बही टाका अथवा घाला गोळी,

मजवर बंदुकीची अथवा टांगा फासावरती,

शपथ गांधींच्या चरणाची ॥’’

अशी दासतीर्थ यांची पदे होती.

त्यांनी १९४३ मध्ये संत गाडगेबाबा मराठा धर्मशाळा, पंढरपूर येथून भूमिगत कार्य केले. राष्ट्रप्रेम व लोकजागृतीसाठी विधायक कार्यात झोकून देणारेे कळकळीचे कार्यकर्ते स्वामी दासतीर्थ, स्वातंत्र्यप्राप्तीनंतर मात्र कोणतीही सरकारी सवलत न घेता समाजापासून दूर राहून योगसाधनेत रममाण झाले. त्यांनी मोर्शी तालुक्यात लोणी गावी, सातोरे यांच्या शेतात कुटी बांधून तिचे ‘साधकाश्रम’ असे नाव ठेवले. काही दिवस सावनेर तालुक्यात मुक्काम केला व नंतर देवलाबाद, तालुका रामटेक येथे कुटी बांधली व तिचे ‘विवेकाश्रम’ असे नामकरण केले. त्यांनी गरझदरी येथे अंजनगावापासून सुमारे १२ किलोमीटर अंतरावर ‘शांकरी योग विद्या मंदिर’ स्थापन केले.

‘योगसाधनेमधूनच जीवनाचे सार्थक होते असे मानून ते योगसाधना, कीर्तन, प्रवचन, भागवत सप्ताह यांद्वारे समाज प्रबोधन करत असत.

वि.ग. जोशी

स्वामी, दासतीर्थ