Skip to main content
x

वसईकर, सुरेश सदानंद

       शिक्षणाने बालरोगतज्ज्ञ असलेले सुरेश सदानंद वसईकर यांचे प्राथमिक शिक्षण अंमळनेर येथे तर माध्यमिक ते वैद्यकीय पदवीपर्यंतचे शिक्षण पुणे येथे झाले. त्यांनी १९८७मध्ये एम.बी.बी.एस. पदवी बी.जे. वैद्यकीय महाविद्यालय येथून प्रथम श्रेणीमध्ये उत्तीर्ण केली व १९९२मध्ये एम.डी. ही पदवीसुद्धा त्याच महाविद्यालयातून प्रथम श्रेणीमध्ये संपादन केली. वयाच्या पस्तिशीपर्यंत त्यांचा चतुष्पाद प्राण्याशी दुरान्वयाने संबंधही आला नव्हता. तरी त्यांनी आठ वर्षांच्या कालावधीमध्ये गोवंशाचा सखोल अभ्यास केला व गोवंशाचे संवर्धन केले. त्यांच्याकडील गोधन मिळावे म्हणून शेतकरी नोंदणी करतात व तीन वर्षे वाट पाहतात.

       वैद्यकीय शिक्षण पूर्ण झाल्यावर डॉ. वसईकर यांनी धुळे शहरामध्ये बालरोगतज्ज्ञ म्हणून वैद्यकी सुरू केली. त्यांची वैद्यकी नावारूपास आली व उत्कर्षापर्यंत पोहोचली, पण वर्तमानपत्रांमधून वाचायला मिळणारी शेतकऱ्यांची परवड त्यांना अस्वस्थ करत असे. शेतकऱ्यांना आर्थिक दुष्टचक्रामधून बाहेर काढण्याच्या दृष्टीने एखादा यशस्वी प्रयोग करण्यासाठी खिल्लार गोवंश सांभाळायचा हे त्यांनी निश्‍चित केले. तेव्हा त्यांनी समवयस्क शेतकरी मित्रांशी चर्चा केली, या गोवंशाबद्दलची उपलब्ध पुस्तके वाचली, विविध पशुवैद्यकांशी सविस्तर चर्चा केली व गोधन खरेदी करायचे ठरवले. डॉ. वसईकर यांनी पंढरपूर येथे भरणाऱ्या बैलांच्या यात्रेतून सहा खिलार गायी व एक वळू खरेदी केला. त्यांनी ८ फेबु्रवारी २००६ रोजी माघी शुद्ध एकादशीच्या मुहूर्तावर यशोदानंद खिलार पैदास केंद्राची स्थापना केली. त्यांच्या या प्रयत्नांची थट्टा झाली तरीही न खचता धुळे शहराच्या जिल्हा पशु-संवर्धन उपसंचालक डॉ. रावटे यांच्या मदतीने त्यांनी प्रत्यक्ष कामाला सुरुवात केली.

       डॉ. वसईकर यांनी विक्रीसाठी वा आपल्या वापरासाठी कोणत्याही गायीचे दूध काढावयाचे नाही व गायींच्या वैरणीसाठीच शेती करायची हा एक नवा पायंडा पाडला. यशोदानंद खिलार पैदास केंद्रामध्ये दुभत्या गायी व त्यांची वासरे एका बंदिस्त आवारामध्ये दिवसभर मोकळी सोडलेली असतात. गाई-वासरांसाठी पाण्याची व वैरणीची व्यवस्था आवारातच केली असते. त्यामुळे वासरू दिवसभर भरपूर खेळते व त्याला हवे त्या वेळेला आपल्या आईला मनसोक्त पिऊ शकते. याचा फायदा म्हणजे वासरे जोमाने वाढतात व तजेलदार राहतात.

       गाय विण्याची तारीख, वासराची माहिती, गाय पुन्हा माजावर कधी आली, कोणत्या वळूकडून रेतन केले, गाभणनिश्‍चितीची तारीख व दुधातून मुक्ती, तसेच प्रत्येक जनावराची जंतनाशक व ऋतूप्रमाणे करण्यात येणारे लसीकरण याची पैदास केंद्रामध्ये कटाक्षाने नोंद केली जाते. त्याचप्रमाणे वसईकर प्रत्येक वळूची रेतनाची नोंद ठेवतात व त्यापासून बाहेरच्या गायींच्या पैदाशीची नोंद ठेवली जाते. त्या नोंदीनुसार वासराचा मागोवा घेतला जातो. त्यामुळे प्रत्येक वळूचा स्वतंत्र अभ्यास व नोंदी परिपूर्ण होतात. केंद्रामध्ये प्रत्येक जनावराचा त्याच्या वयानुसार आहार निश्‍चित करून दिला जातो. पशुवैद्यकांच्या सल्ल्यानुसार खनिज मिश्रण किंवा औषधे नियमित दिली जातात. अठरा महिन्यांच्या पुढील प्रत्येक खोंडाला नियमित व्यायाम दिला जातो. त्यामुळे केंद्रातील प्रत्येक जनावर हे सशक्त बनते.

        डॉ. वसर्ईकर यांनी अनुवंशिकतेचा अभ्यास केला असून गोवंश शुद्ध करण्याच्या दृष्टीने ते सतत प्रयत्नशील असतात. त्यामुळे आज सहा वर्षांमध्ये संपूर्णतः आदर्श अशी तिसरी पिढी तयार झाली आहे. उत्तम गुणवत्ता व उत्तम आहार यामुळे या पैदास केंद्रामधील कालवडी वयाच्या २२ ते २४ महिन्यांच्या दरम्यान प्रथम माजावर येतात व ३ वर्षे पूर्ण होण्याच्या आधी वेत देतात. डॉ. वसईकर दर दोन महिन्यांनी एकदा पैदास केंद्रावर शेतकऱ्यांसाठी खिलार गोवंश संगोपनाबाबत मोफत अभ्यासवर्ग व शिबिरे घेतात. पैदास केंद्रावरील वळू पंचक्रोशीमधील गायींना रेतनासाठी मोफत पुरवला जातो. डॉ. वसईकर यांनी ग्राम गो-विकास ही नवीन संकल्पना निश्‍चित करून त्यानुसार शेतकऱ्यांसाठी जवळच्या २५ खेड्यांमध्ये ‘खिलार वंश काळाची गरज’ या विषयावर चर्चासत्रे घेतली. ‘गाव तेथे खिलार वळू’ या दृष्टीने त्यांनी प्रयत्न केले . दौंडाईचा येथे आयोजित केलेल्या पशुप्रदर्शनामध्ये पैदास केंद्राच्या गायीला ‘आदर्श गाय’ व कालवडीला ‘आदर्श कालवड’ हे प्रथम क्रमांकाचे पुरस्कार प्राप्त झाले . डॉ. वसईकर यांनी ‘समर्थ भारत २०२०’ या संकल्पनेंतर्गत धुळे जिल्ह्यासाठी पशु-संवर्धन या विषयावर ‘खिलार एक आदर्श गोवंश’ असा परिपूर्ण लेख लिहिला व शासनाने तो प्रसिद्ध केला. डॉ. वसईकर यांनी ३० ठिकाणी खिलार गोवंशाबाबत व्याख्याने दिली आहेत. त्यांच्या पशु-संवर्धन क्षेत्रातील कार्याची दखल घेऊन उत्कृष्ट पशुपालक पुरस्कार २०१२ साली देण्यात आला.

- मिलिंद कृष्णाजी देवल

वसईकर, सुरेश सदानंद