Skip to main content
x

इंगवले, अशोक विठ्ठल

सातारा जिल्ह्यातील माण या सातत्याने अवर्षणप्रवण तालुक्यातील बिदाल या छोट्या गावात एका शेतकरी कुटुंबात अशोक विठ्ठल इंगवले यांचा जन्म झाला. दुष्काळग्रस्त गावातील कोरडवाहू शेती फारसे उत्पन्न देणारी नव्हती. गावात शिक्षणाची सोय उपलब्ध नसल्यामुळे त्यांचे शालेय शिक्षण सातारा या जिल्ह्याच्या ठिकाणी झाले. पुढे शिकण्याची उमेद व जिद्द कायम असल्यामुळे त्यांनी पुणे येथील कृषी महाविद्यालयात शेतीचे शिक्षण घेऊन बी.एस्सी. (कृषी) ही पदवी प्राप्त केली. कृषी पदवीधर असूनही त्यांनी नोकरीच्या चाकोरीबद्ध जीवनाचा स्वीकार न करता शेतीविकासाचे आणि पशुसंवर्धनाचे कार्य करण्याचे ठरवले. त्यांच्या घरी संकरित जर्सी गाई जोपासल्या जात, परंतु त्यांनी महाराष्ट्रातील मान्यताप्राप्त व महाराष्ट्राचे भूषण म्हणून सर्वदूर ओळखल्या जाणार्या खिलार जातीच्या गोधनाचे जतन व संवर्धन करण्याचे अवघड, परंतु महत्त्वपूर्ण काम केले. त्यांनी खिलार वंशाच्या गाई पाळून त्यांची पैदास करण्याचा ध्यास घेतला. या ध्यासापायी त्यांनी सांगोला, पंढरपूर व आटपाडी इ. ठिकाणांहून जातिवंत गाई खरेदी केल्या. त्यांनी या गाईंची शास्त्रीय पद्धतीने जोपासना करण्यास सुरुवात केली व खिलार गोवंशाचा कळप वाढवला. त्यांच्याकडे खिलार जातीच्या ४० गाई, १५ वासरे व ३ बैल झाले. ते खिलार जातीच्या शुद्ध खोंडाची पैदास व जोपासना करत असल्याचे ऐकून आजूबाजूच्या परिसरांतील शेतकरी व हौशी पैदासकार यांच्याकडून आदत खोंडाची मागणी होऊ लागली.

सातारा जिल्ह्यातील पुसेगाव येथील सेवागिरी सेवाभावी संस्थेच्या वतीने २००६ मध्ये आयोजित करण्यात आलेल्या गुरांच्या वार्षिक प्रदर्शनात त्यांच्या खिलार वळूस ‘चॅम्पियन वळूआणि एका चारदाती खोंडास प्रथम क्रमांक मिळाला, तसेच मल्हारी म्हाळसाकांत देवस्थान सेवाभावी संस्था-मलवडी यांच्या विद्यमाने घेण्यात आलेल्या पशुप्रदर्शनात चारदाती खोंडास २००५-०६ व २००६-०७ या दोन्ही वर्षी प्रथम क्रमांक मिळाला. त्यांच्या कर्तृत्वास मिळालेली ही एक पावतीच होय.

इंगवले यांनी पशुसंवर्धनासोबतच पिके घेण्याचे नवनवे प्रयोगही केले. सेंद्रिय पद्धतीने शेती करण्याचा आणि डाळिंबांच्या बागेत खरबुजाचे पीक घेण्याचा त्यांचा प्रयोग परिसरातील अनेक शेतकर्यांना अनुकरणीय वाटला. त्यांच्या डाळिंबांच्या रोपवाटिकेस आणि नेट हाऊसमधील ढोबळी मिरचीच्या प्रकल्पास असंख्य शेतकर्यांनी भेट दिली व माहिती घेतली. त्यामुळे इंगवले यांचा उत्साह द्विगुणित झाला. दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवरील, खिलार पैदास केंद्राविषयी आणि सेंद्रिय शेती कार्यक्रमातील इंगवले यांचा सहभाग अनेकांना प्रेरणादायी वाटला. डाळिंब उत्पादक संस्थेच्या अध्यक्षपदी त्यांची निवड करण्यात आली. तसेच त्यांना माणदेश भूषण हा मानाचा पुरस्कार देऊन गौरवण्यात आले.

खिलार जातीच्या गोवंशाचे जतन आणि संवर्धन याविषयी इंगवले यांच्या प्रामाणिक प्रयत्नांचा ज्येष्ठ पशुवैद्य प्रतिष्ठान, महाराष्ट्र-पुणे या संस्थेकडून गौरव करण्यात आला आणि त्यांना वेंकटेश्वरा हॅचरीज् उत्कृष्ट पशुपालक पुरस्कार २००९ साली वार्षिक समारंभात प्रदान करण्यात आला. त्याचप्रमाणे त्यांना गोविज्ञान परिषदेचा गोपालक पुरस्कारही २०११ मध्ये देण्यात आला.

- डॉ. नागोराव विश्‍वनाथ तांदळे

इंगवले, अशोक विठ्ठल