Skip to main content
x

जाधव, सिद्राम भीमण्णा

    सिद्राम भीमण्णा जाधव यांचा जन्म सोलापूर जवळील अहिरवाडी या गावात झाला. त्यांचे वडील शेतमजुरी सोबतच टोपले विणण्याचा व्यवसाय करीत असत. त्यांच्या आईचे नाव बायव्वा होते. तीसुद्धा शेतीच्या अनुषंगाने येणाऱ्या कामात मदत करीत असे. सिद्राम जाधव अशिक्षित होते. सिद्राम जाधवांचे पणजोबा परसप्पा जाधव, आजोबा लक्ष्मण जाधव व वडील भीमण्णा जाधव हे तिघेही सनईवादनाचे काम करीत. त्यांच्यापैकी भीमण्णा हे सुरसनईदेखील वाजवत असत.
सिद्राम जाधवांचे बंधू बाबूराव आणि लक्ष्मण जाधव हे सनईसोबतच ताशा, ढोल, स्वरपेटी वाजवत. गावात लग्नसमारंभ, बारसे व धार्मिक कार्यांत वाजंत्रीवादनाचे काम या घराण्याकडे परंपरेने चालत आले होते. त्या काळी वाजंत्रीवादनाच्या कामाला प्रतिष्ठा नव्हती. त्यामुळे शिंदीच्या झाडाच्या फोकांपासून टोपल्या विणण्याचे काम हा त्यांचा पोट भरण्याचा व्यवसाय होता.
भीमण्णा जाधवांच्या मृत्यूनंतर घरची जबाबदारी सिद्राम जाधवांचे मोठे बंधू बाबूराव यांच्यावर आली. बाबूरावांना १९२८ च्या दरम्यान खेळण्यांच्या दुकानात एक लाकडाचे पिपाणीसदृश खेळणे सापडले. तीन छिद्रे असलेल्या या पिपाणीला बाबूरावांनी आणखी पाच छिद्रे पाडली. सर्व छिद्रांचे स्वरमेलन (ट्यूनिंग) होण्यासाठी त्यांनी या सुषीरवाद्याला पावी जोडून वाजवून बघितले. या वाद्याचा आवाज मधुर होता. सुरुवातीला सोलापूरकरांनी या वाद्याचे नाव ‘बॉबीन’ असे ठेवले. बॉबीन म्हणजे धागा गुंडाळण्यासाठी पुठ्ठ्याची अथवा प्लॅस्टिकची पोकळ नळी होय. यंत्रमाग किंवा हातमागावर कापड विणण्यासाठी ही बॉबीन वापरतात. या बॉबीनशी रोजी-रोटीचा संबंध असल्याने हेच नाव या वाद्याला दिले गेले.
अक्कलकोट संस्थानचे राजे फत्तेहसिंह यांच्या राज्यारोहणाच्या कार्यक्रमात २७ फेब्रुवारी १९३६ रोजी
  बाबूरावांच्या या वाद्याच्या सुमधुर आवाजाने महाराज खूपच प्रभावित झाले व त्यांनी ‘सुुंदर, सुंदर’ असे उद्गार काढले. इतक्या सुंदर वाद्याचे नाव सुंदरच असले पाहिजे म्हणून त्याचे नाव ‘सुंदरी’/‘सुंद्री’ असे ठेवले गेले. ज्या मिलमध्ये बाबूराव जाधव काम करायचे, त्या मिलच्या मालकांनी याबद्दल त्यांचा सत्कार केला. राजस्थानातील ‘नाफिरी’, कर्नाटकातील ‘मुखवीण’, दक्षिणेकडील नादस्वरम या वाद्यांचे स्वरूप, साज आणि सूर सुंद्रीसारखेच आहेत. अकरा इंच लांबीच्या सुंद्रीची निर्मितिप्रक्रिया सनईप्रमाणेच असते. ती खैराच्या किंवा शिसमाच्या लाकडापासून बनवतात. या वाद्याला वरच्या बाजूस आठ स्वररंध्रे व खालच्या बाजूला एक स्वररंध्र असे एकूण नऊ स्वररंध्रे असतात.
बाबूराव जाधवांच्या देहावसानानंतर सिद्राम जाधवांनी सुंद्रीवादनाचे काम पुढे नेले. त्यांचे भाऊ लक्ष्मण जाधव हे त्यांना तबल्यावर साथ करीत असत. सुंद्रीवादनात विशेष प्रावीण्य मिळवलेल्या सिद्राम जाधवांचे नाव सोलापूरच्या सांगीतिक क्षेत्रातही प्रसिद्ध झाले.
एकदा सोलापूरमध्ये हिराबाई बडोदेकरांच्या बैठकीपूर्वी सिद्राम जाधवांच्या सुंद्रीवादनाचे स्वर त्यांच्या कानांवर पडले आणि बाहेर बसूनच सुंद्री ऐकण्याचा हिराबार्ईंनी आग्रह धरला. शेवटी आयोजकांनी व स्वत: हिराबाईंनी बैठकीत सिद्राम जाधवांना सुंद्री वाजवण्यास सांगितले. पुढे हिराबाईंच्या सांगण्यावरून लक्ष्मण व सिद्राम या बंधु- द्वयांनी मुंबई आकाशवाणीची ऑडिशन दिली. त्यात त्यांना ‘अ’ हा दर्जा मिळाला. आकाशवाणीच्या निमित्ताने या बंधुद्वयांचे भारतभर सुंद्रीवादनाचे कार्यक्रम झाले. भारताचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांच्या हस्ते १९५४ साली चांदीचा चषक देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला. इंदिरा गांधी १९८० साली तुळजापूरला देवीच्या दर्शनासाठी आल्या असता, त्यांनी सिद्राम जाधवांचे सुंद्रीवादन ऐकले व त्यांना ‘सुंद्रीसम्राट’ या पदवीने सन्मानित केले.
आकाशवाणीवरून व बीबीसी (लंडन) या वाहिनीवरून सिद्राम जाधवांचे सुंद्रीवादन प्रसारित झाले. बाबूराव व सिद्राम जाधवांच्या सुंद्रीवादनाच्या
  ध्वनिफिती एचएमव्ही कंपनीने काढल्या होत्या. यात तिलक कामोद, भूप, मालकंस, पहाडी, यमन, बागेश्री व भैरवी या रागांचा समावेश केला आहे. सिद्राम जाधवांनी आपल्या मुलांना दिलेला सुंद्रीवादनाचा वारसा चिदानंद जाधव यांनी विशेष करून जपला. आज चिदानंद जाधवांची मुले म्हणजेच सिद्राम जाधवांचे नातू गुरुनाथ, गोरखनाथ व भीमण्णा हा वारसा समर्थपणे पुढे नेत आहेत.
सिद्राम जाधवांच्या मृत्यूनंतर त्यांच्या कुटुंबीयांनी सिद्राम जाधव सांस्कृतिक कला मंडळाची स्थापना केली. भारत सरकारच्या पर्यटन आणि सांस्कृतिक मंत्रालयाच्या सहयोगाने ‘सुंद्री’ या वाद्याविषयीचे चर्चासत्र व प्रशिक्षण कार्यशाळा घेऊन सुंद्री सर्वांपर्यंत पोहोचवण्याचा त्यांनी प्रयत्न केला. या वाद्याच्या प्रचारार्थ www.sundarivadya.org हे भारत सरकारच्या वतीने संकेतस्थळ उपलब्ध करून दिले आहे.

भीमण्णा जाधव

 

जाधव, सिद्राम भीमण्णा