Skip to main content
x

जोग, तुषार श्रीकृष्ण

        रेखाटने, कॉमिक्स, मांडणशिल्पे, परफॉर्मन्स आर्ट अशा अनेक कलाप्रकारांचा आणि माध्यमांचा उपयोग करून वर्तमान राजकीय, सामाजिक परिस्थितीवर भाष्य करणारे चित्रकार तुषार श्रीकृष्ण जोग यांचा जन्म मुंबईत झाला. त्यांचे वडील व्यवसायाने अभियंता (सिव्हील इंजिनियर) होते. दादर येथील किंग्ज जॉर्ज शाळेत तुषार जोग यांचे शालेय शिक्षण झाले. सर जे.जे. स्कूल ऑफ  आर्टमधून १९८८ मध्ये त्यांनी बी.एफ.ए. ही पदवी प्राप्त केली. त्यांनी १९८९ मध्ये बडोदा येथील महाराजा सयाजीराव विद्यापीठातून एम.एफ.ए. केले. कनोरिया सेंटर फॉर आर्ट, इनलॅक्स फाऊंडेशन, अ‍ॅमस्टरडॅम येथील राइक्स अ‍ॅकेडमी अशा विविध संस्थांकडून त्यांना शिष्यवृत्त्या मिळाल्या. या निमित्ताने त्यांनी शिल्पकलेचा अभ्यास केला. त्यांची देशात आणि परदेशात अनेक एकल प्रदर्शने झालेली आहेत आणि सामूहिक प्रदर्शनांमधून त्यांनी भाग घेतला आहे.

        तुषार जोग यांचे काम थोड्या वेगळ्या प्रकारचे आहे. त्यांची रेखाटने गुंतागुंतीची असतात. त्यांचे काम म्हणजे चित्र, मांडणशिल्प, त्रिमितीपूर्ण वस्तू यांची वैशिष्ट्यपूर्ण निर्मिती असते. भोवतालच्या जगात काय चालले आहे, त्यावरचे भाष्य एका अनोख्या पद्धतीने ते आपल्या कलाकृतींमधून सादर करतात. समाजवास्तवात हस्तक्षेप करणारा चित्रकार (पब्लिक इंटरव्हेन्शन आर्टिस्ट) अशी ते स्वत:ची व्याख्या करतात. त्यासाठी त्यांनी पी.डब्ल्यू.सी. (पब्लिक वर्क सेल्स) नावाची संस्था निर्माण केलेली आहे. त्याचा उद्देश शहरी जनजीवनात कलात्मक पद्धतीने हस्तक्षेप करणे हा आहे. आपल्या सद्यस्थितीमधील विविध समस्यांवर गमतीदार पण अंतर्मुख करणाऱ्या प्रतिकात्मक वस्तू तयार करणे आणि या माध्यमातून भाष्य करणे असे जोग यांच्या कलानिर्मितीचे स्वरूप आहे. समाजातली आर्थिक विषमता, राजकारणातली सत्तेची उतरंड, न्यायव्यवस्थेतील भ्रष्टाचार असे अनेक सामाजिक प्रश्‍न जोग यांच्या कलानिर्मितीला प्रेरणा देतात. कलावंत आणि कार्यकर्ता अशा दोन भूमिका तुषार जोगांमध्ये एकत्रितपणे दिसतात. 

        तुषार जोग यांनी केलेली प्रदर्शने वैशिष्ट्यपूर्ण आहेत. त्यांचे २००४ मध्ये मुंबईच्या केमोल्ड आर्ट गॅलरीत ‘ट्रेन गॅजेट’ नावाचे प्रदर्शन झाले. मुंबईमधल्या लोकल प्रवाशांच्या अडचणींवर कलात्मक उपाय असे त्याचे स्वरूप होते. मांडणशिल्पाच्या माध्यमातून त्यांनी ते मांडले होते. ‘युनिसेल’ या प्रदर्शनात एकपेशीय व्यवस्था अशी संकल्पना त्यांनी मांडली होती. सरकारी नोकरशाहीसारखी एक सामाजिक व्यवस्था समाजकारणाच्या संदर्भात कशी अंर्तविरोधांनी आणि विसंगतींनी भरलेली असते ते दाखवण्याचा जोगांचा प्रयत्न होता. ‘द एनलाइट्निंग आर्मी ऑफ द एम्पायर’मध्ये सोळा रोबोंच्या आकृत्या असलेले मांडणशिल्प होते. हातात ट्यूबलाईट आणि लाइट बल्बची शस्त्रे धारण केलेली रोबोंची ही फौज म्हणजे माणूस आणि यंत्रमानव यांच्यावरील भाष्य होते. तुषार जोग यांची कलानिर्मिती म्हणजे एका अर्थाने राजकीय, सामाजिक प्रश्‍नांविरुद्ध, कलेच्या चौकटीत राहून केलेले प्रतिकात्मक आंदोलन आहे. कलेच्या मर्यादा ओलांडून ते वास्तवात येत नसले तरी वास्तवाचे त्याला संदर्भ आहेत.

        गीता कपूर यांनी राजकीय, सामाजिक आशयाच्या कलाकृतींचे तीन प्रकार सांगितले आहेत. पहिला प्रकार अर्थातच वास्तववादी पद्धतीने राजकीय प्रसंग, समाजजीवन दर्शवणाऱ्या यथार्थवादी चित्रांचा. विसाव्या शतकात आधुनिक चित्रकलेने राजकीय परिस्थितीमागे दडलेल्या विसंगतींचा शोध घेतला, प्रश्‍न उपस्थित केले, निषेध नोंदवला. हा झाला दुसरा प्रकार आणि अलिकडच्या काळातली राजकीय कला (पोलिटिकल आर्ट) हा तिसरा प्रकार आहे. तुषार जोग यांच्या कलाकृती तिसऱ्या प्रकारात मोडतात.

        पहिल्या दोन प्रकारांमध्ये चित्रकार स्वतंत्रपणे आपले मत कलाकृतींच्या माध्यमातून नोंदवत होता. तुषार जोग यांच्यासारखे चित्रकार कलानिर्मितीमध्ये समाजातल्या घटकांना, प्रेक्षकांना सहभागी करून घेतात. त्यांची मांडणशिल्पे अथवा प्रकल्प हे चित्रकार, साहाय्यक प्रेक्षक यांच्या संवादातून आकार घेतात. जोग यांची कलानिर्मिती पारंपरिक कलाप्रकारांच्या श्रेणीत बसवता येत नाही. कला आणि राजकारण यांच्यातील नात्याच्या नव्या शक्यता तिने निर्माण केल्या आहेत आणि ‘हायब्रिडिटी’ हे तिचे व्यवच्छेदक लक्षण आहे. तुषार जोग यांचा विवाह शर्मिला सावंत यांच्याशी झाला असून त्यादेखील आधुनिक पद्धतीच्या कलानिर्मितीला कार्यरत आहेत.

        - मेधा सत्पाळकर, दीपक घारे

जोग, तुषार श्रीकृष्ण