Skip to main content
x

जोशी, आत्माराम भैरव

      डॉ.आत्माराम भैरव जोशी यांचा जन्म मध्यप्रदेशातील जबलपूर येथे झाला. त्यांचे शालेय शिक्षण १९२५ ते १९३२ या काळात रायपूरच्या सरकारी शाळेत झाले. नंतर ते महाविद्यालयीन शिक्षणासाठी नागपूरला आले आणि तेथील विज्ञान महाविद्यालयातून ते १९३७ साली बी.एस्सी. झाले.

     वनस्पतिशास्रात बी.एस्सी. केल्यावर डॉ. जोशी दिल्लीला गेले आणि इम्पिरिअल अ‍ॅग्रिकल्चरल रिसर्च इन्स्टिट्यूट (आय.ए.आर.आय. - स्वातंत्र्यानंतर इम्पिरिअल शब्द जाऊन तेथे इंडियन हा शब्द आला) येथे त्यांनी डिप्लोमा ऑफ असोसिएटशिप ऑफ आय.ए.आर.आय. हा एम.एस्सी. समकक्ष असणारा अभ्यासक्रम पुरा केला. १९३७ सालापासून १९७७ सालापर्यंतची चाळीस वर्षे डॉ. जोशी आय.ए.आर.आय. आणि आय.सी.ए.आर. (इंडियन कौन्सिल ऑफ अ‍ॅग्रिकल्चरल रिसर्च) या संस्थांत राहिले. दरम्यान १९४७ ते १९५० अशी तीन वर्षे ते इंग्लंडच्या केंब्रिज विद्यापीठात गेले आणि तेथे त्यांनी वनस्पतिशास्त्रात पीएच.डी. केली. १९३७ ते १९७७ या काळात डॉ. जोशींनी वनस्पतींचे पेशीशास्त्र हा विषय शिकविला. ग्रेगर मेंडेलचा सिद्धान्त सांगून हा विषय ते शिकवीत असताना त्यात ते इतके रंगून जात, की खुद्द ग्रेगर मेंडेलच आपल्याला हा विषय शिकवीत आहेत, असा भास त्यांच्या विद्यार्थ्यांना होत असे. काही काळाने ते तेथे पेशीशास्त्र विभागाचे प्रमुख झाले.

     १९६५-१९६६ आणि १९७२-१९७७ या काळात ते आय.ए.आर.आय.चे संचालक होते, तर १९६६-१९७२ या काळात ते आय.सी.ए.आर. या संस्थेचे उपमहासंचालक होते. या वेळी त्यांच्याकडे प्रशासकीय जबाबदारीबरोबर पीक विज्ञान विभागाचे प्रमुखपदही होते. राष्ट्रीय कृषी संशोधन पद्धतीला (नॅशनल अ‍ॅग्रिकल्चरल रिसर्च सिस्टीम) त्यांनी १९६० ते १९६६ सालांत दिलेले नेतृत्व द्रष्टेपणाचे होते. भारतभर कोणती पिके घ्यायची, एखाद्या पिकाची कोणती जात कोठे घ्यायची याची जी राष्ट्रीय समन्वय समिती होती, त्याचे नेतृत्व डॉ. जोशींकडे होते. यासाठी त्यांनी विस्तार योजना सुरू केली. शेतकी विद्यापीठाने आपल्या शेतावर एखादा प्रयोग करून दाखविणे आणि शेतकऱ्याने ते वाण नेऊन स्वत: आपल्या शेतावर लावणे यांत फरक असल्याचे डॉ. जोशींना जाणवले. अधिक उत्पादन देणारी जात आणून उत्पन्न वाढवून दिले की शेती शास्त्रज्ञांना आपले काम संपले असे वाटे. डॉ. जोशींना असे जाणवले की, उत्पन्न तर वाढलेच पाहिजे; पण धान्याची किंमतही कमी झाली पाहिजे. शेतातील धान्यावर जी रोगराई होते, ती औषधे फवारून कमी करण्याऐवजी जर त्या पिकातच आपल्याला रोगप्रतिकारक शक्ती निर्माण करता आली, तर रोगामुळे वाया जाणारे पीक वाचेल आणि औषधे फवारण्याचा खर्चही कमी होईल. खतेही कमी द्यावी लागली पाहिजेत. या दृष्टीने त्यांनी आपल्या संशोधनाचा मोहरा बदलला. तसे त्यांनी केंद्र सरकारला आणि दिल्लीतील शेती शास्त्रज्ञांना पटवून दिले. त्यासाठी डॉ. जोशी यांनी भारतभर भेटी देऊन त्या-त्या ठिकाणच्या शास्त्रज्ञांच्या गळी ही कल्पना उतरवली.

     ही कल्पना इतर शास्त्रज्ञांना पटल्यावर मग त्यांनीही त्यात भर घातली. गहू, मका, वरी, तांदूळ, कापूस, एरंडी, भुईमूग, सोयाबीन, ताग, डाळी, तीळ, जनावरांसाठी चारा इत्यादी पिकांच्या उत्पादकतेत डॉ. जोशी यांच्या सल्ल्यामुळे प्रचंड वाढ झाली. बियाणे, शेतीसाठी चांगली साधने, हवामान, पाणी देण्याच्या पद्धती, कीड नियंत्रण, खते, बँकांची वा सरकारी कर्जे, धान्याची साठवण, पावसाच्या पाण्याची साठवण अशा प्रत्येक बाबीवर संशोधन करून उत्पादन कसे वाढवता येईल, हेही त्यांनी पाहिले. त्यांच्या हाताखाली एम.एस्सी. आणि पीएच.डी. केलेल्या ४६ विद्यार्थ्यांच्या संशोधनाचे हे विषय होते. डॉ. जोशी वर्गात शिकवीत, प्रयोगशाळेत जाऊन विद्यार्थी करीत असलेल्या प्रयोगांची प्रगती पाहत, ते जेथे अडले असतील त्या प्रश्‍नांची चर्चा करून त्यांना पुढे जायचा मार्ग दाखवत आणि रविवार व अन्य सुट्टीच्या दिवशी विद्यार्थ्यांचे प्रयोग जेथे चालले असतील, त्या शेतावर जाऊन, चार-पाच तास त्यांची पाहणी करून तेथे त्यांना मार्गदर्शन करीत, सूचना देत. त्यांचे विद्यार्थी एम.व्ही. राव (गहू), जोगिंदरसिंग (मका), गंगाप्रसाद राव (ज्वारी), एस.व्ही.एस. शास्त्री (तांदूळ) यांनी जरी प्रत्यक्ष संशोधन केले, तरी या सगळ्यांचा मेळ डॉ. जोशी यांनी घातला. हे काम १९५० ते १९६६ सालापर्यंत झाले. दरम्यान नॉर्मन बोरलाग यांना मेक्सिकोत जाऊन ते भेटून आले व त्यांनी विकसित केलेल्या आणि क्रांतिकारी उत्पादन देणाऱ्या बुटक्या गव्हाचे बियाणे जागोजागी लावले गेले. तायचुंग तांदळाचे बियाणे आणून ते भारतात पेरले. त्यावर भारतभरच्या शेतकऱ्यांनी मेहनत घेतली. परिणामी १९६६ ते १९७४ सालांत पीक उत्पादन वाढून भारत अन्नधान्याच्या बाबतीत स्वयंपूर्ण झाला. यालाच ‘हरितक्रांती’ म्हटले गेले.

     १९७७ साली ते आय.ए.आर.आय.मधून वयाची साठी पूर्ण झाल्यावर निवृत्त झाले आणि पुढील साडेतीन वर्षे म्हणजे १९७७ ते १९८०, ते राहुरीच्या कृषी विद्यापीठाचे कुलगुरू झाले. त्यानंतर ते पुण्याच्या आघारकर संशोधन संस्थेचे उपाध्यक्ष व नंतर अध्यक्ष म्हणून काम पाहत. वयाच्या ८५-९० वर्षांपर्यंत त्यांची भाषणे, दौरे, सल्लामसलत, विविध समित्यांवरील अध्यक्षपदे अथवा सभासदत्व यांद्वारे कृषी क्षेत्रातील कामगिरी चालू होती.

     १९७१ साली मराठी विज्ञान परिषदेने मुंबई येथील वार्षिक संमेलनात त्यांचा सन्मान केला. १९७६ साली त्यांना ‘नॉर्मन बोरलाग पुरस्कार’ मिळाला. त्याच वर्षी त्यांना भारत सरकारने ‘पद्मश्री’ दिली. आय.ए.आर.आय., गोविंद वल्लभ पंत कृषी विद्यापीठ आणि मराठवाडा कृषी विद्यापीठाने त्यांना सन्मान्य डॉक्टरेट दिल्या. इंडियन नॅशनल सायन्स असोसिएशन, नॅशनल अकॅडमी ऑफ अ‍ॅग्रिकल्चरल सायन्सेस, इंडियन अकॅडमी ऑफ सायन्सेस, महाराष्ट्र अकॅडमी ऑफ सायन्सेस, इंडियन बोटॅनिकल सोसायटी, इंडियन सोसायटी ऑफ जेनेटिक्स अँड प्लँट ब्रीडिंग या संस्थांनी त्यांना फेलोशिप्स दिल्या. आजचे आघाडीचे शेतीशास्रज्ञ डॉ.एम.एस. स्वामीनाथन आणि डॉ.जोशी यांनी बरीच वर्षे एकत्र काम केले.

     आंतरराष्ट्रीय स्तरावर त्यांनी तीन प्रकारचे काम केले. पहिले म्हणजे, जगात वेगवेगळ्या पिकांच्या नवनवीन जाती निर्माण होत आहेत. पण तसे होताना मूळ जातीचे जतन झाले पाहिजे; कारण नवीन जात ही मूळ जातीतून निर्माण होते. जर नवीन जातीत काही दोष निर्माण झाले, तर परत मूळ जातीचे संशोधन करून जे दोष नवीन जातीत निर्माण झाले, ते मूळ जातीतून काढून टाकणे गरजेचे असते. हे विधान गव्हाची क्रांतिकारक जात शोधून काढणाऱ्या नॉर्मन बोरलाग या शेतीशास्त्रज्ञानेही मान्य केले. यासाठी जगातली सगळी मूळ वाणे जमा करून ती जतन केली पाहिजेत हा डॉ. जोशींचा सल्ला मान्य झाला. यासाठी जागतिक अन्न संघटनेने इंटरनॅशनल बोर्ड फॉर प्लँट जेनेटिक रिसोर्सेस ही संघटना स्थापन केली. डॉ. जोशींना त्याचे सभासद केले आणि त्यांच्यावर संस्थेने जबाबदारी टाकली की जगातली ही सगळी मूळ वाणे कशी जमा करायची आणि कशी जतन करायची याची यंत्रणा तुम्ही घालून द्यावी. ती यंत्रणा डॉ. जोशींनी निर्माण करून दिली. त्या यंत्रणेत समजा, एखाद्या पिकाचे बियाणे आठ वर्षे ठीक राहत असेल (शेल्फ लाइफ), तर आठव्या वर्षी ते पेरून त्याचे नवीन बियाणे मिळवून ते परत पहिल्या जागी ठेवून द्यायचे.

    आणखी महत्त्वाचे दुसरे काम त्यांनी केले: जागतिक अन्न संघटनेची तांत्रिक सल्लागार समिती जिनिव्हामध्ये बसून सल्ला देत असे. पण १९८२ साली डॉ. जोशींना त्या समितीवर नेमल्यावर ते म्हणाले की, धान्योत्पादन वाढवायला जिनिव्हात बसून दिलेला सल्ला उपयोगी पडत नाही व नुसते प्रयोगशाळेतील प्रयोग पुरेसे पडत नाहीत, तर शेतकऱ्याच्या शेतावर जाऊन त्याचे प्रश्‍न सोडवले पाहिजेत. या सल्ल्यानुसार डॉ. जोशींना तशी रचना निर्माण करून देण्याची विनंती करण्यात आली. जी यंत्रणा त्यांनी निर्माण करून दिली, ती आजतागायत गेली २६-२७ वर्षे बदल न करावे लागता, अविरतपणे चालू आहे. त्यामुळे जगात अनेक ठिकाणी धान्योत्पादन वाढले. जोशींच्या दूरदृष्टीचे हे उदाहरण आहे.

     तिसरे काम त्यांनी जे केले ते म्हणजे, जागतिक अन्न संघटनेला डॉ. जोशींनी ‘इसनार’ नावाची संस्था स्थापन करायला उद्युक्त केले. ‘इसनार’ म्हणजे ‘इंटरनॅशनल सर्व्हिस फॉर नॅशनल अ‍ॅग्रिकल्चरल रिसर्च.’ प्रत्येक विकसनशील देशात कृषी संशोधन व्हावे आणि त्यांना मार्गदर्शन करावे, असा ‘इसनार’चा उद्देश आहे. जिनिव्हामध्ये बसून प्रश्‍न सोडवण्याऐवजी विकसनशील देशातील शास्त्रज्ञांना त्यांच्या देशात भेटून प्रथम संशोधन म्हणजे काय हे त्यांना समजावून सांगावे, मग त्यांचे प्रश्‍न समजावून घ्यावेत आणि त्यानंतर त्यांना सल्ला द्यावा. ‘इसनार’साठी या विकसनशील देशांनी आपल्या देशाच्या कृषी क्षेत्रातील समस्या सोडवण्यासाठी सातत्याने संशोधन करावे आणि त्यासाठी ‘इसनार’ मदत करील, अशी ‘इसनार’ची भूमिका आहे. त्यासाठी ‘इसनार’ची रचना करून देण्याचे काम डॉ. जोशींवर सोपवून त्याची रचना अशी करा, की पुढील १०० वर्षांत त्यात फेरफार करावे लागू नयेत, अशी इच्छा जागतिक अन्न संघटनेने व्यक्त केली. ती रचना डॉ. जोशींनी करून दिली. त्यानुसार अनेक अविकसित देशांनी केलेल्या शेतीतून ते देश धान्योत्पादनात स्वयंपूर्ण तर झालेच, पण एखाद्या वर्षी दुष्काळ पडला तर आदल्या वर्षीचा शिलकी साठा त्यांना उपयोगी पडतो.

     १९६९ साली डॉ. जोशींना इंडोनेशियातील कृषी उत्पादन वाढवून देण्यासाठी सल्लागार म्हणून नेमले गेले. १९७१-१९७२ साली जागतिक अन्न संघटनेने शेती उत्पादन वाढवून देण्यासाठी त्यांची इजिप्त सरकारचे सल्लागार म्हणून नेमणूक केली. दक्षिण अमेरिकेतील पेरू देशातील लिमा येथे आंतरराष्ट्रीय बटाटा संशोधन संस्थेच्या सल्लागार मंडळाचे ते सभासद होते. १९७३ ते १९७७ या काळात ते अमेरिकेच्या आंतरराष्ट्रीय कृषी संशोधन संस्थेचे सल्लागार होते. १९७४ ते १९८६ या काळात जागतिक अन्न संशोधन संस्थेच्या प्लँट जेनेटिक रिसोर्स बोर्डाचे ते सल्लागार होते. १९८१-१९८२ साली नेदरलँड, बांगला देश, टांझानिया येथे ते सल्लागार होते. १९८४ साली हैदराबादच्या कोरडवाहू शेती संशोधन संस्थेचे (इक्रिसॅट) ते सल्लागार होते. अशा पद्धतीने केवळ भारतच नव्हे, तर जगातल्या अनेक ठिकाणचे शेती उत्पादन वाढवून देण्यास त्यांचा हातभार लागल्याने जगातल्या माणसाला त्यांनी पुरेसे अन्न मिळवून दिले. याशिवाय १९६५-१९६६ साली ते शिक्षणविषयक सुधारणा करण्यासाठी नेमलेल्या कोठारी आयोगाचे सभासद होते.

     त्यांचे स्वत:चे व सहकारी अथवा विद्यार्थ्यांबरोबर लिहिलेले असे ३०० शोधनिबंध आहेत आणि ते देशी परदेशी नियतकालिकांतून प्रसिद्ध झालेले आहेत. त्यांनी लिहिलेली शेतीतील दोन पुस्तके आज ४० वर्षांनंतरही त्या-त्या विषयातील अद्ययावत अशीच पुस्तके आहेत.

     डॉ. जोशी मराठी, हिंदी, इंग्रजी, पंजाबी, बंगाली या भाषा अस्खलितपणे बोलू शकत. शास्त्रीय संगीताची त्यांना विलक्षण आवड असून ते स्वत: उत्तम बासरीवादक होते.

     आय.ए.आर.आय. व आय.सी.ए.आर.च्या ४० वर्षांच्या कारकिर्दीत एक उत्तम शिक्षक, प्रशासक, शिक्षणतज्ज्ञ, संशोधक, समन्वयक आणि एवढे असूनही सर्वांशी मिळून-मिसळून हसतखेळत राहणारा उत्तम माणूस म्हणून त्यांची ख्याती होती. या सर्वच बाबतीत ते एक रोल मॉडेल म्हणून गणले गेले. ३ जुलै २०१० रोजी त्यांचं निधन झालं.        

- अ. पां. देशपांडे

जोशी, आत्माराम भैरव