Skip to main content
x

जोशी, गजानन अनंत

      व्हायोलिनवादक, गायक व गुरू म्हणून सुविख्यात असणाऱ्या पं. गजाननराव अनंत जोशी यांचा जन्म  मुंबईतील गिरगाव येथे झाला. त्यांच्या आईचे नाव इंदिराबाई होते. त्यांचे घरगुती नाव ‘राम’ असे होते. पं. गजाननबुवांच्या घराण्यात संगीताची परंपरा होती. गजाननबुवांचे आजोबा मनोहरपंत हे सुमारे १८५०-१८७० या काळातील गायक होते. त्यांनी इचलकरंजीच्या रावजीबुवा गोगटे यांच्याकडे तालीम घेतली होती, तर वडील अनंत मनोहर जोशी तथा अंतूबुवा हे ग्वाल्हेर घराण्याचे उत्तम गायक म्हणून विख्यात होते.
वडील अंतूबुवा हेच गजाननबुवांचे पहिले गुरू होते. गिरगावात अंतूबुवांचे ‘श्रीसमर्थ गायन वादन विद्यालय’ होते, त्यामुळे गजाननबुवांवर बालवयातच संगीताचे संस्कार झाले. अंतूबुवांच्या पत्नी व मुलांचे पाठोपाठ आकस्मिक निधन झाल्याने ते विद्यालय बंद करून प्रथम सांगलीस आले व नंतर त्यांची नेमणूक औंध संस्थानात दरबार गायक म्हणून झाली. वडिलांकडून गजाननबुवांना पारंपरिक पद्धतीने गायनाची तालीम मिळाली. शिवाय तबला, हार्मोनिअम ही वाद्येही सरावाची झाली. लहानपणी ते जलतरंग हे वाद्य अत्यंत तयारीने वाजवीत.
दहा वर्षांच्या छोट्या गजाननाचा जलतरंगवादनाचा पहिला कार्यक्रम औंधमध्ये भवानराव पंतप्रतिनिधींनी आयोजित केला व ते वादन संपूर्ण संस्थानामध्ये कौतुक व कुतूहलाचा विषय होता.
औंधचे राजे पंतप्रतिनिधी यांनी स्वत:च्या कीर्तनाच्या साथीसाठी गजाननास हे वाद्य वाजवण्याची आज्ञा केली. वयाच्या तेराव्या-चौदाव्या वर्षी १९२३ च्या आसपास गजाननाने व्हायोलिन हे वाद्य हाती घेतले व स्वत:च्या एकलव्य परिश्रमाने साध्य केले. गजाननबुवांनी रूढ अर्थाने कोणाकडेही व्हायोलिनवादनाचे शिक्षण घेतले नव्हते. त्या काळात हिंदुस्थानी संगीतात या वाद्याचा प्रसार विशेष झाला नव्हता व हे वाद्य अल्पपरिचित होते. या वाद्यावर उत्तर हिंदुस्थानी रागसंगीताचा आविष्कार करणाऱ्या कलाकारांच्या पहिल्या पिढीतील गजाननबुवा जोशी हे एक अग्रश्रेणीचे कलाकार म्हणून नावाजले गेले. त्यांचे १९२८ पासून मुंबई रेडिओवर कार्यक्रम होऊ लागले. प्रभात फिल्म कंपनीच्या ‘अयोध्येचा राजा’ या पहिल्या बोलपटाच्या वाद्यवृंदात ते १९३० मध्ये सामील होते.
व्हायोलिनच्या स्वतंत्र मैफलींबरोबर पं. रविशंकर व उ. विलायत खाँ यांच्यासह केलेल्या जुगलबंदीच्या मैफलीही त्या काळी खूप गाजल्या. तत्कालीन महाराष्ट्रात ‘व्हायोलिन म्हणजे पं. गजाननराव जोशी’ असे समीकरण सिद्ध करणाऱ्या बुवांनी वादनाची एक स्वतंत्र शैली निर्माण केली. या पाश्चात्त्य वाद्यावर भारतीय रागसंगीताच्या प्रस्तुतीचे तंत्र व ढाचा त्यांनी तयार केला. व्हायोलिनसाठी त्यांनी खास अशा अनेक गतींच्या रचनाही केल्या. ‘भारताचा यहुदी मेनुइन’ म्हणून गजाननबुवांचा गौरव करण्यात आला.
आधी व्हायोलिनवादक म्हणून नावलौकिक कमवणाऱ्या पं. गजाननबुवा जोशी यांनी आपले वडील व गुरू अंतूबुवा, तसेच गायनाचार्य रामकृष्णबुवा वझे, भूर्जी खाँ, विलायत हुसेन खाँ अशा दिग्गजांकडून गायकीचीही तालीम प्राप्त केली. पुण्याच्या वास्तव्यात १९३५ पासून पुढची तीन-चार वर्षे गजाननबुवांनी पं. वझेबुवांकडून तालीम घेतली. उ. अल्लादिया खाँसाहेबांच्या शिष्या सूरश्री केसरबाई केरकर यांच्या गायनाचा गजाननबुवांवर खूप प्रभाव पडला व जयपूर घराण्याची गायकी आत्मसात करण्याचा त्यांनी निश्चय केला. ते पुण्यातले बिऱ्हाड मोडून कोल्हापूरला उस्ताद भूर्जी खाँ यांच्याकडे गाणे शिकायला गेले. १९४५ मध्ये गंडाबंधनाचा विधी करून उ. भूर्जी खाँसाहेबांकडे त्यांनी तालीम घेतली.
गजाननबुवांनी १९५३ ते १९६८ या काळात आकाशवाणीवर संगीत कार्यक्रमांचे सल्लागार म्हणून काम केले. तिथे त्यांची विलायत हुसेन खाँसाहेबांशी ओळख झाली व १९६३ साली, म्हणजे वयाच्या बावन्नाव्या वर्षी रीतसर गंडाबंधन करून त्यांनी उ. विलायत हुसेन खाँसाहेबांकडून आग्र घराण्याची तालीम घेतली. अशा प्रकारे या तीन घराण्यांची तालीम मिळवून बुवांनी आपले गाणे व्यापक केले व ते ग्वाल्हेर-आग्रा-जयपूर घराण्यांचे मातब्बर गायक म्हणून प्रसिद्ध झाले.
आवाजाची अनुकूलता नसूनही त्यांनी अविरत रियाझाने, गायकीच्या प्रगल्भ चिंतनाने व रागमांडणीतील अस्सलपणाने एक गायक म्हणूनही मान्यता प्राप्त केली. गजाननबुवा हे एक नावाजलेले ‘तालिये’ होते, त्यांची तालावर विलक्षण हुकमत होती. उ. अहमदजान थिरकवा, शमसुद्दिन खाँ, दाऊद खाँ, अल्लारखा, विनायकराव घांग्रेकर, सामताप्रसाद, अनोखेलाल यांसारख्या कसलेल्या तबलावादकांसह त्यांच्या व्हायोलिन वादनाच्या व गायनाच्या अनेक मैफली गाजल्या.
गुरू गजाननबुवांचे सांगीतिक कार्य म्हणून फार उच्च दर्जाचे आहे. अशोक दा. रानडे, जयश्री पाटणेकर, मधुसूदन कानेटकर, उल्हास कशाळकर, अरुण कशाळकर, शुभदा पराडकर, पद्मा तळवलकर, वीणा सहस्रबुद्धे, तसेच कन्या सुचेता बिडकर व पुत्र मधुकर जोशी यांनी त्यांच्याकडून गायकीचे शिक्षण घेतले. श्रीधर पार्सेकर, जी.आर. निंबर्गी, पुत्तुर देवीदास जोशी, सुरेंद्र राव, त्र्यंबकराव तारे, राजाभाऊ देसाई, विष्णू सप्रे, वामनराव केतकर, भालचंद्र देव हे त्यांचे व्हायोलिनचे शिष्य होत.
गजाननबुवांनी आकाशवाणीवर संगीत सल्लागार म्हणून काम केले. तसेच मुंबई विद्यापीठाचे म्यूझिक सेंटर, आय.टी.सी. संगीत रिसर्च अकादमी (कोलकाता), इंदिरा कला विश्वविद्यालय (खैरागड) येथे संगीत-अध्यापनही केले. औंध येथे अनेक वर्षे शिवानंद संगीत समारोह आयोजित करून त्यांनी ग्रमीण भागात रागसंगीताची अभिरुची रुजवण्याचे कार्य केले.
व्हायोलिनवादनातील कार्यासाठी ‘संगीत नाटक अकादमी’ पुरस्कार (१९७२), सूरसिंगार संसद, मुंबई यांच्याकडून ‘तंत्रीविलास’ पुरस्कार (१९७४), गायनातील कारकिर्दीसाठी संगीत रिसर्च अकादमीचा ‘आय.टी.सी.’ पुरस्कार (१९८२), मध्यप्रदेश सरकारचा अत्यंत मानाचा ‘तानसेन सन्मान’ (१९८५) देऊन त्यांना सन्मानित केले.
गजाननबुवा जोशी यांनी प्रचलित, अप्रचलित रागांत सुमारे सत्तर-ऐंशी उत्तम बंदिशींची निर्मिती केली होती. गजाननबुवांच्या जन्मशताब्दी वर्षात अंतूबुवा व गजाननबुवांच्या बंदिशींचा ‘मालनिया गुंदे लावो’ हा संग्रह ध्वनिमुद्रिकेसह प्रकाशित झाला. गजाननबुवांचे डोंबिवली येथे निधन झाले.

चैतन्य कुंटे

जोशी, गजानन अनंत