Skip to main content
x

झारापकर, काशिनाथ रामचंद्र

      काशिनाथ रामचंद्र झारापकर यांनी शिवणकाम या कलेेचे मानवी जीवनातील मूलभूत गरज म्हणून असलेले स्थान ओळखून शिवणकलेला सामाजिक प्रतिष्ठा प्राप्त करून दिली. या कलेच्या शैक्षणिक स्वरूपाचे ते आद्य जनक आहेत. कुटुंबाचे पालनपोषण करण्यासाठी स्वत:च्या पायावर उभे राहता यावे म्हणून शिवणकामास चरितार्थाचे साधन बनविणारे अनेक स्वावलंबी विद्यार्थी त्यांनी तयार केले.

     काशिनाथराव हे मूळचे कोकणातील सावंतवाडीजवळील ‘झारापी’ गावचे रहिवासी. आईवडील व चार भावंडे असे कुटुंब. परिस्थिती बेताचीच होती. काशिनाथरावांना कुशाग्र बुद्धिमत्ता लाभल्यामुळे त्यांना शिक्षकी पेशाबाबत विशेष आपुलकी होती. झारापला शालांत शिक्षण झाल्यावर वयाच्या विसाव्या वर्षी ज्येष्ठ बंधू कान्होबा यांच्यासमवेत ते पुण्याला रवाना झाले. आई इंदिराबाई यांच्या प्रेरणेने तेथे त्यांनी टेलरिंग आणि कटिंगचा तीन वर्षांचा डिप्लोमा केला. नंतर त्यांनी पत्नी व भावजय यांनाही टेलरिंगचे शिक्षण दिले. काशिनाथरावांनी असा विचार केला की, कुटुंबातील स्त्रीने जर हे शिक्षण घेतले तर ती मिळवती होईल व आपल्या संसाराला हातभार लावू शकेल. आपल्या ज्ञानाने इतरांचे भले करण्याच्या सामाजिक बांधिलकीतून त्यांनी १९३३ मध्ये गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर शिवणवर्गाची सुरुवात केली. या कलेच्या शैक्षणिक स्वरूपाचे ते आद्य जनक आहेत. कुटुंबाचे पालनपोषण करण्यासाठी स्वत:च्या पायावर उभे राहता यावे म्हणून शिवणकामास चरितार्थाचे साधन बनविणारे अनेक स्वावलंबी विद्यार्थी त्यांनी तयार केले.

      पुण्यातील कसबा पेठेत त्यांच्या राहत्या घरातच हा वर्ग सुरू झाला. घरातील मंडळी वर्गाच्या वेळेत जिन्यात जाऊन बसत. भांडीकुंडी टेबलाच्या खाली ठेवून त्याच टेबलावर कपडे बेतायची प्रात्यक्षिके केली जात. त्यावेळी वर्षाला चाळीस रुपये फी होती. पाचसहा वर्षात त्यांचा चांगलाच जम बसला. त्यांच्या शिक्षणाचा दर्जा उत्तम असल्यामुळे कोणत्याही जाहिरातीशिवायच उत्तम प्रसिद्धी झाली व घराघरातून सर्व जाती-पोटजातीच्या लेकीसुना शिवणकाम शिकण्यासाठी विश्‍वासाने झारापकर टेलरींग महाविद्यालयाकडे येऊ लागल्या. आता जागा अपुरी पडू लागली. झारापकरांनी आपली संस्था अप्पा बळवंत चौकात हलवली.

      आपण या व्यवसायातील अत्याधुनिक तंत्र व ज्ञान आत्मसात करून ते आपल्या संस्थेतून शिकवावे असे झारापकरांना वाटू लागले. त्यांनी लंडन येथील टेलर अँड कटर अ‍ॅकेडमी या जगातील सर्वश्रेष्ठ संस्थेत प्रशिक्षण घेतले. तेथेच प्रशिक्षक म्हणून जबाबदारी सांभाळून कामाचा अनुभव घेतला. तिथेच प्रशिक्षक म्हणून तज्ज्ञाचे काम पार पाडले. संपूर्ण युरोपाचा दौरा करून तेथील शिक्षण संस्थांना भेटी दिल्या व या विषयातील जास्तीत जास्त ज्ञान संपादन केले. झारापकर महाविद्यालयामध्ये नवीन नवीन अभ्यासक्रम चालू करून त्यांनी या ज्ञानाचा फायदा आपल्या विद्यार्थ्यांना करून दिला. शिवणकलेच्या सोबत व्यवसाय शिक्षण, भरतकाम, विणकाम, हस्तकला इत्यादी कलांचे शिक्षण देणारी ‘झारापकर टेक्निकल इन्स्टिट्यूट’ सुरू केली. विद्यार्थ्यांना ही कला सुलभपणे यावी यासाठी झारापकरांनी शिवणकलेवर विविध पुस्तके लिहिली. मराठी, हिंदी, इंग्रजी, गुजराथी, कन्नड, तामिळ, तेलगू, मल्याळम इत्यादी भाषांतून प्रकाशित झालेली ही उपयुक्त पुस्तके बाजारात अत्यंत वाजवी दरात उपलब्ध झाली. त्यांनी 'झारापकर मासिक'ही सुरू केले. लेखक, संपादक, मुद्रक अशा सर्व जबाबदार्‍या सुरुवातीला त्यांनी स्वीकारल्या. हे व्यावसायिक मासिक छापायला कोणी तयार होत नव्हते म्हणून त्यांनी खंडाळा येथे झारापकर प्रिंटिंग प्रेस स्थापन केला. या पुस्तकांना लाभलेली लोकप्रियता पाहून नंतर अनेक प्रकाशक पुढे आले. त्या काळी शिक्षणासाठी माणसे मुंबईला जात असत. त्यांचा कल पाहून झारापकरांनी दादर, गोरेगाव, जोगेश्वरी येथे झारापकर टेलरिंग महाविद्यालयाच्या शाखा उघडल्या. झारापकरांनी संस्थापक, संस्थाचालक या नात्याने खुर्चीवर बसण्यापेक्षा वर्गात उभे राहून सतत शिकवण्याचे काम केले. त्यांच्या कार्याचा गौरव म्हणून इचलकरंजी व औंध या संस्थानांनी त्यांना  सुवर्णपदक प्रदान केले होते. नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ फॅशन अँड टेक्नॉलॉजी या संस्थेतर्फे केंद्र शासनाने त्यांना जीवन गौरव पुरस्कार अर्पण केला.

      शास्त्रशुद्ध शिवणकला शिकवणारी भारतातील ही पहिलीच संस्था होय. या संस्थेने २००२ मध्ये अमृत महोत्सव साजरा केला आहे. या टेलरिंग महाविद्यालयामध्ये श्रीलंका, मलेशिया, सिंगापूर, अमेरिका येथील विद्यार्थीही शिक्षण घेत आहेत. त्यांचे पुत्र अरविंद झारापकर सध्या या संस्थेचा कारभार पाहतात.

    - वि. ग. जोशी   विद्या साने

झारापकर, काशिनाथ रामचंद्र