Skip to main content
x

कादरबक्ष, मुल्लाजी

कादरबक्ष

सुप्रसिद्ध सारंगीवादक उस्ताद मुल्लाजी कादरबक्ष यांनी सारंगी हे वाद्य लोकप्रिय केले. जवळजवळ १५-२० वर्षे बालगंधर्वांच्या कंपनीत साथ करून मराठी जनतेला आपल्या सारंगीच्या साथीने मोहित केले. सारंगी या वाद्याचा सहवादनात वापर करूनही गायकी पद्धतीने वादन करून साथीच्या वाद्याला एक महत्त्वाचे स्थान मिळवून देण्याचा मान उस्ताद मुल्लाजी कादरबक्ष यांच्याकडे जातो.

कादरबक्ष यांचा जन्म हरियाणातील झज्जर या गावी झाला. वयाच्या पाचव्या-सहाव्या वर्षापासून वडील अझीमबक्ष यांनी त्यांना संगीताचे शिक्षण देण्यास सुरुवात केली. कादरबक्ष यांनी अनेक राग आणि बंदिशींचे शिक्षण घेतले व नंतर सारंगी वादनाचे शिक्षण घेण्यास सुरुवात केली. त्यांनी रोज पाच-सहा तास रियाज केला. ते अत्यंत धिम्या गतीने गज चालवण्याचा रियाज करत आणि तो करताना थोडीसुद्धा घाई झाली तर हातावर काठीचा फटका बसत असे. अत्यंत कठीण परिश्रमातून कादरबक्ष यांचे सारंगी वादन तयार झाले.

गुडीयानीवाले बशीर खाँ यांच्या गाण्याला मुंबईमध्ये साथ करत असताना कादरबक्ष यांचे सारंगी वादन बालगंधर्वांनी प्रथम ऐकले आणि त्या वादनाने मंत्रमुग्ध झाले आणि त्यांनी खाँसाहेबांना आपल्या नाटक कंपनीत सारंगी वादन करण्याची विनंती केली. वास्तविक गंधर्व नाटक कंपनीत बाबालाल हे सारंगिये होते, तरीही कादरबक्ष यांची सारंगी साथ मिळावी अशी बालगंधर्वांची इच्छा होती. या विनंतीस मान देऊन त्यांनी गंधर्व कंपनीत नोकरी स्वीकारली.

बालगंधर्वांची गाण्याची पद्धत कादरबक्ष यांनी अचूक हेरली होती. त्यामुळे खाँसाहेबांचे सारंगी वादन त्याच पद्धतीने होत असे. कादरबक्ष यांच्यावर बालगंधर्वांची अत्यंत मर्जी होती. तसेच कादरबक्षही बालगंधर्वांशी एकनिष्ठ होते. बालगंधर्व खाँसाहेबांना ‘चाचाजी’ म्हणत असत.

म्हैसूरच्या राजदरबारातून सारंगी वादनासाठी खाँसाहेबांना बोलावणे आले. परंतु राजदरबारातील नोकरी त्यांनी स्वीकारली नाही. ते नेहमी म्हणत असत की, ‘‘गंधर्व नाटक कंपनीदेखील एक राजदरबार आहे आणि त्यात खुद्द राजा माझी अत्यंत काळजी घेतो, माझ्या प्रकृतीबद्दल कायम विचारपूस करतो. दुपारी नाटक असले तरीही संध्याकाळी मला नमाजासाठी पुरेसा वेळ देतो, असा काळजी घेणारा राजा मला राजदरबारात मिळणार नाही.’’

कादरबक्ष थिरकवा साहेबांच्या साथीत सारंगी वादनाचे कार्यक्रम करीत असत, त्यात ते प्रामुख्याने बालगंधर्वांच्या पदांचा समावेश करीत असत. बालगंधर्वांच्या गाण्यात शब्दफेक जितक्या प्रभावीपणे असे, तितक्याच प्रभावीपणे खाँसाहेबांच्या वादनातही दिसत असे. गायन कुठले आणि वादन कुठले असा संभ्रम ऐकणार्‍याला पडत असे. कादरबक्षांचे वाजवणे बालगंधर्वांच्या गाण्याची सहीसही आठवण करून द्यायचे.

सारंगी वादनाच्या रियाजाच्या बाबतीत कादरबक्ष अत्यंत शिस्तीचे होते. जेव्हा वेळ मिळेल, तेव्हा ते आपले वाद्य काढून रियाज करीत. त्यांची सारंगी ऐकून मास्टर दीनानाथांनीसुद्धा कादरबक्ष यांना त्यांच्या कंपनीत येण्याबद्दल विचारले. मात्र कादरबक्ष बालगंधर्वांशी एकनिष्ठ राहिले होते.

खाँसाहेबांनी अनेक महान कलाकारांची साथसंगत केली. गुडीयानीवाले उस्ताद बशीर खाँ, पटियालाचे आशिक हुसेन खाँ, कलकत्त्याचे उस्ताद प्यारे खाँ यांची साथ ते करीत असत. मुंबईत असलेल्या अनेक महान कलाकारांना ते साथ करीत असत.

त्यांच्या शिष्य-परिवारात सांगलीचे बाबूराव गोरे, अ‍ॅड. खोत, तसेच गायकांमध्ये केशवराव भोळे, तसेच त्यांचे चिरंजीव उस्ताद मोहंमद हुसेन खाँ यांची नावे प्रामुख्याने घ्यावी लागतील. अत्यंत सात्त्विक असल्याने ‘मुल्लाजी’ असे संबोधले जाणार्‍या कादरबक्ष यांचे पुण्यात निधन झाले.

— उस्ताद फैयाज हुसेन खाँ

कादरबक्ष, मुल्लाजी