Skip to main content
x

कामा, खर्शेद्जी रुस्तुमजी

     र्वसाधारणपणे बहुतेक पारशी धर्मपंडित हे पुरोहित घराण्यातच जन्माला आले; पण खर्शेदजी कामांचा जन्म उद्योजकांच्या घरात झाला. किशोरावस्थेतच ते घरातील वरिष्ठांसमवेत व्यवसायात सहभागी झाले. असे दृष्टोत्पत्तीस येते, की एकोणिसाव्या शतकात बरेचसे पारशी उद्योजक चीनला भेट देत. त्याप्रमाणेच किशोरवय संपताच कामांनी चीनला भेट दिली. वयाच्या पंचविसाव्या वर्षी ते व्यावसायिक प्रतिष्ठान स्थापित करण्याच्या उद्देशाने दादाभाई नवरोजी आणि माणेकजी कामा ह्यांच्यासह इंग्लंडला गेले. त्यांनी चार वर्षे युरोपच्या भिन्न भिन्न भागांत भ्रमंती केली. विधिलिखित होते त्याप्रमाणेच त्यांनी प्राचीन इराणी भाषांचा, तसेच इंडो-जर्मनिक भाषांचा अभ्यास सुरू केला. ब्युरनॉफ, मेना, हाउग, दरमेस्टेटे, जॅक्सन वगैरेंसारख्या पाश्चिमात्य विद्वानांचा सहवास त्यांना लाभला आणि त्यांच्याकडून कामांना खूप काही शिकायला मिळाले. मुंबईला परतल्यानंतरसुद्धा पत्रव्यवहारामार्फत त्यांच्याशी कामांचा दृढ संबंध होता. अवेस्तापहलवीच्या अभ्यासाला प्रोत्साहन देण्याच्या निमित्ताने ह्या जवळजवळ विस्मृतीत गेलेल्या प्राचीन भाषांचा समावेश मॅट्रिकची परीक्षा आणि मुंबई विद्यापीठाच्या कला विभागातल्या पदवी पाठ्यक्रमांच्या विषयांत करून कामा ह्यांनी महत्त्वाचे कार्य केले. ते युरोपहून परतल्यानंतर लगेचच, प्राचीन इराणी भाषांचे वेगवेगळे पैलू व बोलीभाषांच्या प्रकारांबरोबरच पाश्चिमात्य विद्वानांनी अंगीकारलेली दार्शनिक पद्धती अभ्यासण्यासाठी त्यांच्याभोवती अनेक तरुण गोळा झाले. त्यांमध्ये मुख्यत्वे धर्माचे अभ्यासक होते. शेरियारजी भरूचा, कावसजी कांगा, तेहमुरा स. अंकलेसरिया असे काही त्यांच्या पहिल्या शिष्यांमध्ये होते. आजमितीलासुद्धा अवेस्ताचे पारशी, त्याप्रमाणेच पारशेतर अभ्यासक, कावसजी कांगा ह्यांच्या अवेस्ता-इंग्रजी शब्दकोशाचे आणि त्यांच्या नियाइशिस, यश्त, वंदिदाद व गाथांचा आधार घेतात.

     १८६४ मध्ये कामा यांनी धर्मपंडितांची एक संस्था स्थापन करण्याचे महत्त्वाचे कार्य केले, जी झरतोस्ती (पारशी) धर्माचे कार्य पुढे नेऊ शकेल. या संस्थेचे गुजराती नाव होते, ‘झरतोस्ती दिन-नी खोल करनारी मंडली’ म्हणजे पारशी धर्माचे संशोधन करणारी मंडळी. विसाव्या शतकाच्या उत्तरार्धापर्यंत ह्या संस्थेचे सभासद इराणच्या कला, स्थापत्य, मुद्राशास्त्र आदी अभ्यासाच्या संदर्भातील अडचणींविषयी चर्चेसाठी वेळोवेळी एकत्र येत. त्यांच्या आयुष्यभराच्या कारकिर्दीत, उपरोल्लिखित संस्थेच्या सभासदांसमोर, तसेच राहनुमाए माझद्येसनी दिन सभा, द रॉयल एशियाटिक सोसायटी इत्यादी ठिकाणी कामा आपले शोधनिबंध सादर करीत. शिवाय मुल्ला फिरोज मदरसा, सर जमशेदजी जीजीभॉय मदरसा, नवसारीची नसरवानजी रतनजी टाटा मदरसा यांच्या कार्यांत बारकाईने लक्ष घालत. हे नमूद करायला हवे, की त्या काही वर्षांत या शाळांनी अनेक धर्मपंडित दिले. सर्व दृष्टिने कामा साधेपणाचे भोक्ते होते आणि नीटनेटकेपणासाठी आग्रही होते. ते स्वभावाने दयाळू आणि उदार होते. ते आत्मनिर्भरतेसाठी आणि मितव्ययी म्हणून ओळखले जात होते. एक दिवस लेखक स्वत: प्राध्यापक दिनशा कपाडिया ह्यांच्या पुणे येथील घरी त्यांना अभिवादन करण्यास गेला असता त्या वयोवृद्ध विद्वानाने कामांच्या व्यक्तिमत्त्वाचा एक पैलू स्पष्ट करण्याच्या मिषाने पुढील घटना विशद केली.

     एका व्याख्यानाच्या कार्यक्रमप्रसंगी कामा अध्यक्ष होते आणि त्यांच्याबरोबर मंचावर त्या संध्याकाळचे व्याख्याता व कपाडिया होते. प्रेक्षकगणात फक्त एक सद्गृहस्थ होते. आणखी काही श्रोत्यांची थोडा वेळ वाट पाहिल्यानंतर वक्त्याने, त्या दिवसाचा कार्यक्रम स्थगित करणे उचित ठरेल काय, असे कामांना विचारले. पण कामांना तो प्रस्ताव अस्वीकारार्ह वाटला. ते म्हणाले, ‘‘कदापि नाही. हे सद्गृहस्थ तुम्हांला ऐकण्यास्तव आले आहेत. त्यांना निराश करण्याची आवश्यकता नाही. अजून एक गोष्ट, कृपा करून व्याख्यानाच्या मुद्द्यांंत काटछाट नको. वक्त्याने ते मानले आणि ४५ मिनिटे व्याख्यान देण्यास घेतली आणि त्यावर आपले विचार मांडण्यास अध्यक्षांनी वीस मिनिटे घेतली.

     कामांच्या सत्तराव्या जन्मदिवशी, विद्वत्तापूर्ण लेख असलेला ग्रंथ मित्र व चाहत्यांनी त्यांना प्रदान केला. त्यांच्या निर्वाणानंतर सुमारे सात वर्षांनी ‘के.आर. कामा ओरिएन्टल इन्स्टिट्यूट’ नावाची संस्था लोकांनी जमवलेल्या निधीतून उदयास आली. १९७० मध्ये या संस्थेने ‘द कलेक्टेड वर्क्स ऑफ के.आर. कामा’ या शीर्षकाखाली दोन ग्रंथ प्रकाशित केले.

     आत्तापर्यंत आपण ह्या असाधारण व्यक्तिमत्त्वाची सकारात्मक बाजू पाहिली. त्यांच्या व्यक्तिमत्त्वाच्या दुसर्‍या बाजूबद्दलही उल्लेख करणे उचित ठरेल. कामा रंगमंचावर अवतीर्ण होईपर्यंत पारशांमध्ये दोन पंथ होते, कदिती आणि शहनशाही. कामांनी तिसऱ्या पंथाचा परिचय करून दिला : फसली. विसाव्या शतकातल्या अनेक श्रेष्ठ विद्वानांना हे अस्वीकारार्ह वाटले. याव्यतिरिक्त एकोणिसाव्या शतकातल्या पारशांप्रमाणे कामा एच.डब्ल्यू. ब्लावस्कीच्या सिद्धान्तांनी मोहित झाले आणि स्वत:ला त्यात झोकून ते थिऑसॉफिस्ट/दैववादी बनले. थिऑसॉफी/दैववादाबरोबरच कामा स्त्रीत्ववादाकडे आकर्षित झाले. ह्या स्त्री-आंदोलनामुळे पारशी समाजातील स्त्रिया परंपरामुक्त होऊन स्वातंत्र्याच्या पुरस्कर्त्या झाल्याचे स्पष्ट झाले.

फरीबोर्झ नरीमन

कामा, खर्शेद्जी रुस्तुमजी